प्रसंग 1 :

‘आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे॥

तोषोनि मज द्यावे। पसायदान हे॥

(राधाची आई पलंगावर बसून पोथी घेऊन पसायदान म्हणत असते. स्वयंपाकघरात राधाची आवराआवर चालू असते. तिचे काम तिच्या पद्धतीने चालू असते, कारण ती अंध असते. तेवढ्यात बाहेरून अवनीच्या आईचा आवाज येतो.)

अवनीची आई : अवनी, नीट जा गं.

(मग राधाची गडबड चालू होते. तिच्या हातातून भांडी खाली पडू लागतात.)

राधाची आई : राधे, कसली गडबड चालू झाली. सावकाश काम कर.

राधा : बाबांना कामाला जायला उशीर होईल, म्हणून पटपट करतेय.

आई : तुला कोणी सांगितलं, त्यांना उशीर होतोय म्हणून?

राधा : अगदी सोप्पं आहे ते. अगं, अवनीची रिक्षा आलीय ना, तिला शाळेत घेऊन जाण्यासाठी.

आई : तुला कसं कळलं?

राधा : आताच तर अवनीच्या आईचा आवाज आला. अवनीची रिक्षा सकाळी साडे दहाला येते. मग पंधरा मिनिटांनी बाबा कामाला निघतात ना!

अवनीचे बाबा : अगदी बरोबर! आमच्या राधाचं गणित अगदी बरोबर आहे.

राधा : हा डबा घ्या बाबा, भरून ठेवलाय. आई हे तुझं ताट. खाऊन घे. तुलाही गोळ्या-औषधं घ्यायची आहेत.

आई : राधे, तूसुद्धा अवनीसारखी शाळेत गेली असतीस. तुझ्या अंधत्वासाठी मीच दोषी आहे गं! त्यात माझं आजारपण. एक तर हे अंधत्व, त्यात माझ्या या आजारपणाचा त्रास. तरीही तू आनंदानं सारं करतेस गं!

राधा : आई, झालं का चालू तुझं? अगं देवाला नक्की माझ्यासोबत काही चांगलं करायचं असेल, म्हणून त्याने डोळे दिले नाहीत; आणि बरं का, त्या अवनीसोबत मी शाळेत जात नाही तेच बरं आहे.

बाबा : (राधाच्या खांद्यावर हात ठेवत.) असं का म्हणतेस?

राधा : बाबा, अवनी एका वर्षात एकच इयत्ता शिकते, हो की नाही?

बाबा : प्रत्येक विद्यार्थी एका वर्षात एकच इयत्ता शिकतो. नियमच आहे तसा.

राधा : हा नियम मी स्वत:ला कधीच लावून घेत नाही. मला वाटले; आज आपण गणित शिकू, तर मग ज्या वर्गातून ‘बे’चे पाढे ऐकू येतात, त्या खिडकीपाशी जाऊन बसायचं. मला वाटलं; आज आपण मराठी शिकायचं, तर मग ज्या वर्गात बाई कविता किंवा बाराखडी वाचतात, त्या खिडकीपाशी मी जाऊन बसते.

शिक्षणासाठी मी स्वत:ला वयाचं, इयत्तेचं, वेळेचं बंधन घालून घेतलं नाही. चारही दिशांनी देव माझ्याभोवती ज्ञानाचे वारे वाहू देतो. ते मी डोक्यात फक्त साठवायचं काम करते.

आई : राधा, तुझी शिक्षणासाठीची धडपड पाहून कौतुक वाटतं.

राधा : आई, शाळेची वेळ झालीय, मी निघते.

बाबा : मी सोडायला येतो.

राधा : नको बाबा. मला पावलांचं गणित बरोबर येतं. या अंधारासोबत मलाचं लढायचं आहे. आई तू काल माझी कविता लिहिलीस, तो कागद दे ना! आज मराठीच्या बाईंना वाचायला देईन.

आई : ही वहीच घे. कागदावरून या वहीतच लिहिली आहे. नीट जा गं!

बाबा : राधा, माझी आशा आहे, जीवन जगण्याची नवीन उमेद आहे!

 

प्रसंग 2 (स्थळ : शाळेचे आवार) :

(एका वर्गातून मुलांचा पाढे म्हणण्याचा आवाज येतो. एक, दोन, तीन, चार...)

