फूल की फूलझाड?

दिंनाक: 05 Dec 2018 16:20:16


पालक म्हणून मोठ्ठं होताना मनात कायम डोकावणारा एकच विचार म्हणजे माझं किंवा आमचं लाडकं पाल्य, त्याला मी किंवा आम्ही फुलासारखं जपणार. फूल आहे ते माझं त्याला ऊन्ह लागता नये, पाऊस वार्‍याचा त्रास होता नये, ते कधीच कोमेजता नये आणि असं बरंच काही. म्हणून मग या फुलासाठी काय करू नि काय नको असं होऊन जातं. सतत त्याला जपण्याची स्वत:वर सक्ती, सतत त्याच्या काळजीचा आपण वागवत असलेला भार आणि सतत माझ्या फुलाला काही होणार नाही ना याची काळजी. आपण स्वत: त्याच्या संगोपनाचा घेत असलेला अवाजवी ताण आणि त्याला सतत जिवा पल्याड सांभाळण्यातून त्याचे छाटत असलेले पंख या दोन अपरिमित हानिकारक गोष्टी या फुलाच्या जोपासनेच्या विचारातून आपण वाढवत असतो. पण विचार करा बरं, खरंच आपल्याला फूल वाढवायचं आहे का? फूल कधी वाढतं का? आणि त्याला नैसर्गिक वातावरणातून बाहेर काढलं, ते अति हाताळलं तर ते लवकर कोमेजतंच. तसं करायचं असतं का आपल्याला आपल्या पाल्याच्या बाबत?

आपल्याला आपला पाल्य दिवसेंदिवस बहरत जाणं पाहायचं असतं, त्याला नवीन मुळं पसरवून घट्ट उभं राहताना आपल्याला पाहायचं असतं, त्याला आपला विस्तार वाढवताना पाहून आपलं जीवन सार्थकी लावायचं असतं, त्याला नवी पालवी फुटताना पाहून आपलं मन कृतार्थतेने भरून यायला हवं असतं, म्हणूनच त्याला फुलासारखं न वाढवता फुलझाडासारखं वाढवलं पाहिजे. ‘बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत’ हे लक्षात ठेवून त्याला माती, पाणी पुरवलंच पाहिजेच; पण बरोबरच त्याला योग्य सूर्यप्रकाश, वार्‍यावर डुलण्याचं स्वातंत्र्यही दिलं पाहिजे, कधी वार्‍यावादळाचा तडाखा बसलाच तर आपण त्याच्यासोबत ठाम उभं राहिलं पाहिजे, योग्य ते मार्गदर्शन करून निर्णय घ्यायला मदत केली पाहिजे. मग बघा आपलं फुलझाड कसं जोमाने बहरेल आणि बहुरंगी, बहुगंधी फुलं देईल.

या फुलझाडांना अधूनमधून आळसाची, वाईट संगतीची कीड लागण्याची शक्यता असते. अशा वेळी एकतर कीड लागणार नाही याची काळजी तर घेतलीच पाहिजे बरोबर जर का ती लागली तर कठोर होत त्याची किडलेली पानं, कोमेजलेल्या फांद्या, अवास्तव वाढत जाणार्‍या फांद्या योग्य पद्धतीने तोडून किंवा छाटून टाकत फूलझाड आणखी सशक्त करण्याची जबाबदारी आपलीच असते, हेही विसरून जाता उपयोगी नाही. त्यामुळे पालक म्हणून एखाद्या माळ्यासारखी कधी प्रेमळ, भावूक होत, तर कधी कर्तव्यकठोर होत आपण आपली भूमिका निभवायला हवी हे नक्की!

-मेघना जोशी 

[email protected]l.com

पालकत्त्वसंदर्भात चर्चा करण्यासाठी सदर ‘उमलतं पालकत्व’.
लेख १ - विचार पालकत्त्वाचे

विचार पालकत्त्वाचे