लंगडी

दिंनाक: 07 Dec 2018 15:17:03


लंगडी हा खेळ महाराष्ट्रात सर्वांना परिचयाचा आहे. हा खेळ श्रीकृष्णानेसुद्धा खेळला आहे, असे म्हणतात. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत, राज्यांत, विविध शाळांत, संस्थेत वेगवेगळ्या नियमांनी हा खेळ खेळला जातो. उत्तर भारतात हा खेळ कुकुराजू, अरोनी किंवा गेतोसा या नावाने, तर दक्षिण भारतात कुंटीआटा या नावाने आणि पश्‍चिम भारतात तो ‘लंगडी’ या नावाने ओळखला जातो.

(मैदानाची आकृती वरील छायाचित्रामध्ये दिलेली आहे.)

मैदान कसे असावे :

१) मैदानाची मापे :

लंगडी खेळाचे मैदान चौकोनी असते. त्याला (ABCD) म्हणतात. लंगडी खेळांच्या जेव्हा स्पर्धा आयोजित केल्या जातात, तेव्हा ती ८ वर्षांखालील, १० वर्षांखालील, १२ वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १६ वर्षांखालील व खुला गट इत्यादी वयोगटांमध्ये खेळली जाते. वेगवेगळ्या वयोगटांसाठी खालीलप्रमाणे क्रीडांगण असतात.

• ८ वर्षांखालील (micro) ६मी. *  ६मी.

• १० वर्षांखालील (cadet) ७मी. *  ७मी.

• १२ वर्षांखालील (mini) ८मी. *  ८मी.

• १४ वर्षांखालील (Subsinior) १०मी. *  १०मी.

• १६ वर्षांखालील (Junior) १०मी. *  १०मी.

• खुलागट (Senior) ११मी. *  ११मी.

२)क्रीडांगणाभोवती २मी. रुंदीची रक्षीत हद्द असते, त्याला ‘राखीव क्षेत्र’ म्हणतात.

३)क्रीडांगणाचे (EF) बाजूस (आक्रमक प्रवेश क्षेत्राकडील भागास आंगण-१ (AEFC) व दुसर्‍यास आंगण-२ (BEFD) असे म्हणतात. १मी. रुंदीचा व २मी. लांबीचा अब बाजूस मधोमध असा काटकोन चौकोन असतो. (UVMX) त्यास आक्रमकाचे ‘प्रवेश क्षेत्र’ म्हणतात.

४)क्रीडांगण आखताना रेषेची रुंदी क्रीडांगणाच्या मापात अंतर्गत केलेली असते. रेषेची जाडी ३ ते ५ मी.मी. असते.

५)क्रीडांगण मातीचे किंवा हिरवळीचे; पण पृष्ठभाग टणक असलेले असावे. भुसभुशीत नसावे; तसेच खडी, वाळूचे किंवा डांबरी पृष्ठभाग असणारे चालत नाही. लाकडी पृष्ठभाग असलेले क्रीडांगण लगंडी खेळासाठी वापरतात.

लंगडीची व्याख्या : एका पावलाच्या तळव्याचा भाग जमिनीस टेकलेला असणे व त्याच पायावर लंगडत जाणे. या क्रियेस ‘लंगडी’ घालणे म्हणतात.

आक्रमक : लंगडी घालणार्‍या संघातील खेळाडूस ‘आक्रमक’ म्हणतात.

गतिमान आक्रमक : कोणत्याही एका पायाच्या पावलावर लंगडत जाऊन विरुद्ध संघाचे खेळाडू हस्तस्पर्शाने बाद करण्याचा प्रयत्न करणार्‍या खेळाडूस ‘गतिमान आक्रमक’ म्हणतात.

रक्षक : आक्रमक संघातील खेळाडूव्यतिरिक्त, विरुद्ध संघातील खेळाडूस ‘रक्षक’ म्हणतात.

संरक्षक : रक्षणाच्या पाळीसाठी जे रक्षक क्रीडांगणाच्या आत असतात त्याना ‘संरक्षक’ असे म्हणतात.

क्रीडांगण आखताना रेषेची रुंदी क्रीडांगणाच्या मापात अंतर्गत केलेली असते. रेषेची जाडी ३ ते ५ से.मी. मध्येच असते. क्रीडांगणाचे दोन समान भाग करणार्‍या रेषेस ‘मध्यरेषा’ असे म्हणतात.