राधा (स्वत:शीच) : आली आपली शाळा, या वर्गातून पाढे ऐकू येत आहेत. गणिताचा तास चालू आहे. वर्गातून साने बाईंचा आवाज ऐकू येतोय. मग मी इथेच खिडकीपाशीच बसते. (बाईसुद्धा वर्गातून डोकावून बघतात.)

साने बाई : राधा, आलीस का? गणिताचा तास चालू आहे. तुला आज अंक सांगते. ही बघ, पेन्सिल आहे. पेन्सिलीला एका बाजूला टोक असतं. टोकाच्या बाजूने लिहायचं असतं. या टोकाच्या बाजूने हळूच तुला हातावर अंक लिहून दाखवते. (पेन्सिलीने बाई राधाच्या हातावर गिरवतात. हे बघ; हा एक, दोन, तीन. आज तीनपर्यंतच बास. उद्या पुढचे अंक शिकवीन. आता या मुलांसोबत पाढे म्हण.

राधा : ठीक आहे. मी उद्या घरून येताना तीनपर्यंत पाढे पाठ करून येते. (राधासुद्धा बाहेर बसून पाढे म्हणते.)

(नवीन मुख्याध्यापिका बाई शाळेतून चक्कर मारत शाळेची पाहणी करत असतात. राधाला वर्गाबाहेर बसलेली बघून त्या साने बाईंना बोलवतात.)

मुख्याध्यापिका बाई : साने बाई, ही मुलगी कोण? वर्गाच्या बाहेर बसून पाढे का म्हणत आहे?

साने बाई : मॅडम, ही राधा. तुम्ही नवीन आहात; म्हणून कदाचित माहिती नसेल तुम्हाला.

मुख्याध्यापिका बाई : राधा, वर्गाच्या बाहेर बसून का पाढे म्हणते? वर्गात का नाही?

साने बाई : राधा अंध आहे.

मुख्याध्यापिका बाई : तिच्या पाढे म्हणण्यावरून तरी तसं वाटलं नाही. ती अंधांच्या शाळेत का नाही जात?

साने बाई : अंधांची शाळा इथून खूप लांब आहे. येण्या-जाण्यात खूप हाल होतील. तसंच, तिची आईही सारखी आजारी असते. घरातलं काम आवरून तिला इथे येणं सोईचं पडतं.

मुख्याध्यापिका बाई : ठीक आहे. तुझी परिस्थिती आणि शिकण्याची आवड म्हणून मी तुला इथे बसण्याची परवानगी देते.

साने बाई : मॅडम, इतर मुलं परीक्षेत पास होऊन पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी शाळेत येतात, एखाद्या यंत्रासारखे. पण राधाची गोष्टच वेगळी आहे. तिला फक्त शिकायचं आहे, म्हणून ती येते. परीक्षा, मार्क, नंबर, स्पर्धा यांच्याशी तिचा संबंधच नाही.

राधा : मॅडम, परवानगी दिल्याबद्दल आभारी आहे.

मुख्याध्यापिका बाई : अगं, आभार कसले मानतेस. एकलव्यानेच जर शिकण्याचे ठरवले आहे, तर मग ते पुतळा बांधून असो अथवा वर्गाच्या बाहेर बसून असो, त्याला शिक्षण हे मिळणारच! मग, त्यात मी कशी मध्ये येऊ? (मुख्याध्यापिका बाई निघून जातात. तेवढ्यात शाळेची घंटा वाजते. तास संपतो.)

साने बाई : राधा, मीही निघते. मला पुढच्या तासाला सातवीच्या वर्गात मराठी विषय शिकवायला जायचं आहे. तू इथेच बस. पुढच्या तासाच्या बाई येतीलच.

राधा : मराठीचा तास? बाई, मी तुमच्या सोबत येऊ का? आता मुख्याध्यापिका बाईंनीही परवानगी दिली आहे. तुम्ही शिकवाल ते ऐकायचंच आहे. तसंच मला कविता करायलाही आवडतात.

साने बाई : अरे व्वा! कुठे आहेत तुझ्या कविता?

राधा : बाई, या वहीत लिहिल्या आहेत कविता.

