जाई — जुई

दिंनाक: 28 Dec 2018 15:37:28

 

जाई — जुई

  जाई

जसे दसरा – दिवाळीला झेंडू फुले हवी तसेच गणपती गौरीला जाई – जुई फुले हवीच. जाई – जुईला चमेली आणि संस्कृतमध्ये मालिनी या सर्वांना जाईच म्हटले जाते. हिचे शास्त्रीय नाव जस्मिनम-ग्रँडि-फ्लोरम आहे. हिचे कुल ओलिएसी. झुडूपाप्रमाणे वाढणारी ही मोठी वेल सर्वत्र बागेत लावलेली आढळते. संस्कृत वाङ्मयावरून या वेलीची माहिती अरब व आर्य लोकांस होती हे समजते. ही वेल लांब फांद्यांनी जवळच्या आधारावर चढत जाते. पाने समोरासमोर असून शेवटचे पान इतरांपेक्षा मोठे व टोकदार असते. पानांच्या बगलेतून पानांपेक्षा लांब (देठ १ इंचही लांब) फुलोरे येतात. जाईचे फुल ५ पाकळ्यांचे असते. याची कळी लालसर रंगाची असते. जुलै ते सप्टेंबर मध्ये भरपूर फुले येतात. जुईचे कळ्या छोटे, नाजूक असतात. फुलाऱ्यावर त्यांचा अत्यंत मोहक सुगंध येतो. पाकळ्या ५ खाली जुळून नालिकाकृती वर सपाट थोडी अंडाकृती असतात. जाईमध्ये जॅस्मिनीन हे अल्कॉइड असते. त्यापासून सुगंधी द्रव्य मिळते. ते केसांचे तेल व अत्तरासाठी वापरले जाते. साबण, सौंदर्य प्रसाधने, दंतमंजने, धूप व तंबाखू यात जाईचे तेल वापरले जाते.

भारतात जाईची लागवड विशेषतः शहराच्या आसपास केली जाते. कारण शहरात ही फुले ताबडतोब विकली जातात. राजस्थान, मध्य व उत्तर प्रदेशात सुगंधी द्रव्याच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर जाईची लागवड केली जाते. गजरे, हार, तुरे, पूजा यांसाठी फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. चमेलीच्या पानात सॅलिसिलिक अॅसिड असते. फुलातील उडून जाणाऱ्या तेलाचे उत्पादन मुख्यतः फ्रान्स व इटली येथे होते. सुवासिक द्रव्यात वापरण्यास गुलाबा खालोखाल  जाईच्या फुलांचा वापर करतात.

जाईची मुळे उगाळून नायट्यावर लावतात. तोंड आले असताना हिची पाने चघळल्यास विकार कमी होतो. ताज्या पानांचा रस भोवरीवर लावतात. जाई कृमिनाशक, लघवी साफ करणारी आहे. जाई (चमेली) ची कळी सूर्यास्तावेळीही उमलते.

जाईच्या लागवडीस सकस निचऱ्याची जमीन लागते. मार्च-एप्रिलमध्ये जमीन खणून माती बारीक करून जूनमध्ये खतात लावून वाफे बनवितात. लगेच त्यात छाट कलमे, फुटवे, किंवा दाब कलमे १.५-३ मी. अंतराने लावतात. वाढ होत असताना मांडवावर चढवितात. जुलै ते सप्टेंबर हा फुलांचा मोसम असतो. त्या काळात उत्तर प्रदेशात दर हेक्टरी ५०० ते १२००० दर किलोग्रॅम मध्ये फुले असतात. साधारणपणे ही वनस्पती चमेली या नावाने ओळखली जाते.

जाईवर तांबोरा, पानांवरील ठिपके, काजळी असे रोग आढळतात. उपाय म्हणून बोर्डो मिश्रण, व कीटकनाशके फवारतात. वनराईची मुळे तेलात उकळवून संधिवातावर चोळण्यासाठी तेल बनवितात. रानजाईला सात पाकळ्यांचे छोटे पांढरे फुल येते. 

(चमेली) जाई फुले कोमेजतात तेव्हा ती तपकिरी पडतात. तर जुई निस्तेज होते आणि सायली तर पिवळी पडते. अशा ह्या त्यांच्या वेगवेगळ्या तऱ्हा! 

जुई                          

जाई-जुई असं एकत्रच म्हटले जाते. दोन्हीही एकाच कुळातील. त्यांच्यात थोडा-थोडा फरक आहे. पण साधर्म्यही आहे.जुईचे शास्त्रीय नाव जॅस्मिनम् ऑरिक्युलेटम असे असून कुल – ओलिएसी हेच आहे. ही झुडुपासारखी वेल मुळची उष्णकटीबंधातली असून ती भारताच्या द्विपकल्पात दक्षिणेकडे केरळपर्यंत आढळते. बागेतून तिची लागवड करतात. पाने बहुधा साधी, समोरासमोर परंतु अनेकदा त्रिदली असून बाजूची दले फार लहान वा कानाच्या पाळीसारखी असतात. फुलोरा संयुक्त पण अनेक फुले असलेली विरळ पुष्पबंध असतो. व त्यावर लहान पांढरी सुगंधी फुले असतात. फुलाचे देठ लांब असून प्रत्येक पाकळीचा सुटा भाग दीर्घवर्तुळाकार असतो. पाकळ्या ५ ते ८ असून फुल समईसारखे, फळ गोलसर, काळे. आत २ ते ४ बिया असतात. जुईचे फुल म्हणजे इंग्रजी परीकथेतील राजकन्या.

या वनस्पतीची लागवड सुगंधी फुलासाठी भारतात सर्वत्र म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, पं. बंगाल मध्ये करतात. व्यापारी दृष्ट्या गाझीपुर, जौनपुर, कनौज येथे याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात.

हिला निचऱ्याची, मध्यम प्रकारची जमीन लागते. हिवाळी हंगामात जमीन नांगरून, खत घालून वाफे तयार करतात. त्यात नोव्हें-जानेवारीच्या दरम्यान वेलाचे तुकडे ३ मी. अंतरावर लावतात. जुलै-ऑगस्ट च्या सुमारास फुले येण्यास सुरुवात होते. जुईच्या कळ्या छोट्या, नाजूक. फुलल्यावर मात्र मोहक सुगंध येतो. वेल वाढू लागला म्हणजे मांडवावर चढवितात. फुले हवेली असल्याने एका किलोग्रॅममध्ये २०-२५ हजार मावतात. या सुगंधी फुलातून २० ते ३० % अत्तर निघते. ते गर्द तांबडे असते. त्यापासून तेलही तयार केले जाते. अत्तर व तेलाला ताज्या फुलांच्या सुगंधासारखाच वास येतो. तो जॅस्मिनच्या इतर जातीतील फुलापेक्षा अधिक आल्हाददायक असतो. या वेलावर कधी कधी काळ्या बुरशीचा रोग पडतो. त्यावर उपाय म्हणून बोर्डो मिश्रण फवारतात.  

-मीनल पटवर्धन 

[email protected]

कमळ