"ए शमिका, आपल्या काॅलनीतल्या बकुळीला बघ ना किती छान फुलं  यायला लागलीत ते ! मी काल मस्त गजरा केलाय बघ..." केतकी. 

"आणि आमच्या बिल्डिंगजवळची रातराणीही काय बहरलीय म्हणून सांगू ! मस्त सुगंध दरवळतो रात्री. " शमिका.

"आणि त्या वडाच्या झाडावर लालचुटुक इवली इवली फळं आलीयेत.    सकाळी पोपटांचे थवे येऊन तुटून पडतात त्यावर. " सारंग. 

"आमच्या समोरच्या उंबराच्या झाडावर एका पक्षानं घरटं बांधलंय. घरटं  पूर्ण करण्यासाठी सकाळ संध्याकाळ काय लगबग चाललेली असते त्या दोघांची." साहिल. 

"मी तर चिमण्यांसाठी एक छोटंसं घर लावलंय आमच्या बाल्कनीत. त्यांत तांदळाचे दाणे आणि पाणी ठेवलंय. दिवसभर चिमण्यांची चिवचिव ऐकायला मिळते त्यामुळे. " वेदा.

"मी पण ठेवलं होतं असं दाणापाणी पक्षांसाठी. पण ती कबुतरंच यायची  तिथे आणि सगळी घाण करून ठेवायची तिथं. मग मी ते काम सोडूनच दिलं." सारंग.

"अरे वा.. आज काय इको फ्रेंडली गप्पा चालल्या आहेत वाटतं. " स्नेहलताईनं एन्ट्री घेत विचारलं.

"हो ना ताई.... आता हेच बघ ना. श्रावण गेला, गणपती, दसरा, दिवाळी... सगळे सण संपले.. आणि बहावा, पारिजातक, झेंडू, शेवंतीचे दिवसही गेले. पण आपल्या  या  काॅलनीत इतकी वेगवेगळी झाडं आहेत. हे नाही तर ते... निसर्ग थोडाच द्यायचं थांबतो ?. ऋतुमानाप्रमाणे काहीतरी नवनवीन    देतच असतो आपल्याला. " निखिल.

"अरे वा... निखिल तू तर अगदी मोठ्यांसारखं बोलायला लागलास हं ! " ताई म्हणाली. 

"अग ताई, तुला माहिती आहे कां, हा निखिल खरंच निसर्गप्रेमी आहे. नेहमी कुठे कुठे ट्रेक करत असतो. झाडं, प्राणी, पक्षी यांच्या सहवासात राहणं हा त्याचा छंद आहे. " साहिल.

"हे नव्हतं हं माहिती मला. " ताई म्हणाली. 

"माझे बाबा मला नेहमी गडकिल्ले, जंगलवाटा, निसर्ग उद्यानांमध्ये घेऊन जातात. त्यांच्याच पुढाकारानं या काॅलनीत ही इतकी निरनिराळ्या प्रकारची झाडं लावली गेली. नुसती झाडं लावून ते थांबले नाहीत, तर त्यांची देखभाल करण्याची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे. मलाही त्यामुळे याची गोडी लागली.एकदा माझ्या वर्गातली मित्रमंडळी आली होती. त्यांना घेऊन मी काॅलनीत चक्कर टाकली. तर त्यांना यांतली कितीतरी झाडं ओळखणं सोड, नुसती त्यांची नावंही माहित नव्हती. मला तर खूप आश्चर्यच वाटलं या गोष्टीचं...."   निखिल.

"अरे .... आश्चर्य कशाला वाटायला हवं ? " स्नेहलताई म्हणाली. "अलिकडे न आपल्याला अवती भोवती नजर टाकायलाच वेळ नसतो बघ. घराच्या खिडकीतून दिसतं तेव्हढंच आपलं आकाश. सगळीकडे नुसतं काॅन्क्रीटचं जंगल..... मला सांगा पौर्णिमा कधी येते आणि जाते, कुणाला कळतं तरी कां ? विजेच्या दिव्यांचा एवढा झगमगाट असतो आपल्या शहरात, मग ते पौर्णिमेचे चांदणं कसं अनुभवता येणार ? "

