बटेश्वर हे उत्तर प्रदेशातले आग्रा जिल्ह्यातले छोटेखानी गाव. विलक्षण देखणे आणि रेखीव. निसर्गाने या लहानशा गावावर हिरव्या रंगाच्या जादूची मुक्त हस्ते उधळण केली होती. यमुनेच्या विशाल पात्राच्या कुशीत वसलेले हे गाव ओळखले जायचे, ते एकेकाळी मराठ्यांचा जरीपटका डौलाने फडकवणार्‍या बटेश्वर देवस्थानामुळे. शिवमंदिराच्या विपुलतेमुळे बटेश्वरला ‘छोटी काशी’ म्हटले जाई. अटलजींचे आजोबा श्यामलाल काव्यरसिक होते, पंडित होते. कविश्रेष्ठ भवभूती हाही वाजपेयी होता. त्याच्या घरात ‘वाजपेय यज्ञ’ झाल्याचे सांगितले जाई. भवभूतीची ही परंपरा अटलजींच्या घराण्याला लाभली होती. 
या घराण्यात कृष्णादेवी आणि कृष्णबिहारी वाजपेयी यांना 25 डिसेंबर 1924 रोजी सुपुत्राचा लाभ झाला. राष्ट्राच्या नभांगणात एक ‘अटल’ तेजस्वी तारा उदयाला आला. मुला-नातवंडांशी गप्पागोष्टी करताना श्यामलालजी भवभूतींचे श्लोक चालीवर म्हणत. मुलांकडूनही म्हणून घेत. संस्कृत, हिंदी कवींच्या कविता म्हणत. तेव्हा छोटा अटल उत्सुकतेने त्यांना अनेक शंका विचारत असे. यातूनच लहानग्या अटलच्या मनात विविध छंद आणि वृत्तांची पेरणी झाली. आजोबांकडून त्यांनी अनेक सवयी घेतल्या. काटेकोर शिस्त, स्वच्छता आणि अन्न हे पूर्णब्रह्म मानून पानात पडेल ते आनंदाने सेवन करण्याची सवय संपूर्ण राजकीय प्रवासात खूप उपयोगी पडली. 
रामायण, महाभारत, चारही वेद, पुराणे, रामचरितमानस, गीता आणि भागवत या सार्‍या ग्रंथांचा परिचय, संस्कार छोट्या अटलजींच्या खेळत्या वयातच रुजला. अटलजींचे पिता कृष्णबिहारी यांनी हा काव्यगुणांचा वारसा जपला, जोपासला. त्या काळात इंग्रजी, हिंदी, संस्कृत अशा तीनही भाषांमध्ये ते अस्खलित भाषण करीत. त्यांचा ग्रंथसंग्रह प्रचंड होता. मानसशास्त्राचाही ते अभ्यास करीत त्यामुळेच मोठ्या भावंडापेक्षाही अधिक चौकस असणार्‍या आणि सतत प्रश्न विचारणार्‍या अटलजींचे त्यांना विशेष कौतुक होते. 
पुढे अटलजी पंतप्रधान झाल्यावर आजोबा व वडिलांच्या ग्रंथप्रेमाची आठवण ठेवून अटलजींनी  ‘कृष्णबिहारी’ न्यासाच्या रूपाने वाचनालय सुरू केले. वडिलांच्या अमोघ वक्तृत्वाचा गुण अटलजींनी घेतला असला तरी शाळेतल्या पहिल्याच भाषणात मात्र ते आपल्याला काय बोलायचे आहे, तेच ऐनवेळी विसरले. समोरच्या मुलांनी त्यांची हुर्यो उडवली. तेव्हा मात्र पूर्वतयारी केल्याशिवाय भाषणाला उभे राहायचे नाही हा निश्चय त्यांनी केला आणि वाग्देवी त्यांना प्रसन्न होऊ लागली. एकदा एका वक्तृत्व स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धेतील भाषणे झाल्यावर अटलजी तेथे पोहोचले, पण या मुलाचे धावपळीत मळलेले कपडे, चेहर्‍यावरची निराशा आणि भाषण करण्याची तळमळ पाहून स्पर्धेचे परीक्षक डॉ. हरिवंशराय बच्चन यांनी नियमांना मुरड घातली. या मुलाला संधी दिली. अर्थातच अटलजींनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रभावी वक्ता म्हणून हळूहळू त्यांचे नाव गाजू लागले. त्याच वेळी त्यांची काव्यप्रतिभाही विकसित होत होती. ताजमहाल पाहून त्यांनी पहिली कविता रचली. 