साने बाई : राधा, तुझं कौतुक आहे. पण, या कविता वहीत कुणी लिहिल्या?

राधा : बाई, माझी आई आजारी असली म्हणून काय झालं? खरं तर, तीच माझे डोळे आहे. तिच्याच डोळ्यांनी मी जग बघते. तिनेच लिहिल्या कविता. घरातल्या कामातही ती जागेवरूनच बर्‍याच गोष्टी दाखवते.

(बाई राधाच्या कवितांची वही चाळत असतात.)

साने बाई : आणि तुझे बाबा?

राधा : आईचं आजारपण आणि माझं अंधत्व या दोन्ही गोष्टी स्वीकारून शांतपणे सगळ्या गोष्टी बाबा करत असतात. आमच्यासाठी बाहेर जाऊन कामही करत असतात आणि घरी येऊन उरलेली कामंही करतात.

साने बाई : तुम्हा तिघांचं समीकरण काही वेगळंच आहे. चल...

(दोघी जणी सातवीच्या वर्गाकडे जाण्यासाठी निघतात.)

 

प्रसंग 3 (संध्याकाळची वेळ, स्थळ : राधाचे घर) :

आई : राधे, संध्याकाळचे सात वाजलेत, अजून तुझे बाबा आले नाहीत गं!

राधा : संध्याकाळचे सात वाजलेत का? दिवे लावायची वेळ झाली आहे. मी खोलीतली लाइट लावते. बाबा आले की देवासमोर दिवा लावतील.

(दरवाज्यावर टकटक आवाज येतो.)

राधा : बाबा आले वाटतं. (राधा जाऊन दरवाजा उघडते.)

आई : आलात का हो? आज यायला उशीर झाला.

बाबा : घरमालकाकडे जाऊन भाडं देऊन आलो.

आई : बरं झालं. एक टेन्शन कमी झालं.

बाबा : राधे रोजच्याप्रमाणे तुला नवीन काय शिकायचंय आज? काल आपण ‘दूर’, ‘जवळ’ या गोष्टी शिकल्या. तू सांग आता या गोष्टी तू कशा ओळखशील ते?

राधा : अगदी सोप्पं आहे. आवाज किती घुमतो, लांब जातो, यावरून एखादी गोष्ट किती दूर आहे, किती जवळ आहे, हे कळतं. माझ्या डोळ्यांचं कामही कानांनाच करावं लागतं.

बाबा : शाब्बास! आज आपण ‘वर’, ‘खाली’ शिकू या.

(तेवढ्यात दरवाज्यावर थाप पडते. दरवाजा उघडाच असतो.)

मुख्याध्यापिका बाई : येऊ का आत? राधा आहे का घरात?

बाबा : (दरवाजाकडे जात.) आपण? माफ करा, मी ओळखलं नाही.

मुख्याध्यापिका बाई : मी ह.भ.न. प्रशालेची मुख्याध्यापिका.

बाबा : या, या मॅडम. बसा. पाणी आणतो.

(बाई आत येत बोलतात.)

मुख्याध्यापिका बाई : कौतुक वाटतं तुमचं. राधाची शिकण्याची इच्छा तिला शांत बसू देत नाही. तुम्हीही तिला शिकण्यासाठी मदत करता. बघितलं आताच.

बाबा : राधाला शाळेत बसू दिल्याबद्दल धन्यवाद.

मुख्याध्यापिका बाई : अहो, धन्यवाद कसले? मी एक निमित्त आहे. करणारा ‘तो’ वरती बसलाय. ही राधाची कवितांची वही. कविता खूप छान आहेत.

राधा : अरे हो, ही वही मी साने बाईंना दिली होती वाचण्यासाठी.

मुख्याध्यापिका बाई : हो, त्यांनीच मला दिली ही वही.

आई : राधा, बाईंना पाणी दे; चहा कर.

मुख्याध्यापिका बाई : अहो, नको! दोन दिवसांनी शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे. त्यात आम्ही राधाचा विशेष सत्कार करायचं ठरवलं आहे. त्याचंच आमंत्रण द्यायला आले आहे.

बाबा : पण बाई, राधा तुमच्या शाळेत वर्गाबाहेर येऊन बसते.