"म्हणून तर आम्ही दर महिन्याच्या शेवटच्या शनिवार रविवारी निसर्ग-ट्रेक ला जातो. " निखिल उत्साहानं सांगू लागला. " शहराच्या जरा बाहेर कुठेही गेलं,की हा निसर्ग आपल्याला अनुभवता येतो. त्यासाठी फार लांब जायलाच नको. शांत परिसर, हिरवीगार झाडं दिसतात, प्राणी पक्षी साद घालतात, मोकळी शुद्ध हवा भरभरून उत्साह देते. ही निसर्गाची साद ऐकायची आणि दोन दिवस  बाकी सगळं विसरून जायचं. सायंकाळचा गारा वारा आपल्याला एसी    विसरायला लावतो.  मोबाईल, व्हिडिओ गेम्स, टीव्ही सगळं काही विसरायला होतं.  दोन दिवस मुक्तपणे फिरायचं. मिळेल ते साधं खायचं. आणि भरपूर उर्जा घेऊन घरी परतायचं. कसलं फ्रेश वाटतं सांगू... आणि हो... पण बाहेर कुठेही कचरा करायचा नाही. वेडंवाकडं वागायचं नाही. अतिउत्साहाच्या भरात कोणाच्याही जिवावर बेतेल असं काही करायचं नाही. निसर्गाची हानी होईल अशी कोणतीही गोष्ट करायची नाही.

हे नियम आम्ही तर पाळतोच, पण तिथे आलेल्या इतरांनाही समजावून  सांगतो. " निखिल म्हणाला.

"व्वा..... मग आता पुढच्या वेळेला आम्ही पण येऊ तुमच्याबरोबर. काय मंडळी ...? " स्नेहलताईनं विचारताच सर्वजण तय्यार ....! 

"आम्हाला तर गांवच नाही. कायम इथे शहरातच. त्यामुळे या गावाकडच्या निसर्गातल्या गोष्टी अनुभवायला नाही मिळत. त्यामुळे मलाही आवडेल अशी भटकंती करायला..." साहिल.

"काय मजा आहे बघा... आम्ही दरवर्षी मे महिन्यात गांवी कोकणात जातो." सारिका सांगू लागली.           

"कैऱ्या, जांभळं, फणस खातो. समुद्रावर जाऊन यथेच्छ डुंबतो. पौर्णिमेचं चांदणं अनुभवतो, त्याचबरोबर अमावस्येच्या रात्री चांदण्यांनी गच्च भरलेलं आकाश पाहतो. रात्री पाहिलेला सप्तर्षीचा तारकासमूह, पहाटेकुठे दिशा बदलून गेला ते शोधतो, उत्तरेचा तेजस्वी ध्रुवतारा पाहतो, लालसर तांबूस मंगळ न्याहाळतो, असंख्य फुललेली इवली इवली रानफुलं पाहतो.आम्हाला या सर्व गोष्टी खूप आनंद देतात. पण बारा महिने तिथे राहणाऱ्यांना मात्र याचं काहीच अप्रुप वाटत नाही. त्यांना कौतुक मुंबई पुण्यासारख्या शहरातल्या माॅल्सचं आणि तिथे मिळणा-या गोष्टींचं . काय गंमत आहे नं ...? "

स्नेहलताईलाही हसू आलं, सारिकाच्या या निरिक्षणाचं कौतुकही वाटलं." अतिपरिचयात् अवज्ञा म्हणतात ना ते हेच. या दिखाऊ गोष्टींच्या मागे धांवताना आपण काय गमावतो आहोत हे आत्ता नाही लक्षांत येत. पण निसर्गाकडे केलेलं दुर्लक्ष, आपल्याला खूप महागात पडेल, एवढं मात्र खरं. बघता बघता अशी अचानक जबरदस्त चपराक बसते. भूकंप, महापूर, दुष्काळ अशा रुपात   नैसर्गिक संकट आल्यावर मग आपण विचार करू लागतो की असं कां बरं झालं ? पण म्हणतात ना, ' Better late, than never ' ... म्हणजे ...उशीरा कां होईना, शहाणपण सुचलं हेच खूप झालं.  अजूनही  वेळ गेली नाही. आता आपल्या पिढीनं तरी जागं व्हायला हवं. पर्यावरणाचा विचार करायलाच हवा. काय पटलंय ना ?

स्नेहलताईच्या म्हणण्याला सगळ्यांनी दुजोरा दिला.

-मधुवंती पेठे 

[email protected]

लेख १० - सांग ना स्नेहलताई ........