वाढ-दिवस

दिंनाक: 31 Dec 2018 14:43:25

शालिनीला कामावर जायला उशीर झाला होता. ती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कारकून म्हणून काम करत होती. राहायला डोंबिवलीत. घराबाहेर रस्त्यावरून रिक्षा पकडून ती डोंबिवली स्टेशनच्या रिक्षास्टँडवर आली. रिक्षावाल्याला पैसे देऊन प्लॅटफॉर्मच्या दिशेनं निघाली. तेवढ्यात एका कोपर्‍यात तिला एक दहा-बारा वर्षांचा मुलगा रडताना दिसला.
मला माझ्या घरी न्या. माझ्या आईकडे न्या. मी हरवलोय.
ती दोन पावलं त्याच्या दिशेनं गेली आणि अचानक तिचं लक्ष प्लॅटफॉर्मच्या घड्याळाकडे गेलं. तिला खूप उशीर झाला होता. लगेच तिनं आपले पाय प्लॅटफॉर्मच्या दिशेनं वळवले. गाडी प्लॅटफॉर्मवर उभीच होती. शालिनी गाडीत चढली. मात्र मनात तोच मुलगा; त्याचा रडणारा चेहरा, त्याचे हुंदके आणि त्याचा तो आवाज, ‘मला माझ्या घरी न्या. माझ्या आईकडे न्या. मी हरवलोय.’ 
गाडी सुरू झाली. पुढे जाऊ लागली; पण मनातला मुलगा जाईना. अचानक तिच्या मनात काय आलं कुणास ठाऊक! तिनं चालत्या गाडीतून बाहेर उडी घेतली आणि धावत धावत त्या मुलाजवळ पोहोचली. मुलाचं रडणं सुरूच होतं.
‘काय झालं? तू का रडतोयेस?’ शालिनीनं प्रेमाने विचारलं.
‘मी हरवलोय. मला घरी जायचंय.’ मुलगा म्हणाला.
‘ठीक आहे, मी तुला घरी सोडते. आधी रडणं थांबव. हे पाणी पी.’ तिनं तिच्याजवळचं पाणी मुलाला दिलं. शालिनीच्या मायेच्या शब्दांमुळे मुलगा शांत झाला.
‘तुझं नाव काय?’
‘बबडू.’
‘कुठं राहतोस तू?’
‘भारत नगर.’
एव्हाना आजूबाजूला बरीच माणसं जमा झाली. सगळी आपापसात ‘काय झालं, काय झालं’, म्हणत, चर्चा करू लागली.
‘भारत नगर? कुठे आहे हे? डोंबिवलीत?’, शालिनीनं आस्थेनं विचारलं.
‘नाही! तिकडे, लांब. बोगद्याच्या पुढे.’ बबडूनं माहिती पुरवली.
बोगद्याच्या पुढे? शालिनी विचारात पडली. तिथं जवळ कुठेही बोगदा नव्हता.
‘पारसिक बोगद्याजवळ. कळवा इस्ट.’ एक जण म्हणाला.
तिनं क्षणभर विचार केला आणि बबडूचा हात धरत त्याला म्हणाली, ‘चल, मी तुला तुझ्या घरी सोडते.’
‘नाही, नाही आपण त्याला पोलिसांकडे नेऊ. ते त्याचं घर शोधतील.’ एक साठीचे गृहस्थ म्हणाले.
‘नाही! मला पोलिसांकडे नेऊ नका. मला त्यांची फार भीती वाटते. मला आईकडे जायचंय.’ मुलगा पुन्हा रडू लागला.
‘ठीक आहे. ठीक आहे. नाही नेत मी तुला पोलिसांकडे. चल, मीच तुला घरी सोडते.’ तिथली बरीच माणसं तिला ‘असं करू नये’ म्हणून सांगत होती. मात्र तिचा निर्णय झाला की झाला. तिनं बबडूचा हात धरला आणि ती निघाली. गाडी पकडून ती कळवा स्टेशनवर पोहोचली. रिक्षास्टँडवर आली.
‘आम्ही इथून रिक्षा पकडतो.’ बबडूनं तिला सांगितलं. तेवढ्यात त्यांच्यासमोर एक रिक्षा येऊन थांबली. बबडू आणि शालिनी रिक्षेत बसले. साधारण वीसेक मिनिटांनी रिक्षा एका मोठ्या झोपडपट्टीबाहेर थांबली.
‘इथं राहतोस का तू?’ शालिनीनं बबडूला विचारलं.
‘हो.’ म्हणत बबडूनं रिक्षेतून उडी मारली.
