साधारण तीस वर्षापूर्वीची संध्याकाळच्या वेळी घडलेली ही गोष्ट.

पोरांच्या शाळा सुटल्या होत्या त्यामुळे हाताला लागेल ते घेऊन आणि आजूबाजूची समवयस्क मित्रमंडळी गोळा करून, त्यांनी खेळ मांडले होते. पुरुष मंडळीनी नोकरीचे आठ तास भरून, दिवसातील उरलेले तास भरण्यासाठी पारावर गर्दी केली होती. दिवसभराची कामे संपवून, रात्रीच्या स्वयंपाकाला वगैरे सुरुवात करायला अजून काही वेळ शिल्लक होता. त्यामुळे गावाकडच्या त्या ऐसपैस पसरलेल्या वाड्याच्या भक्कम दरवाज्याच्या पायऱ्या व व्हरांड्यात महिला मंडळीचा गप्पांचा फड रंगला होता.

गप्पा रंगात आलेल्या असतानाच अचानक त्या महिला मंडळाला समोर काहीतरी अजब गोष्ट दिसली आणि त्यांचे गप्पात मग्न झालेले चेहरे अचानक भीतीग्रस्त दिसू लागले,

"बघा ना, केवढ्या लांबपर्यंत रेषा उमटलेल्या दिसतायत. चांगला पाच फुटाचा तरी असेल."

"अहो, हे बघा, हे बघा, एका शेजारी एक अशा किती रेषा मातीत उमटल्यात. नक्कीच पाच सहा तरी साप आत्ताच इकडून तिकडे गेले असतील."

मातीत उमटलेल्या त्या खुणांच्या दिशेने सगळ्या जणी एकाच वेळी बघत असल्याने व त्यांच्या आवाजाचा जोर हळूहळू वाढू लागल्याने तिथे बरीच गर्दी जमा झाली. त्यातील उत्साही मंडळीनी "ते" पाच सहा साप शोधण्याची मोहीम सुरू केलेली बघून, तिथे आलेल्या सहा-सात वर्षाच्या त्या दोन पोरांच्या चेहऱ्यावर मात्र चांगलेच मिश्कील हास्य उमटले. कारण..

आता आपण तीस वर्षापूर्वीची हीच घटना, आजच्या काळात घडली तर काय होईल, हे बघू या.

वाड्यांच्या जागी सोसायटी उभी राहिली होती. संध्याकाळच्या कातरवेळी बहुतेकांचा वेळ आता ट्राफिकमध्ये जात होता. माहितीची जी देवाणघेवाण पारावर, वाड्यांच्या पायऱ्यांवर होत होती, ती आता व्हाट्सअँप, फेसबुकवर होत होती. 

ऑफिस व ट्राफिकमधून दमून आलेल्या रमेशला सोसायटीच्या आवारात असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात मुले खेळण्याच्या गाड्या फिरवताना व त्याच्या मुळे मातीत रेषांचे अजब पॅटर्नस तयार होताना दिसले. हे काहीतरी वेगळेच आहे म्हणून त्याने लगेचच त्याचे फोटो काढून, व्हिडियो करून, ते मुलांच्या फोटोसकट फेसबुक व व्हाट्सअँपवर पोस्ट केले. सोबत "काळ बदलला तरी मुलांच्या कल्पनाशक्तीची कमाल अजूनही तशीच आहे", असे भावनेला साद घालणारी ओळ लिहिली, 

अर्थातच थोड्याच वेळात ही पोस्ट व्हायरल झाली.

थोड्याच वेळात कामावरून येताना भाजी वगैरे खरेदी करून गप्पा मारत महिला मंडळ तिथे पोहोचले. तोपर्यंत मुले मिघून गेली होती मात्र मातीतले ते  पॅटर्न  मात्र तसेच होते.

"बाप रे, इथून साप गेले की काय?"

थोडीशी भीती जरी त्यांच्या चेहऱ्यावर दिसली, तरी ते नक्की काय होते, याचा शोध घेण्यासाठी त्यांना फारसा अंदाज लावत बसण्यासाठी वेळ नव्हता किंवा तशी आता गरजही राहिली नव्हती, कारण त्यांच्यातील एकीने त्या पॅटर्नसचा फोटो काढून, तो इंटरनेटवर "इमेजसर्च" हा पर्याय निवडून, ते पॅटर्न नक्की आहेत तरी कशाचे, याचा शोध घेण्यासाठी पोस्ट केला.

सेकंदाच्या आत हे फोटो "हे पॅटर्न मुलांनी मातीत गाडी खेळल्याने उमटले असून, मुले प्लास्टिकची मार्व्हल कंपनीची गाडी संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटे व चोवीस सेकंद या वेळेत खेळत होती, ही महत्वपूर्ण माहिती दिली!"

तीस वर्षापूर्वी साप शोधण्यासाठी निघालेली मोहीम आता निघाली नाही, मुले मिश्किलपणे हसली नाहीत, विषय तिथेच संपला. त्या महिला मंडळीनी इंटरनेटचे मनापासून आभार मानले.

मला सांगा, माहिती मिळाली म्हणून इंटरनेटचे आभार मानायची खरेच गरज होती का हो? ही माहिती तर रमेशने नेटवर पोस्ट केली होती. आभार तर त्याचे मानायला पाहिजे होते. पण खरी गंमत तर पुढेच आहे.

पुढचे तीन चार दिवस रमेशला मुलांची कल्पकता कशी जागी ठेवावी, याविषयी उपलब्ध असलेल्या कोर्सेसच्या जाहिराती दिसू लागल्या. त्याचबरोबर रमेशला व त्या महिलांना मुलांच्या खेळण्याच्या गाड्यांच्या व त्यातल्या त्यात मातीत, वाळूत वेगवगळे पॅटर्न तयार करणाऱ्या गाड्यांच्या जाहिराती दिसू लागल्या. त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर मुलांच्या कल्पकतेची विचार करणाऱ्या जगभरातील फेसबुक ग्रुपच्या लिंक दिसू लागल्या.

म्हणजे बघा, माहिती दिली म्हणून त्या महिलांनी इंटरनेटचे आभार मानावेत, की जाहिरीतींचा मारा सुरू झाला म्हणून इंटरनेटवर वैतागावे? इंटरनेट व त्यामुळे माहितीची देवाणघेवाण समजून घेण्यासाठी आपल्याला या प्रश्नाचे उत्तर समजून घ्यावे लागणार आहे.

सध्या इंटरनेटवर जी माहिती उपलब्ध आहे, त्यातील ९०% माहिती ही केवळ गेल्या दोन वर्षात जमा झाली आहे. आता तुम्ही विचार करा, गेल्या दोन वर्षात तुमचे सोशल मिडीयावर असणे, गुगल मॅप, ओला, उबेर, स्वीगीसारखे ऍप वापरणे, तुमच्या संपूर्ण आयुष्यातील इंटरनेट वापराच्या तुलनेत किती वाढले आहे?

तुमचे इंटरनेटवर असलेले अस्तित्व माहितीच्या देवाणघेवाणीत नक्की काय भूमिका बजावते व त्याचे चांगले व वाईट परिणाम काय होऊ शकतात, हे आपण पुढच्या भागात समजून घेणार आहोत.

-चेतन एरंडे

[email protected]

माहिती तंत्रज्ञान आपल्या रोजच्या जगण्याशी कसे जोडले गेले आहे, या तंत्रज्ञानाचा आपल्या रोजच्या जगण्यात पुरेपूर वापर कसा करायचा हे सांगणारे लेखक चेतन एरंडे यांचे हे सदर!
माहिती तंत्रज्ञान व आपण