गुणग्राही पु. ल. 

दिंनाक: 08 Dec 2018 14:47:07


"मला या 'जीवन' वगैरे शब्दाची भयंकर धास्ती वाटते. जगण्याला 'जीवन' म्हणावं अशी माणसं हजार वर्षांतून एकदा जन्माला येतात, "व्यक्ती आणि वल्ली" या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकातल्या सखाराम गटणेच्या प्रकरणातील ही वाक्यं. खरं तर आयुष्याच्या प्रदीर्घ वाटचालीत आपल्याला सर्वांत जास्त आनंद दिला तो संगीताने असं पुलंचं मत होतं. वाचकांना मात्र पुलंच्या व्यक्तिचित्रांनी सर्वांत जास्त आनंद दिला. इतकचं नाही पुलंचं सर्वात दीर्घायुषी साहित्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. अंतू बर्वा, सखाराम गटणे, नंदा प्रधान, नारायण, चितळे मास्तर या व्यक्तिरेखा मराठी वाचक विसरणं शक्यच नाही. यातील अनेक  व्यक्तिचित्रे पूर्णतः काल्पनिक. त्यात रंजकता आणण्यासाठी कुठेही ओढूनताणून विनोदाचा वापर नाही. तरीही या व्यक्तिरेखा प्रयोगरूपाने रसिकांसमोर आल्या. आधी मराठी रंगभूमीवर आणि आता हिंदी मालिकेच्या रूपात.  हीच त्या व्यक्तिरेखांची जादू आहे.

१९४४ साली पुलंचं भय्या नागपूरकर नावाचं एक छोटंसं व्यक्तिचित्र अभिरुची मासिकात प्रसिद्ध झाले. त्यानंतर  व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी, कान्होजी आंग्रे, रवींद्रनाथ तीन व्याख्याने असे व्यक्तिचित्रांचे संग्रह पुलंच्या नावे जमा झाले. यातील "व्यक्ती आणि वल्ली"मधील काल्पनिक व्यक्तिरेखा हे समाजातले काही ठळक नमुने होते. हे नमुने मराठी समाजात, साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात वावरणाऱ्या वाचकांना परिचयाचे होते. पुलंनी त्यांनाच विशेषनाम दिली. काल्पनिक व्यक्तिरेखांमध्ये प्राण फुंकले आणि आपल्या खास शैलीत वाचकांपुढे त्या मांडल्या.

याउलट गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र यातील व्यक्तिचित्रणे ही वास्तवातील, पुलंच्या संपर्कात आलेल्या किंवा असलेल्या व्यक्तींवर आधारलेली आहेत. कुटुंबातील सदस्यांबरोबरच रक्ताच्या नात्याचे नसलेल्या रावसाहेबांचं जसं दर्शन होतं, तसंच ते नाट्यकर्मी चिंतामणराव कोल्हटकर, प्रकाशक रा.ज. देशमुख, हिराबाई, बालगंधर्व, अशा व्यक्तींचंही होतं. प्रत्यक्षातल्या व्यक्तींवर लेखन करताना आदर, स्नेह, मैत्री, एखादी व्यक्ती गेल्यानंतर तिच्या स्मरणातली व्याकुळता, एखाद्या व्यक्तीची गौरवास्पद कामगिरी अशा अनेक भावना त्यांतून दिसून येतात.

काल्पनिक असो वा वास्तवातील व्यक्तिचित्रे, ती वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे पुलंचा व्यापक लोकसंग्रह. आयुष्यात पुलंनी ज्या ज्या क्षेत्रात कार्य केलं, त्या त्या क्षेत्रातल्या ठळक व्यक्ती, वृत्ती, प्रथा, परंपरा गटबाजी, राजकारण या सगळ्या गोष्टी त्यांना जवळून बघता आल्या. म्हणूनच या व्यक्तींची बाह्यरूपं त्यांनी जशी सफाईने रंगवली तशीच त्यांच्या त्यांच्या जीवननिष्ठांचा शोधही पुलंनी तितक्याच आत्मीयतेनं घेतलेला दिसून येतो.

त्यासाठी पुल माणसांकडे फार बारकाईने बघत असावेत असंच म्हणावं लागेल. एखाद्या बारीकशा हालचालीतून, लकबीतून, ओझरत्या उल्लेखातून पुलं त्या व्यक्तिरेखांमध्ये संजीवनी फुंकतात असाच वाचकांना भास होतो. उदाहरणच बघायचं झालं तर हिराबाई बडोदेकर यांच्या वयाला ६० वर्षे पूर्ण होणार हा उल्लेख ऐकताच पुल लिहितात 'मी हिराबाईंचे वय सुरांच्या हिशेबात मोजत होतो.'

पुलंच्या या व्यक्तिरेखा काहीशा एकांगी स्वरूपाच्या आहेत असा टीकेचा सूरही लागल्याचे आढळते. या व्यक्तिरेखांमध्ये पुलंनी त्या त्या व्यक्तींचे फक्त गुणच गायले आहेत त्यामुळे ती व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे ते कळत नाही असा सूर अनेकदा टीकाकारांनी लावला. पण तो पुलंचा स्वभावविशेष आहे की ते फक्त गुणग्राहक होते. व्यक्तीमध्ये असणारे चांगले गुण इतरांनाही कळावेत कदाचित याच उद्देशाने त्यांनी व्यक्तिचित्रे लिहिली असावीत. संपूर्ण सत्य, वैचारिकता, अति चिकित्सा यापेक्षाही त्या व्यक्तीच्या स्वभावातील एखादीच छटा नेमक्या शब्दांमध्ये पकडणं हेच पुलंच्या व्यक्तिचित्रणात्मक लेखांचं वैशिष्ट्य म्हणता येईल.

-आराधना जोशी 
[email protected]

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या पुलंच्या लेखनाचे विविध पैलू आपण पुलोत्सव या सदरात बघणार आहोत. 

आनंदयात्री पु. ल.