रिक्षावाल्याचे पैसे देऊन ती बबडूसोबत त्याच्या घराच्या दिशेनं निघाली. 
पंधरा-वीस मिनिटं ती दोघं चालत होती, मात्र बबडूचं घर काही येत नव्हतं. तिनं मागे वळून पाहिलं. तिला कळलंच नाही, ती कुठे आली आहे. अंधार्‍या अरुंद गल्ल्या, कुबट वास, टेकड्यांचे चढउतार यात आपण हरवून गेलो आहोत, असंच तिला वाटत होतं.
‘बबडू, अजून किती लांब आहे?’ शालिनीचा धीर सुटला.
‘हे इथेच.’ असं म्हणून बबडूनं समोरच्या झोपडीचं दार दाखवलं. ती माझी खोली. दार बंद होतं. 
शालिनीनं दार ठोठावलं. दार उघडलं. समोर बबडूची आई होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. बबडूला समोर पाहताच ती त्याला बिलगली आणि आणखी जोराने रडू लागली. अर्थात, हे तिचं दु:खाचं रडणं नव्हतं. आपल्यामुळे या मायलेकरांची पुन्हा भेट झाली, याचा शालिनीला खूप आनंद झाला. 
इतक्यात कोणीतरी तिला आत ढकललं आणि तिचा तोल गेला
खरं तर ती बबडूच्या घरी गेलीच नव्हती. ती तर अजूनही रिक्षेतच होती. बबडू तिच्या जवळच होता. मात्र मध्येच रिक्षा ब्रेक लागून थांबली होती, म्हणून तिचा तोल गेला होता आणि तिचं ते स्वप्न भंगलं होतं.
रिक्षा थांबताच समोरचा एक दाढीवाला माणूस घाईगडबडीने रिक्षेत चढला. बबडूला शंभराची नोट देऊन म्हणाला, शाब्बास राम्या!
ती शंभराची नोट कपाळाला लावून बबडू त्या दाढीवाल्याला म्हणाला, ‘थँक्यू उस्ताद!’ आणि रिक्षेतून उतरून निघून गेला.
शालिनीला काही क्षण काय होतंय ते कळलंच नाही, पण आपण कोणत्यातरी संकटात सापडलोय हे लक्षात आलं.
‘कोण आहात तुम्ही?’ शालिनीनं जरा दरडावून त्या दाढीवाल्याला विचारलं.
‘ए, गप!’ दाढीवाला शालिनीवर ओरडला. अब्दुल, ठिकाण्यावर चल. तो दाढीवाला रिक्षावाल्याला उद्देशून म्हणाला आणि त्याने शालिनीच्या ओढणीनेच तिचे हात बांधले. तोंडात कापडाचा बोळा घातला. तिचा मोबाईल काढून घेतला. रिक्षेचे पडदे सरकवले. रिक्षा एका निर्जन वाटेला लागली.
शालिनी खूप घाबरली. हे कोण लोक आहेत, तिला काहीही कळत नव्हतं. एक गोष्ट मात्र तिच्या लक्षात आली की, तो बबडू; बबडू नसून कोणी राम्या होता. तो, रिक्षावाला आणि तिच्या बाजूला बसलेला दाढीवाला यांनी योजनापूर्वक तिचं अपहरण केलं होतं. पण का? हे मात्र तिला समजत नव्हतं. आता आपल्या पुढं काय संकट वाढून ठेवलंय याचाच ती सारखा विचार करू लागली. त्या विचाराबरोबर तिची भीती वाढू लागली. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी ती प्रयत्न करू लागली, मात्र तिला काहीही करता येत नव्हतं.
ती माणसं कोण आहेत? हे तिच्या लक्षात येत नसलं तरी त्या दाढीवाल्याला कुठेतरी पाहिलं आहे, असं तिला वाटत होतं. पण नीट काही आठवत नव्हतं.
तसं तिचं कोणाशीही वैर नव्हतं. तिच्या कामाच्या ठिकाणी, नातेवाईक, मित्र-मंडळी आणि घराच्या परिसरातील लोकांशी ती नेहमीच चांगलं वागते. त्यांच्या मदतीला धावून जाते. अडल्यानडल्याला मदत करणं तिला मनापासून आवडतं. उलट, तिच्या या स्वभावामुळे तिच्या घरचे, मित्रमैत्रिणी तिला ओरडतात. ‘जगकल्याणाचा काय मक्ता घेतला आहेस तू?’, ‘ही नसती उठाठेव का करतेस?’, ‘जरा डोकं ठिकाणावर ठेवून मदत कर लोकांची’, ‘एक दिवस या मदतीमुळे तू गोत्यात येशील’, अशी अनेक वाक्यं तिला ऐकावी लागत. पण तिच्या स्वाभावात काही बदल झाला नाही आणि आज त्यांची भीती खरी ठरली.
