नमस्कार मित्रहो, मागील लेखात आपण मानवाच्या एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झालो, तो म्हणजे मानवाचे चंद्रावर स्वारी करणे होय! आता प्रस्तुत लेखामध्ये आपण पाहणार आहोत की अमेरिकेने या अवकाश स्पर्धेत घट्ट पाऊल रोवल्यानंतर चंद्रावरील पुढील मोहिमांची आखणी आणि त्यासाठी लागणारी तयारी सुरू केली. अशाच एका चंद्रावरील मिशनच्या मध्ये अमेरिकेला तिचे तीन अंतराळवीर गमावण्याची वेळ आली होती, परंतु अशा कठीण प्रसंगीसुद्धा अमेरिकेने त्यावर कशी मात केली त्याची ही गोष्ट!

अपोलो १३ हे अमेरिकेने चांद्रमोहीमेवर पाठवलेले सातवे मानवसहित मिशन होते आणि चंद्रावर उतरण्यासाठीचे ३रे मिशन. हे यान ११ एप्रिल १९७० साली अवकाशात ३ अवकाशवीरांना घेऊन झेपावले. झेपावातच सर्वांनी जल्लोष केला. कारण अमेरिकेचे तिसरे अंतराळयान मानवांना घेऊन चंद्रावर पोहोचवण्यास सज्ज झाले होते. हळूहळू अवकाशयान हे निर्धारित वेळेत त्याच्या मार्गावर पुढे सरकताना मिशन कंट्रोल केबिनमध्ये दिसू लागले. या आणि या पूर्वीच्या सर्वच मिशनवर मिशन कंट्रोलची कायम नजर असे. आपण सोडलेले यान हे योग्य मार्गावर आहे की नाही, त्यातील सर्व यंत्रे व्यवस्थितपणे काम करत आहेत की नाही यावर सतत मिशन कंट्रोलची नजर असे. त्यामुळेच अमेरिकेची मिशन यशस्वी होण्यात या मिशन कंट्रोल युनिटचासुद्धा ङ्गार जास्त मोलाचा वाटा आहे.

अपोलो १३ हे यान चंद्राच्या मागील भागात म्हणजेच पृथ्वीवरून चंद्राचा जो भाग आपणास दिसत नाही, त्या भागात उतरण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे मानवास तोपर्यंत माहिती नसलेल्या अशा चंद्राच्या मागील पृष्ठभागाची सुद्धा बरीच माहिती मानवाला मिळणार होती. या यानाला आता उड्डाण घेऊन ५५ तास उलटून गेले होते. आणि अचानक जमिनीवरच्या ह्युस्टन येथील कंट्रोल रूममध्ये आवाज आला ह्युस्टन यानात काहीतरी बिघाड झालाय. या संदेशाने सर्वच जण हादरून गेले. कंट्रोल रूममधील सर्व जण फटाफट कामाला लागले आणि त्यांनी सर्व यंत्रे आणि त्यांचा डाटा तपासून पहिला. नंतर यानातील अंतराळवीरांशी बोलणे झाल्यावर असे लक्षात आले की, यानातील ऑक्सिजनची टाकी स्फोट होऊन फुटली आहे. हा सर्वच लोकांसाठी धक्का होता, कारण गणित मांडले असता असे लक्षात आले की आता या टाकीमधील हवा हळूहळू बाहेर पडत असल्याने आता जर अंतराळवीरांना परत आणायचे असेल तर फारच कमी प्रमाणात ऑक्सिजन शिल्लक राहील आणि जी फारच मोठी चिंतेची बाब होती.

आता कंट्रोल रूममध्ये गणिते मांडणे सुरू झाले, यानाच्या काही प्रतिकृती आणल्या गेल्या आणि त्यांचा पुन्हा अभ्यास सुरू झाला. सर्व वातावरण तंग झाले होते. या तीनही अंतराळवीरांना वाचवणे अत्यंत गरजेचे होते आणि तितकेच अवघडसुद्धा. भरपूर चर्चा झाल्या आणि त्यातून एक तोडगा निघाला. तो तोडगा असा होता की मुख्य यानात असलेल्या अंतराळवीरांनी चंद्रावर उतरणार्‍या लँडरमध्ये जाऊन बसायचे. मुख्य मॉड्यूलची सर्व यंत्रे बंद ठेवायची आणि या लँडरची सर्व यंत्रे वापरून जिवंत राहण्याचा प्रयत्न करायचा. हा शब्दशः एक प्रयत्नच होता कारण परिणामांची कुणालाच काही खात्री नव्हती. सर्व जगाचे लक्ष याच एका घटनेवर केंद्रित होते. अंतराळवीरांनी कंट्रोल रूममधून सांगितलेल्या सूचनांचे अगदी तंतोतंत पालन केले आणि त्यानंतर ते यान यशस्वी रीतीने चंद्राच्या भोवती फिरून त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून पृथ्वीकडे अजून जास्त वेगाने झेपावले. आता मात्र फार जास्त महत्त्वाचा क्षण होता, कारण सर्व अंतराळवीर पुन्हा एकदा मुख्य यानात येऊन पृथ्वीवर येण्यासाठी बसले होते. आणि त्यांनी पृथ्वीच्या जवळ येताच चंद्रावर उतरणारे लँडर विलग केले. आत्तापर्यंत अंतराळवीरांना श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता, कारण हवा फारच थोडी उरली होती. तरीसुद्धा अशा परिस्थितीवर मात करत ते अंतराळवीर पृथ्वीवर उतरले. हे यान पॅरॅश्यूटच्या साहाय्याने समुद्रावर उतरले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

या धाडसाबद्दल अपोलो १३ च्या सर्व अंतराळवीरांचा म्हणजेच- लोवेल, स्वीर्गट, हेस यांना गौरवण्यात आले. या घटनेनंतर अमेरिकेने या घटनेच्या अपयशाबद्दल बराच अभ्यास करून आपल्या पुढील यानांमध्ये त्याप्रमाणे सुधार केले आणि पुढील बर्‍याच मोहिमा यशस्वी करून दाखवल्या! चला तर मग भेटूयात पुढील लेखात तोपर्यंत तुम्ही या मोहिमेवर आधारलेला अपोलो १३ हा सिनेमा बघायला विसरू नका!

-अक्षय भिडे 

[email protected]

 

मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले त्या ऐतिहासिक क्षणाची माहिती सांगणारा लेख.  
द इगल हॅज लँडेड!