मुख्याध्यापिका बाई : कागदोपत्री जरी ती आमच्या शाळेची विद्यार्थिनी नसली, तरी ती अशी विद्यार्थिनी आहे की, ती प्रत्येकाचं प्रेरणास्थान बनू शकेल. कारण तिची शिक्षणाबद्दलची जी ओढ आहे, ती आजकालच्या डोळस विद्यार्थ्यांमध्ये कमी दिसते. तिच्या सत्कारानिमित्त इतरही विद्यार्थी तिच्याकडून शिकतील. वेळ आणि तारीख मी तुम्हाला साने बाईंकडून कळवीन.

 

प्रसंग 4 (स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम, स्थळ : शाळेचा हॉल.) :

(टाळ्यांचा कडकडाट होतो. साने बाई व्यासपीठावरून बोलण्यास सुरुवात करतात.)

साने बाई : विशेष प्रावीण्य मिळवलेल्या मुलांचा आपण आताच सत्कार केला. आज आपल्याकडे आणखी एका विशेष विद्यार्थिनीचा सत्कार होणार आहे, ती आहे राधा. मी प्रमुख पाहुण्यांना आणि सर्व विद्यार्थ्यांना राधाची ओळख करून देते.

राधा अंध मुलगी असली, तरी वर्गाच्या बाहेर बसून वर्गात चाललेला अभ्यास ऐकून आत्मसात करते. तिची शिकण्याची धडपड पाहून मुख्याध्यापिका बाईंनीही तिला शिकण्याची परवानगी दिली. त्यासाठी बाईंचेही आभार.

(प्रमुख पाहुणे राधाचा सत्कार करतात. मुले टाळ्या वाजवतात.)

साने बाई : प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे, ही विनंती.

प्रमुख पाहुणे : राधाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. माणूस आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहिला, तर तो नक्कीच प्रगतीच्या दिशेने जातो. मग त्या विद्यार्थ्याला कोणत्याच मर्यादा राहत नाहीत. शिकण्याच्या कल्पनेनेच तो झपाटलेला असतो. राधाही अगदी तशीच आहे. अशा वेळेस देव चारही बाजूंनी ज्ञान वाटू लागतो. त्याला मदत करतो. तिला शिकायचे आहे. तिचे अंधत्व तिच्या शिकण्याच्या आड येत नाही. वर्गाच्या बाहेर बसून ती ऐकूनच बरंच काही शिकते. आपल्या मार्गातील अडथळे पार करत चालत राहण्याचे फार मोठे मानसिक धैर्य लागते. त्यामुळे राधाच्या धैर्याचे कौतुक वाटते.

मी राधाच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलतो. तसेच, मला मुख्याध्यापिका बाईंनी राधाच्या कवितांची वही दाखवली. या कवितांच्या पुस्तक प्रकाशनाची जबाबदारीही मी उचलतो. राधाला कविता करता येतात. आताही तिने एखादी कविता सादर करावी.

(टाळ्या वाजतात राधाचे बाबा राधाला व्यासपीठावर घेऊन येतात. माईक समोर उभे करतात.)

राधा : एवढा कौतुकाचा वर्षाव झाल्यावर भारावून गेल्यासारखे होत आहे. खरं बघायला गेलं, तर उघड्या डोळ्यांसाठी ही दुनिया प्रचंड मोठी आहे. त्यात बर्‍याच गोष्टी घडत असतात. माणसातील माणूसपण कुठेतरी हरवत चाललं आहे. देवाने डोळे दिले नाहीत, याचे मला दु:ख नाही. उलट त्याचे आभारच मानले पाहिजेत की, त्याने मला या वाईट दुनियेपासून दूर ठेवले. मी या माझ्या छोट्याशा दुनियेत खूप आनंदी आहे. पुन: एकदा सगळ्यांचे मनापासून आभार!

‘देवाचिया दारी भक्ती अर्पावी,

घ्यावा आशीर्वाद मुक्तीसाठी।

फुलपाखरू शोधिते फुलांस,

चारही दिशा मधासाठी।

साद सागराची भरतीच्या वेळी,

ओढ किनार्‍याच्या भेटीसाठी।

माणसाने करत अडचणींवर मात,

ओढ शिकण्याची प्रगतीसाठी।’

-शुभांजली शिरसाट  

[email protected]