शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांनी खूप उपयुक्त शोध लावले. स्वयंचलित तारयंत्र, सोनोग्राफ, डायनामो, विजेचा बल्ब, विद्यूत मोटर, चलत चित्रपट असे अनेक शोध एडिसन यांनी लावले.

अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म मिलान ओहियो येथे 11 फेब्रुवारी 1847 रोजी झाला. शाळेचे व त्यांचे फारसे पटले नाही. जेमतेम तीन महिने ते शाळेत गेले. वयाच्या बाराव्या वर्षी ते पेपर विकू लागले. फावल्या वेळेत ते प्रयोग करत असत. रेल्वेच्या डब्यातच त्यांनी आपली प्रयोगशाळा थाटली होती. तेथेच त्यांनी ‘ग्रँड ट्रंक हेराल्ड’ नावाचे एक साप्ताहिक 1862मध्ये छापून प्रकाशित केले. रेल्वेतील एका अधिकार्‍याच्या मुलाचा प्राण वाचवल्याबद्दल बक्षीस म्हणून त्यांना तारयंत्र वापरण्याचे शिक्षण मिळाले. पुढे त्यांना बोस्टन येथील एका कार्यालयात नोकरी मिळाली. अतिशय गरीब असल्यामुळे अगदी मळक्या कपड्यांत ते कामावर रुजू झाले. त्यांचा अवतार पाहून, तेथील कर्मचार्‍यांनी त्यांची थट्टा केली, परंतु त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले. प्रमुखाने त्यांना तारयंत्रावर बसून संदेश घेण्यास फर्मावले. त्यांचे तारयंत्रावरील कसब व संदेश घेण्याचा वेग पाहून सर्व जण चकित झाले. सलग चार-साडेचार तास तारयंत्रावर बसून त्यांनी संदेश घेतला. इतकेच नव्हे; तर पलीकडे तारयंत्रावर बसलेल्या माणसाला एकदाही पुन्हा सांगावे लागले नाही की, त्याचा संदेश पाठवण्याचा वेग कमी करावा लागला नाही. ‘या वेगाने व इतका वेळ आणि तोही बिनचूक संदेश घेणारा मी आज प्रथमच पाहत आहे’, अशी प्रांजल कबुली पलीकडील माणसाला देण्यावाचून गत्यंतर नव्हते. तेथेही त्यांच्या संशोधकवृत्तीने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. त्याने तारयंत्रात अनेक सुधारणा केल्या. स्वयंचलीत तारयंत्र एकाच वेळी एकापेक्षा अधिक संदेश पाठवणारे यंत्र, त्यापैकी काही सुधारणांचा पुढे अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने लावलेल्या टेलिफोनच्या शोधात खूप उपयोग झाला. 

विजेच्या बल्बचा शोध लावताना बल्बमधील तारेसाठी त्यांनी शेकडो पदार्थ वापरून पाहिले. शेवटी त्यांच्या चिकाटीला यश आले. या बल्बसाठी लागणारी वीज निर्माण करण्यासाठी त्यांनी 1882मध्ये जगातील पहिले मोठे वीजनिर्मिती केंद्र न्यूयार्कमध्ये उभे केले.

एडिसन यांनी लावलेल्या ग्रामोफोनच्या शोधामुळे कोणताही आवाज मुद्रित करणे शक्य झाले. या शोधाचे महत्त्व सर्व संगीतप्रेमींना सांगण्याची आवश्यकता नाही. या ग्रामोफोनमध्ये त्यांनी सातत्याने सुधारणा केल्या. त्यांच्या कायनेटोस्कोपच्या शोधामुळे चलचित्रपट पाहणे शक्य झाले आहे. 1993मध्ये त्यांनी पहिला चलचित्रपट -बोलपट तयार केला.

एडिसन यांनी रसायनशास्त्रातही संशोधन केले. त्यांनी नुसते शोधच लावले नाहीत; तर त्या वस्तूंचे उत्पादनही केले. त्यामुळे ते केवळ शास्त्रज्ञच नव्हते, तर खर्‍या अर्थाने तंत्रज्ञही होते. असा हा महान संशोधकाचा 18 ऑक्टोबर 1931 रोजी मृत्यू झाला. 

- सतिश रुठे

[email protected]