घरातली सगळी माणसं जरी उभी राहिली, बसली किंवा अगदी झोपली, तरी त्या दोघी मात्र नेहमी उभ्याच असतात. तशा त्या दोघी खुटखुटीत असतात.

म्हणजे.. घरी आल्या-आल्या त्यांच्या तब्येती एकदम ठणठणीत असतात. मग कालांतराने त्यांचं वजन कमी होऊ लागतं.

त्यातल्या एकीला योगासनांची फार आवड आहे. त्यामुळे ती कधी आपल्या पायावर उभी राहात नाही. उभं राहाणं याचा तिच्यासाठी अर्थ ‘सदैव शीर्षासन’!! आता तिला याची सवयच झालीय.

आणि.. वजन कमी झाल्यावर मात्र शीर्षासन करताना तिचे पाय थोडे वाकतात!

दुसरी मात्र व्यवस्थित आपल्या पायावर उभी असते. आपली पर्सनॅलिटी सांभाळून. हिचा झोक काही वेगळाच आहे.

म्हणजे.. हिला कुठेही ठेवली, तरी ही चारचौघीत पटकन उठून दिसते, पण हिचं वजन कमी झाल्यावर मात्र ही जराशी डुगडुगते!

त्या घरात एकत्र कुटुंबपद्धती असल्याने इतक्या जणांचा आणि जणींचा आजूबाजूला सदैव राबता असतो की, या दोघींना आपसांत निवांतपणे बोलायला फुरसतच मिळत नाही.

या कुटुंबात किती जणं आहेत म्हणून सांगावं... टूथ पेस्ट, दंतमंजन, शांपूची बाटली, कंडीशनर, शॉवर जेल, सन स्क्रीन लोशन, शेव्हींग क्रीम, आफ्टर शेव्ह, फेअरनेस क्रीम, नेल पेंट ही इथे अगदी सहज दिसणारी चोळके कुटुंबातली मंडळी.

घरातली शहाणी माणसं या मंडळींना आपल्या हातावर किंवा ब्रशवर घेऊन कुठे ना कुठे चोळत असतात; म्हणून यांना ‘चोळके’ असं नाव पडलं म्हणे!

या कुटुंबात आणखीपण मंडळी आहेत बरं!

काही मंडळी तर परदेशी आहेत. त्यांना म्हणे ‘इंपोर्टेड’ म्हणतात.

थोडक्यात काय.. तर, जगभर पसरली आहे ही चोळके फॅमिली!

हा, तर सांगत काय होतो, तर याच कुटुंबातल्या ‘त्या’ दोघीजणी अचानक बाजूबाजूला आल्या...

आणि गप्पा मारू लागल्या.

पहिली : शीर्षासनात राहणारी ही आमची दुसरी पिढी.

दुसरी : अगं बाई! मग त्या आधी तुम्हीपण आमच्यासारखेच का पायावर?

पहिली : नव्हे..नव्हे! आम्ही कधी पायावर उभे राहिलोच नाही.

दुसरी : मग काय सतत झोपून?

पहिली : हो! किंवा कुणाच्या तरी कडेवर!

दुसरी : म्हणजे?

पहिली : अगं आम्हाला नीट उभं राहता यायचं नाही, म्हणून मग आम्हाला ग्लासात ठेवायचे.

हल्ली आमची डोकी मोठी झाली; गोल, चपटी झाली.त्यामुळे तंगड्या ताणून डोक्यावर उभं राहता येतं.

दुसरी : त्यामुळे तुमच्याशी बोलायचं म्हणजे ‘बूच खरवडून ओरडावं लागतं.’  कारण आमच्या पायाशी तुमचं तोंड!

पहिली : खरं आहे! तुमचं मॅचिंग आणि तुमचा एकदम झॅकपॅक लूक मला फारच आवडतो.

दुसरी : अहो अशा गोष्टींनाच ही माणसं फसतात. आपल्यात म्हणतात ना, ‘झॅकपॅक लूक आणि रिकामं बूच’ असेल तर उपयोग काय? आणि काय गं, तुला इथे मानेला काय झालंय?

पहिली : आता दिवस बदलले ताई!!

पूर्वी माणसं सकाळी सकाळी आमच्या पाया पडायचे. आमचे पाय चेपायचे. आमचा प्रसाद घेतल्यावरच कामाला लागायचे.

दुसरी : अगं ताई, मला समजलं नाही?

पहिली : पूर्वी जेव्हा आम्ही आडव्या होतो, तेव्हा ही माणसं सकाळी आमचे पाय दाबायची आणि पेस्ट ब्रशवर घेऊन मग दात घासायची.

पण आम्ही शीर्षासन करायला लागल्यापासून हीच माणसं आमची मान मुरगळतात.

त्यामुळे ‘ताठ मानेने’ काही जगता येत नाही हल्ली!

दुसरी : ही माणसं भलतीच दुटप्पी आहेत गं! माझ्याशी तर ही अगदी वेगळं वागतात.

पहिली : तुझा प्रसाद केसांवर चोळत ते स्वत:च्याच डोक्यावर म्हणे तबला वाजवतात?

दुसरी : अगदी खरं. अगं, डोक्यावर पाणी घेतलं की, यांना माझी आठवण येते. मग धडपडत ते मला शोधतात. आणि घाई गडबडीत शांपू डोक्यावर थापतात. यातला अर्धा शाम्पू तर इकडे तिकडेच ओघळून जातो. हे सारं ‘उघड्या तोंडाने बघताना’ मला त्रास होतो.

पहिली : मला या माणसांची एक गोष्ट समजत नाही...

दुसरी : कोणती गं?

पहिली : ही माणसं नाड्या बांधून पायांना बूट घट्ट बांधतात. पट्टे आवळून कंबरेला पँटी घट्ट बांधतात. बटणं लावून शर्ट अंगावर घट्ट बांधतात.

दुसरी : इतकंच काय, यांचे नाकावरचे चष्मे घट्ट. बोटातल्या अंगठ्या घट्ट. कानातले हेडफोन्स घट्ट.

पहिली : तरीपण आपली झाकणं का सैल? हे असं का? हे कोडं मला काही उलगडत नाही.

दुसरी : ‘स्वत:साठी ब्रह्मज्ञान; पण इतरांसाठी पाषाण’ ही चिनी म्हण तू ऐकलीच असशील! तशीच आहेत या घरातली काही मोठी माणसं.

पहिली : पण या घरातली मुलं खरंच चांगली आहेत. त्यांच्या दोन गमती सांगीन तुला मी कधीतरी. आता बोलून बोलून माझं झाकण झिणझिणलंय!

दुसरी : खरंय! आपलं ‘झाकण सलामत तो पेस्ट पचास!’

गोधडी आणि शाल यांचे मनोगत वाचा राजीव तांबे यांच्या शब्दांत खालील लिंकवर 

आजीच्या लाडक्या मुली

राजीव तांबे

[email protected]