मित्रमैत्रिणींनो ‘आवळा’ हे फळ खूप औषधी आहे, हे तर तुम्हाला माहिती आहेच. हिवाळ्यात आवळा सहज उपलब्ध होतो. तुमच्यासाठी खास आवळ्याच्या काही सोप्या पाककृती.

आवळा सुपारी

साहित्य : ५-७ आवळे, आल्याचा रस, मीठ.

कृती : आवळे किसून मीठ लावून उन्हात वाळवून ठेवावेत. किसाला आल्याचा रस चोळला आणि वाळवले तर ही सुपारी अधिक औषधी होते. आवळा सुपारी पित्तशामक असते. यामुळे तोंडाला चव येते. उलटी, मळमळ होणे कमी होते.

 

आवळ्याची चटणी 

साहित्य : आवळे, मीठ, तिखट, जिरेपूड, गूळ, फोडणीसाठी मोहरी, हिंग, हळद

कृती : चांगले मोठेसे, डाग नसलेले आवळे कुकरमध्ये उकडून घ्यावेत. दोन शिट्या पुरेत. बिया व जमतील तितक्या शिरा काढून टाकाव्यात. हाताने नीट कुस्करावेत. मोठ्या किसणीवर किसले तरी चालेल. मग यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, जिरेपूड व थोडा गूळ किसून मिसळावा. नीट एकजीव करावे. वरून मोहरी,हिंग व हळदीची खमंग फ़ोडणी द्यावी. हिंग नेहेमीपेक्षा किंचित जास्त असावा.पुन्हा नीट एकत्र करा. तुमची चटणी तयार. ही चटणी आंबटगोड, रुचकर लागते.

करा, खा आणि खाऊ घाला.