गेल्या काही वर्षांपासून किशोर वयातील मुला मुलींच्यात मानसिक, शारीरिक, सामाजिक व भावनिक विकासाशी निगडित अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केल्याचे दिसून येते. व्यसनाधिनता, गुन्हेगारी, स्वैर वागणूक अशा अनेक वर्तन प्रकारंची विविध समस्या समाजापुढे येत आहे. तसेच विद्यार्थ्यांवर योग्य ते संस्कार घडवण्यात पालक, शाळा, समाज कमी पडत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. युवक पिढीजवळ ऊर्जा प्रचंड प्रमाणात दिसते. मात्र ही सकारात्मक गोष्टींकडे वळण्याऐवजी नकारात्मक गोष्टींकडे झुकल्याचे दिसून येते.

या सर्व गोष्टींवर मात करावयाची झाल्यास खेळ हे माध्यम निश्‍चितपणे उपयुक्त ठरेल. सततच्या अभ्यासामुळे मुलांच्या मनावर एक प्रकारचा मानसिक ताण आलेला असतो. हा ताण घालवायचा असेल तर प्रत्येकाने दिवसातून किमान एक तास खेळण्यासाठी, व्यायामासाठी दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी मैदानावर अथवा मोकळ्या वातावरणात येऊन आपल्या आवडीचे खेळ खेळल्यास खेळाचा आनंद उपभोगल्यास त्यांचा मनावरील असलेला ताण कमी होण्यास मदत होईल. खेळल्यामुळे शरीरास व्यायाम घडून येईल. त्यामुळे भूक वाढेल, रात्री झोप चांगली लागेल. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होईल. खेळण्यामुळे शरीर, मन व बुद्धीचा विकास होऊन आपले मन आनंदी, उत्साही व कार्यक्षम राहण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येण्यासाठी मदत होईल.

प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही गुण हे उपजतच असतात. हे गुण ओळखून त्यांना खेळातील सहभागासाठी पालकांनी व क्रीडा शिक्षकांनी प्रोत्साहित केले पाहिजे. चांगला खेळाडू बनावयाचे असेल तर सांघिक व मैदानी खेळांमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेतला पाहिजे.

उत्तम खेळाडू व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक व सामाजिक क्षमतांचा विकास होणे आवश्यक आहे. या क्षमतांचा विकास करण्यासाठी खेळाडूंना आपल्या खेळात सातत्य, नियमितपणा व कष्ट करण्याची इच्छाशक्ती इ. गोष्टींची आवश्यकता असते.

खेळातील प्रत्यक्ष सहभागामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येत असतात. खेळातील सरावामुळे शारीरिक क्षमतांमध्ये बदल घडून येतो. नियमित सरावामुळे ताकद, स्नायूंचा दमदारपणा दिशाभिमुखता, लवचिकता, चपळता इत्यादी क्षमतांमध्ये वाढ होण्यास मदत होते. अभ्यासात मन रमवण्यासाठी खेळातील सहभाग आवश्यक असतो. खेळातील सहभागामुळे खिलाडूवृत्ती जोपासली जाते. व्यक्तींच्या अंगी खिलाडू वृत्ती असेल तरच तो जीवनात यशस्वी होतो. त्यामुळेच कठीण परिस्थिती, अचूक व योग्य निर्णयक्षमता जोपासली जाते. एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती वाढीस लागते.

भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. खेळातील सहभागामुळे जीवनातील यश व अपयश पचवण्याची क्षमता आपल्या अंगी निर्माण होते. मिळणार्‍या यशाने भारावून न जाता व अपयशाने खचून न जाता आलेल्या परिस्थितीला योग्य प्रकारे समायोजन करण्याची क्षमता खेळातील सहभागामुळे प्राप्त होऊ शकते. खेळाचा आनंद उपभोगून खेळणारेच खेळाडू दुसर्‍यांची मने जिंकू शकतात. खेळातील सहभागामुळे एक नवीन सकारात्मक जीवन दृष्टी प्राप्त होत असते. खेळातील सहभागामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात व सामाजिक मूल्ये जोपासली जातात. उदा., खरे बोलणे, दुसर्‍यांचा आदर करणे व त्यांना त्यांच्या अडचणींच्यावेळी सहकार्य करणे चिकाटी इ. खेळातील सहभागामुळे सकारात्मक दृष्टिकोन असणारा व संस्कारक्षम असा नागरिक घडण्यास मदत होते. याचबरोबर समतोल व संतुलित आहाराची जोड मिळाल्यास व उल्लेख केलेल्या क्षमतांचा विकास होण्यास मदत होते.

सर्वांनी दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा किमान ५० ते ६० मिनिटे क्रीडांगणवार येऊन खेळावयास हवे. जे खेळ व्यक्तिगत ताकदीपेक्षा सामुहिक ताकदीने खेळले जातात असेच खेळ सर्वांगीण विकास होण्यास मदत करत असतात. म्हणूनच प्रत्येकाने आपला श्‍वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत खेळत राहिले पाहिजे. खेळातील आनंद उपभोगण्यासाठी खेळले पाहिजे. असे घडून आल्यास समाजाचे आरोग्य उत्तम राहील. चरित्रवान नागरिक निर्माण होतील व चांगले खेळाडू निर्माण होण्यास मदत होईल. उत्तम खेळाडू घडवण्यासाठी खेळातील नियमित सहभाग हा आवश्यक आहे. खेळातील नियमित सहभागामुळेच सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होत असते. प्रत्येकाने निरोगी  जगण्यासाठी त्यांचा खेळातील सहभाग हा अतिशय आवश्यक आहे.

-शैलेश आपटे 

[email protected]