आपली जशी एकतारी असते, तशी लाऊ ही बंगालमधील एकतारी. आपल्याकडील एकतारीस दोन तारा असतात. पण बंगाली एकतारीस एकच तार असते. भोपळा खालच्या बाजूस असतो. त्याच्या दोन्ही बाजूस एका बांबूस छेद घेऊन त्या बांबूची एक-एक बाजू भोपळ्याच्या दोन्ही बाजूस डकवलेली असते. हा बांबू सुमारे दीड-दोन फूट उंच असतो. त्याच्या वरच्या बाजूस (बांबूच्या गाठीच्या तेथे) खुंटी बसवलेली असते. भोपळ्याच्या खालच्या बाजूस कातडे बसविलेले असते. त्याच्या मधोमध छिद्र असते. त्यातून तार ओवून घेऊन ती बांबूच्या वरच्या खुंटीत बसवलेली असते. कातड्यापासून बांबूच्या दोन छेदांमधून ती तार वर खुंटीपर्यंत गेलेली असते. भोपळ्याचे एक तोंड उघडे असते. हे वाद्य षडज किंवा पंचम या स्वरात लावतात. गाणे मध्यमातील असल्यास, मध्यमात लावतात.

खर्जात लावल्यास त्याचा आवाज मधुर व भारदस्त येतो. हे वाद्य वाजविताना उजव्या हाताच्या बोटाने ही तार छेडायची  व डाव्या हाताच्या चार बोटांनी तो छेडलेला बांबू दाबायचा-सोडायचा. म्हणजे समजा पंचमात तार लावली असल्यास बोटांनी बांबू दाबल्यास मध्यम स्वर वाजतो.  बोटे सोडल्यास पंचम स्वर वाजतो. फक्त आपल्या डाव्या व उजव्या हाताच्या बोटांनी हलका दाब देऊन, गाण्यांचा मूड किंवा स्वरांचा योग्य तो परिणाम कसा आहे हे बघून हे वाद्य वाजवायचे असते. पण वाजविताना तार ज्या स्वरात लावलेली असेल तो स्वर आपल्या हातच्या दाबाने कायम टिकवायचा असतो. सर्व खेळ हाताने दाब देण्यावर अवलंबून असतो. जेवढा भोपळा जुना - मोठा, तेवढा आवाज खर्जातील येतो. जेवढे लाकडी खोड लहान, तेवढे हे वाद्य हायपीचला (वरच्या स्वरात) वाजते. या बंगाली वाद्याचा बाज खर्जातल्या स्वरांचाच आहे. हे वाद्य बंगालच्या रवींद्र संगीतात भजनात व बंगाली लोकगीतात वाजवितात. याचा वापर संगीतकार कै. एस. डी. बर्मन यांनी हिंदी चित्रपटातील अनेक नावाडी गीतांतून केला आहे. पाण्याच्या लाटांच्या आवाजाचा म्युझिकल इफेक्टही यातून येतो. उदा., सुनो मोरे बंधू रे..... (चित्रपट : बंदिनी), काहे को रोए... (चित्रपट : आराधना), गंगा आये कहां से... (चित्रपट : सुजाता), धीरे से आना बगियन में... (चित्रपट : चलती का नाम गाडी), नकोस नौके परत फिरू रे... (गीतरामायण : मूळ ध्वनिमुद्रण).

यांचा आवाज ऐकण्यासाठी ही गाणी नक्की ऐकावीत.  

-यशोधन जटार

[email protected].com

 

वाद्यरंग या सदरात भारतीय संगीतातील तानपुरा या प्राचीन वाद्याविषयी माहिती घेऊ.

तानपुरा