कमळ

दिंनाक: 06 Dec 2018 14:58:47


कमळ हे भारतीय संस्कृतीचे लाडके व अर्थपूर्ण प्रतीक आहे. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले गेलेले आपले राष्ट्रीय पुष्प कमळ! दिसायला सुंदर असणारी ही जलवनस्पती निलाबियांसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलांबी न्युसीफेरा आहे. तलाव आणि पाणथळ जागांचे वैभव म्हणजे कमळाचे फूल तिच्या सुमारे ३० जाती जगभर आढळतात. मात्र तिचे मूळस्थान भारत, चीन, जपान असावे. एराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत तिचा प्रसार झाला आहे.

फूल आकाराने मोठे, भरपूर पाकळ्या - त्यांचा रंग गुलाबी किंवा पांढरा (सफेद) - ही फुले जुलै-ऑक्टोबरमध्ये येतात. फुलाला मंद सुगंध असतो, तसेच त्यात असणाऱ्या मधुवर भ्रमर नेहमी रुंजी घालत असतात. ही वनस्पती १-१.५ मी. उंच आणि ३ मी.पर्यंत पसरते. खोड लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते. म्हणून त्याला मूलक्षोड (कंद) म्हणतात. त्याचे फुलांच्या रंगावरून दोन उपप्रकार पडतात. पांढरे फूल पुण्डरीक हे सरस्वतीला प्रिय तर लाल फुल पद्म हे श्रीगणेशाला प्रिय पुष्प. हे फारच दुर्मीळ आहे. या फुलाला खूप सुट्या पाकळ्या व सुटे पुंकेसर असतात. ह्या पाकळ्या सौंदर्य प्रसाधनात वापरतात. आणि यांच्या पाकळ्यांचा रस अनेक रोग व्याधींवर गुणकारी प्राचीन संस्कृत वाड़मयात हिच्याबद्दल कालिदास व इतर भारतीय कवींनी वारंवार उल्लेख केला आहे. ही वनस्पती सामान्यतः गोड्या, उथळ पाण्यात वाढते. तिच्यामध्ये दुधी चीक असतो. कमळाची वाढ भरपूर होते ती उन्हाळा व पावसाळ्यात हिला भरपूर सूर्यप्रकाश लागतो.

पाने मोठी वर्तुळाकार छत्राकृती, ६०-९० से.मी. व्यासाची असतात. पानाचे लांब देठ असून पानावरील शिरा पानाच्या मध्यापासून किरणाप्रमाणे पसरलेल्या असतात. कमळाची पाने आणि फुले पाण्याच्या संपर्कात न राहता पाण्यावर येऊन वाढतात. पानावर मेणाचा थर असल्याने ती पाण्यावर तरंगत असूनही खराब होत नाहीत. भारतीय संस्कृतीच कमलपुष्प हे सर्वसामान्य प्रतीक अनेक अर्थांनी समर्पक आहे. चिखलातून निर्माण झालेल्या कमळावर भोवतालच्या घाणीचा लवलेशही चिकटून राहत नाही. हे त्याचे वैशिष्ट्य मोहवणारे आहे. हिंदू धर्माप्रमाणेच जैन, बौद्ध धर्मातही कमळाला मोठे महत्त्व आहे. अनेक धर्मग्रंथ, शिलालेख, शिल्प महाकाव्य, श्लोक सर्व ठिकाणी कमळ आढळून येतं. कमळाची पाने अनेक कीटक, पक्षांचे आश्रयस्थान आहे. कमळाला विविध संस्कृत नवे आहेत. उदा., कुमुद, नीरजा, पुण्डरीक, पद्म, राजीव, पड़कज. गर्द लाल फुले फक्त सकाळी उमलतात.

फुलांचा रंग जातीनुसार वेगवेगळा असतो. नीळसर जांभळ्या जातीचेही याचे फूल असते. त्याला पुष्कर वा राजीवही म्हणतात. कमळाचे खोड, पान आणि बी यांचा वापर खाण्यासाठी करतात. रीबोफ्लविन, नियसिन ही ब जीवनसत्वे, क आणि इ जीवनसत्वे कमळात असतात. कमळाची कोवळी पाने औषधी असून त्यांचा रस गुणकारी आहे.

कमळाच्या फुलाच्या पाकळ्या गळून पडल्या की त्याचा थालामास भाग फळात रूपांतरीत होतो. त्यात काळ्या रंगाच्या बिया असतात. त्यापासून नवीन रोपांची निर्मिती करता येते. फळाला कमळकाकडी, बियांना पद्मबीज व कांदास शालुक म्हणतात. कंद (गाद्द्डे) भाजून खातात, वाळविलेले काप आमटीत घालतात, तळून खाताना किंवा लोणचे करतात. तसेच त्यापासून गोड, सुवासिक व पौष्टिक आरारूटही बनवतात. बिया भाजून त्याच्या पिठाचे लाडू वा भाकरी उत्तर प्रदेशात वापरात असते. टंचाईच्या काळात या वनस्पतीचे सर्व भाग खातात. कोवळ्या पानांच्या देठीपासून दोर बनवतात. फुलांपासून अत्तर काढले जाते. फुले आंकुचन करणारी असून पटकी व अनिसार यावर गुणकारी आहे. मुळांची भुकटी मूळव्याध, आमांश, अग्निमांध इत्यादींवर गुणकारी असून नायटा व इतर त्वचारोगावर लेप म्हणून लावतात. याची बी अतिशय पौष्टिक व ओकारी थांबविण्यासाठी योग्य. फुलांचा काढा हृदयास शक्तिवर्धक असतो. कमळाचं फळ झारीच्या तोंडाच्या आकाराचं असतं. त्यात बिया जडलेल्या असतात. बियांची रुजवण क्षमता हजारो वर्ष असते. गंमत म्हणजे इजिप्तच्या पिरॅमिडसमध्ये ममींजवळ सापडलेल्या कमळाच्या बिया रुजल्याचा उल्लेख आहे.

फुलांना धार्मिक महत्त्व असल्यामुळे व कमळकाकडीलाही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. बरेच शेतकरी कमळाची शेती करतात. चीन, जपानमध्ये कमळकाकडी (कंद)साठी मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. वाळलेली फळ डेकोरेशनसाठी वापरतात.

कमळाला ज्ञानाचे प्रतीक मानतात. कमल चिखलात उगवते, परंतु चिखलाचा एकही वाईट गुण ते घेत नाही. ही गोष्ट आपल्याला खूप काही शिकवते.

कमळ राष्ट्रीय फुल आहे. तसेच देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारातही कमळाचा उल्लेख आहे. भारतीय डाक विभागानेदेखील कमळावर तिकीट प्रकाशित केले आहे. बुद्धीचे आसन कमल आहे. त्याला पृथ्वीचे प्रतीक मानले आहे. बुद्धाचे आसन कमळच. 

-मीनल पटवर्धन 

[email protected]

बकुळ