बाद होणे : गतिमान आक्रमकाने संरक्षकास हस्तस्पर्श केल्यास किंवा संरक्षक बाहेर गेल्यास किंवा अंतिम रेषेला संरक्षकाचा स्पर्श झाल्यास तो बाद होतो.

खेळाचे नियम :

१. प्रत्येक संघात प्रत्यक्ष खेळणारे १२ खेळाडू व ३ राखीव खेळाडू असे एकूण १५ खेळाडू असतात. ९पेक्षा कमी खेळाडू असल्यास सामना खेळता येत नाही. ९ किंवा ९पेक्षा जास्त खेळाडू असल्यास सर्व खेळाडू आक्रमण करू शकतील, परंतु तीनच्या पटीत असणार्‍या खेळाडूंनाच संरक्षण करता येते.

२. एखाद्या संघात कमी खेळाडू असल्यास आक्रमण करणार्‍या संघाला त्या वेळी जितके खेळाडू १२ पेक्षा कमी असतील, तेवढे गुण मिळतात. (उदा., ९ खेळाडू असले तरी १२ गुण)

३. आक्रमण करणार्‍या संघात १२पेक्षा कमी खेळाडू असल्यास असलेल्या खेळाडूंनी एकदा आक्रमणाची पाळी संपल्यास, त्या संघाची आक्रमणाची पाळी पूर्ण झाली असे समजले जाते.

४. नाणेफेक करून दोन्ही संघनायकांपैकी जो नाणेफेक जिंकेल, तो आक्रमण की संरक्षण हे पंच ठरवतो.

५. क्रीडांगणात लंगडी घालण्यास जाणार्‍या गतिमान आक्रमकाने आक्रमक प्रवेश क्षेत्रातूनच लंगडी घालावयास सुरुवात केली जाते.

७. दोन्ही संघांनी पहिले आक्रमण उजव्या पायाने, तर दुसरे आक्रमण डाव्या पायाने लंगडी घालूनच केले जाते.

८. गतिमान आक्रमक खेळ चालू असताना मर्यादा रेषेच्या बाहेर जाऊ शकतो. मात्र क्रीडांगणातील सर्व नियम त्याला क्रीडांगणाबाहेरही पाळावे लागतात. मर्यादा रेषेच्या बाहेरून त्याला संरक्षकास बाद करता येत नाही.

९. तुकडीतील तिसरा खेळाडू बाद झाल्यानंतर आक्रमकास ज्या अंगणात असेल, त्यातून त्याने दुसर्‍या अंगणात जाणे आवश्यक असते.

 सामन्याचा कालावधी :

१. ८ वर्षे वयोगट - ५ मिनिटे

२. १० वर्षे वयोगट - ५ मिनिटे

३. १२ वर्षे वयोगट - ५ मिनिटे

४. १४ वर्षे वयोगट - ७ मिनिटे

५. १६ वर्षे वयोगट - ७ मिनिटे

६. खुलागट पुरुष/महिला - ९ मिनिटे

११.आक्रमण व संरक्षण अशा दोन पाळ्या मिळून एक डाव होतो. एका सामन्यात असे दोन डाव असतात. दोन पाळ्यांत २ मिनिटे आणि दोन डावांत ५ मिनिटे विश्रांती असते.

१२.संरक्षण करणार्‍या संघनायकाने राखीव खेळाडूंची नावे सामना सुरू होण्यापूर्वी गुणलेखकाकडे नोंदवणे आवश्यक असते.

१३.आक्रमक बाद झाल्यानंतर तो अंतिम मर्यादेच्या बाहेर जाईपर्यंत दुसर्‍या आक्रमकाने क्रीडांगणात (आक्रमणासाठी) लंगडी घालावयास यायचे नसते, तसे झाल्यास पंच त्यास परत मागे पाठवतात.

सामना अधिकारी :

१ सरपंच, २ पंच, १ गुणलेखक, १ वेळाधिकारी, २ रेषापंच. एकूण - ७ अधिकारी.

सामना सुरू होण्यापूर्वी गुणपत्रक, खेळाचे मैदान, खेळाडू यांची तपासणी करून पंच नाणेफेक करतात.

पंचप्रमुखांना विनंती करून संघनायक/प्रशिक्षक खेळाडू बदली करू शकतात.

खेळाडूंचा गणवेश :

हापपॅन्ट, बनियन/टी शर्ट. मुलींसाठी फ्रॉक/टी शर्ट, हाप पॅन्ट.

-रोहिदास भारमळ

[email protected]