रिक्षा एका फार्महाऊसच्या गेटमधून आत शिरली. एका घरासमोर थांबली. रिक्षावाला आणि तो दाढीवाला इसम दोघांनी शालिनीला जबरदस्तीने रिक्षेतून खाली उतरवलं आणि त्या घरात नेलं.
एका रिकाम्या खोलीत एका खुर्चीवर तिला बसवलं. त्याच खुर्चीला तिला बांधलं. मग त्या दोघांनी सर्व दरवाजे बंद केले. तो रिक्षावाला निघून गेला. मात्र दाढीवाला तिथंच पोत्यांच्या चळणीवर बसून राहिला.
शालिनीनं त्या खोलीत चौफेर नजर फिरवली. आपल्याला नक्की कुठं आणलं आहे, याचा ती अंदाज घेऊ लागली.
त्या खोलीच्या तीन बाजूच्या भिंतींना दरवाजे होते. समोरच्या भिंतीवर एक घड्याळ होतं. त्यात साडेनऊ वाजले होते. शालिनी आठ वाजता डोंबिवली स्टेशनवर आली होती. त्याला आता दीड तास झाला होता.
‘हंऽ काम फत्ते!’ दाढीवाला कोणाशीतरी फोनवर बोलत असल्याचं शालिनीनं ऐकलं.
पहिल्यापासूनच हा दाढीवाला शालिनीला ओळखीचा वाटत होता, पण आठवत नव्हतं. तिनं पुन्हा आठवण्याचा प्रयत्न केला आणि अचानक प्रकाश पडावा त्याप्रमाणे तिला आठवलं, हा दाढीवाला तोच होता; ज्यानं डोंबिवली स्टेशनवर आपल्याला भारतनगरचा पत्ता सांगितला होता. म्हणजे हा माणून तिथून बबडूच्या उर्फ राम्याच्या मदतीसाठी आणि आपल्या अपहरणासाठी आपल्या मागावर होता तर! तिच्या अंगावर काटा उभा राहिला. आपण फार मोठ्या संकटात सापडलो असल्याची पुन्हा एकदा तिला जाणीव झाली.
भिंतीवरच्या घड्याळात दहाचे ठोके पडले, तसे दाढीवाल्याने शालिनीच्या पर्समधून दोन डबे बाहेर काढले. शालिनी नेहमी ऑफिसला जाताना नाश्ता आणि दुपारचं जेवण असे दोन डबे घेऊन जाते. त्यातला नाश्ताचा डबा उघडून दाढीवाल्यानं तिचे हात आणि तोंड सोडले.
वाचवा, वाचवा. मला वाचवा. पूर्ण ताकदीनिशी शालिनी ओरडू लागली.
दाढीवाला निर्विकारपणे तिच्या समोर जाऊन बसत म्हणाला, ‘ओरड, आणखी जोरात ओरड. इथं ना कोणी तुला वाचवायला येईल, ना तुझा आवाज ऐकायला.’
शेवटी ओरडून ओरडून ती थकली आणि  निमुटपणे नाश्ता करू लागली. पण नाश्ता करताना तिच्या मनात एक प्रश्‍न मात्र चमकला. ‘या दाढीवाल्याला कसं कळलं, आपण दोन डबे आणतो ते?’ बराच विचार केल्यानंतर तिच्या डोेक्यात एक विचार आला. ‘आपल्या ऑफिसमधलं तर कोणी यामागे नसेल? पण नेमकं कोण? आणि का?’ ऑफिसमधील सगळीच माणसं तिच्या डोळ्यांसमोरून सरकू लागली. तिचे साहेब, लहान लहान गोष्टींवरून तिच्याशी रोज भांडणारी तिची सहकारी सुषमा, अगदी परवा कामावरून ज्याच्यावर ती ओरडली तो मारुती शिपाई. सारे सारे चेहरे क्षणात तिच्यासमोर आले. पण यामागे कोण असेल हे काही लक्षात येईना. अनेक प्रश्‍नांप्रमाणे हा प्रश्‍न देखील अनुत्तरीतच राहिला.
डबा संपला, तसं दाढीवाल्यानं पुन्हा तिला खुर्चीला बांधलं. तोंड बंद करण्याची गरज नव्हती. कारण तिचं ओरडणं ऐकायला आजूबाजूला कोणी नव्हतं. शालिनीलाही याचा प्रत्यय मघाशी आला होता. म्हणून ओरडून शक्ती वाया घालवण्यापेक्षा इतर काही मार्ग काढावा, असं तिनं ठरवलं.
दुपारी दीड वाजता दाढीवाल्यानं जेवणापुरते तिचे हात सोडले. जेवण झालं, तसे पुन्हा हात बांधले गेले.
तिनं घाबरत घाबरत त्या दाढीवाल्याला विचारलं, ‘मला का आणलं आहे इथं? सांगा ना. तुमचा हेतू काय आहे? मी काय बिघडवलंय तुमचं?’
जास्त डोकं खाऊ नकोस. तुला धडा शिकवायला इथं आणलं गेलंय. वेळ आल्यावर कळेलंच. असं म्हणून तिनं पुढे काही विचारण्यापूर्वीच तो बाहेर निघून गेला.
‘आपल्याला धडा शिकवायला! आपण काय केलंय कुणाचं?’ तिनं पुन्हा स्वत:ला प्रश्‍न विचारला. मेंदूवर जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न केला. कोण असा माणूस आहे, ज्याला आपण त्रास दिला आहे? आणि तोही इतका की त्यानं आपलं अपहरण केलं आहे. शालिनीसमोर अशी कोणतीही व्यक्ती येत नव्हती. तिची अस्वस्थता वाढू लागली. आपल्यासमोर कोणतं ताट वाढून ठेवलं आहे, या विचाराने भीती आणि अस्वस्थता वाढू लागली. मनाने धीट असणार्‍या शालिनीला आता मात्र रडू यायला लागलं. आई-बाबा, बहीण-भाऊ, मित्र-मैत्रिणी सगळे आठवायला लागले. आपण आता त्यांना पुन्हा भेटू शकू की नाही याविषयी शंका वाटायला लागली. आंधळेपणाने दुसर्‍यांना मदत करण्याची फार मोठी शिक्षा तिला मिळाली होती. तिची माणसं तिला जे समजावून सांगायची त्याचं महत्त्व आज तिला कळत होतं. मात्र आता फार उशीर झाला होता. 
दुसर्‍या दिवशी शालिनीचा वाढदिवस होता. परंतु कदाचित तो दिवस ती पाहू शकणार नव्हती. शालिनी जोरजोराने रडायला लागली. रडूनरडून तिचे डोळे लाल झाले. धाप लागली आणि शेवटी थकून ती झोपी गेली.
संध्याकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान तिला जाग आली. तेव्हा त्या जागेचा चेहराच बदलला होता. इतका की काही क्षण तिला वाटलं, आपल्याला दुसर्‍या कुठल्या जागी आणलं आहे. पण ते तीन दरवाजे आणि भिंतीवरचं घड्याळ यामुळे ती तीच जागा असल्याचं शालिनीनं ओळखलं.
ती पूर्ण खोली स्वच्छ केली होती. त्या पोत्यांच्या चळणी काढून टाकल्या होत्या. मध्यभागी काही सामान ठेवलं होतं. जणू काही एखाद्या पूजेची तयारी चालू होती. खोलीत आता आणखी काही माणसं वावरत होती. काही स्त्रिया, काही पुरुष. ती कोणालाच ओळखू शकली नाही. सर्वांनी कापडाने चेहरे झाकले होते. त्यामुळे ती माणसं तिच्या ओळखीची असावी, असा तिला संशय आला.
‘कोण आहात तुम्ही?’ शालिनीनं त्या सर्वांना प्रश्‍न केला. त्यातील एकानं दरवाजातील दुसर्‍याला खुणावलं. तो बाहेर गेला. काही क्षणात दाढीवाला आत आला.
दाढीवाल्यानं ओरडून विचारलं, ‘काय कटकट आहे तुुझी?’
‘कोण आहेत ही माणसं? आणि काय चाललंय इथं?’
‘बळी!’ दाढीवाला म्हणाला, ‘आज इथं तुझा बळी देणार आहेत. उद्या तुझा वाढदिवस आहे ना! तो तुझा नवीन जन्म असेल. या जन्मातून रात्री बाराला तुला मुक्ती मिळेल.’ दाढीवाला गंभीरपणे म्हणाला आणि निघून गेला. शालिनीच्या पायाखालची जमीन सरकू लागली. मृत्यूच्या भीतीने ती थरथर कापू लागली. आपला वाढदिवस, सवय, स्वभाव या सार्‍याची नीट माहिती मिळवून त्या दाढीवाल्यानं आणि त्याच्या सहकार्‍यांनी तिला मारण्याची योजना तयार केली होती.
भिंतीवरच्या घड्याळात बाराचे ठोके पडले, तसे शालिनीच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. इतके की तिला त्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. आता कोणत्याही क्षणी आपण या जगातून निघून जाणार, या विचाराने तिनं डोळे घट्ट मिटून घेतले.
‘शालिनी, डोळे उघड.’ कुठून तरी आवाज आला. तिनं डोळे उघडले. पूर्ण खोलीत अंधार होता. तो अंधार तिला अतिशय भयानक वाटू लागला. अचानक त्या अंधारात सर्व बाजूंनी अनेक ज्योती येताना दिसल्या. ती त्यांच्याकडे भारावून पाहू लागली. त्या ज्योती हळूहळू जवळजवळ येऊ लागल्या. ती स्वत:ला विसरून त्यांच्याकडे पाहत राहिली. तेवढ्यात कोणीतरी मागून येऊन एका पट्टीने तिचे डोळे झाकले. आपली शेवटची वेळ आली, हे तिनं ओळखलं.
थोड्याच वेळात शालिनीच्या शरीराला उष्णता जाणवली. त्यामुळे डोळ्यांवर पट्टी असूनही तिला समजलं की त्या सार्‍या ज्योती तिच्या पुढ्यात मांडल्या आहेत. आता काय होणार? मानेवर सुरा चालवला जाईल की त्या ज्योतींनी आपल्याला जिवंत अग्नी दिला जाईल? तिच्या मनात अनेक विचारांचं वादळ उठलं. आणि आणि अचानक अनपेक्षितपणे एक मोठा आवाज आला. अनेक लोकांचा
हॅप्पी बर्थ डे टु यू!
शालिनीच्या डोळ्यांवरची पट्टी सोडण्यात आली. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना. समोर तिचे आई-वडील, बहीण-भाऊ, मित्रमंडळी सर्व उभे होते आणि तो दाढीवाला, रिक्षावाला, बबडू उर्फ राम्यादेखील त्यांच्या सोबत होता. तिला काहीही उमगेना. वेड्यासारखी ती त्यांच्याकडे पाहतच राहिली.
तेवढ्यात तो दाढीवाला तिच्या पुढे आला. तिला म्हणाला, ‘ही आमच्या सर्वांची योजना होती.’
‘योजना? का?’ तिनं अचंबित होऊन विचारलं.
‘तुला वाढदिवसाची भेट देण्यासाठी.’ तिची मैत्रीण म्हणाली. 
‘अशी भेट कोणी देतं का? जीवावर उठणारी.’ शालिनीनं तिला रागानं विचारलं.
शालिनीचा भाऊ म्हणाला, ‘हे बघ शालू, आम्ही कितीवेळा तुला समजावून सांगितलं की, ही जी तू दुसर्‍यांची मदत करतेस, ती चांगली गोष्ट आहे. पण मदत करताना आपण सावध असणं गरजेचं आहे. समाज तेवढा सरळ नाही, जेवढा आपल्याला किंबहुना तुला वाटतो. आपला चांगुलपणा ही आपली ताकद असायला हवी; कमजोरी नाही. मदत करताना आपण सावध असणं गरजेचं आहे. पण तुला कधी समजलंच नाही. म्हणून मग प्रत्यक्ष अनुभव देणं गरजेचं होतं. कारण अनुभवाशिवाय दुसरा मोठा गुरू नाही. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव. आपलं आयुष्य खूप छोटं आहे, त्यात आपण सगळे अनुभव घेऊ शकत नाही. म्हणून दुसर्‍यांच्या अनुभवातून शिकायला हवं.’ शालिनीला स्वत:च्या चुकीची जाणीव व्हायला लागली.
‘रागावू नकोस. तुला नीट समजण्यासाठी या माझ्या मित्रांच्या मदतीने आम्ही ही सर्व योजना आखली. तुला भान यावं आणि तू जागी व्हावीस, हाच आमचा उद्देश होता.’ भाऊ पुढे म्हणाला.
शालिनीला तिच्या वाढदिवसाला खूप चांगली भेट मिळाली होती. दाढीवाल्याने म्हटल्याप्रमाणे खरंच ती धडा शिकली होती. तिला नवीन जन्म मिळाला होता. म्हणून तिनं सर्वांचे आभार मानले आणि त्या फार्महाऊसवर तिचा वाढ-दिवस साजरा झाला. 
 
 
-सुरेश शेलार