ग्वाल्हेरमध्ये अटल बिहारी दर रविवारी आर्यकुमार सभेत जाऊ लागले. एकदा त्याच सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नारायणराव तरटे यांनी अटलजींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत येण्यास सूचवले. संघाच्या शाखेवर अटल बिहारींनी पहिले पाऊल टाकले आणि मग संघ जणू त्याचा श्वास झाला. 1940 मध्ये संघाचे संस्थापक आणि सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांना संघशिक्षावर्ग समारोपाच्या वेळी अटलजींनी पाहिले. त्यांचे ते धीरोदात्त दर्शन अटलजींच्या मनावर कायमचे कोरले गेले. या भारलेल्या मन:स्थितीत त्यांना कविता स्फुरली. ‘हिंदू तनमन.. हिंदू जीवन.. रगरग हिंदू.. मेरा परिचय...’ ही नऊ कडव्यांची कविता ओजस्वी शब्दांनी हिंदूनिष्ठेने आणि उत्तुंग प्रतिभेने पुरेपूर भरलेली होती. 
अटलजी महाविद्यालयात असताना भारताची राष्ट्रभाषा कोणती असावी या विषयवरील वादविवाद स्पर्धा घेतली होती. अटलजींच्या प्रतिस्पर्ध्याने हिंदी भाषेचा पुरस्कार करणारे मत मांडले. अटलजींनी भारताची राष्ट्रभाषा ‘हिंदुस्तानी’ असावी अशी बाजू जोरदार मांडली. त्यांच्या युक्तिवादात या नव्या राष्ट्रभाषेने उर्दूचे आणि हिंदीचे गुण कसे घ्यावे यावर भर होता. अटलजींच्या समावेशक, व्यापक व सहिष्णू वृत्तीचा प्रत्यय देणार्‍या या भाषणाने सर्वानाच जिंकून घेतले.  
संघकार्य, काव्यरचना, वक्तृत्व आणि विद्यार्थी संघटना अशी चौफेर आघाडी सांभाळत असतानाच ते रात्र रात्र जागून अभ्यास करत. प्रसंगी चुकलेले तास भरून काढण्यासाठी ते प्राध्यापकांच्या घरी जाऊन बसत. या अथक परिश्रमाचे फळ म्हणून ते विशेष श्रेणीत बी.ए.च्या परीक्षेत कॉलेजमध्ये पहिले आले.
अटलजी एम.ए. करीत असताना वडील कृष्णबिहारी शिक्षणाधिकारी या पदावरून निवृत्त झाले. एम.ए. करतानाच अटलजींनी कायद्याचे शिक्षण घेण्याचे ठरवले. त्याच्याबरोबर वडिलांनीही लॉच्या वर्गात प्रवेश घेतला. वसतिगृहातही ते एकाच खोलीत राहात. दोघेही एकाच तुकडीत असल्यामुळे दोघांपैकी गैरहजर असेल तर दुसर्‍याला विचारणा होत असे. पितापुत्रांची ही जोडी त्या वेळी आश्चर्याची ठरली. शिक्षणाला वयाची अट नसते हा आदर्श त्यांनी घालून दिला. 
अटलजी डी.ए.व्ही. महाविद्यालयात शिकत असताना प्रा. मदनमोहन पांडेय यांचा तास सुरू होता. तास सुरू असताना विद्यार्थ्यांनी पाहिले की अटलजी गुपचूप वर्गाबाहेर पडत आहेत. यावर विद्यार्थ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. यावर पांडेय सर उद्गारले आज जे मी शिकवणार आहे ते समजण्यासाठी तो आधीच माझ्याकडून पुस्तक घेऊन गेला होता. प्राध्यापकांना सर्वाधिक शंका विचारणारा, त्यांच्या घरी जाऊन बसणारा आणि अभ्यासक्रम पुरा होण्यापूर्वी संदर्भग्रंथ वाचणार्‍या या विद्यार्थ्याने पांडेय सरांचा विश्वास सार्थ ठरवून आग्रा विद्यापीठात द्वितीय क्रमांक मिळविला. 
संघाइतकेच त्यांना शिक्षणही प्रिय होते. पीएच.डी. करण्याची तीव्र इच्छा असूनही तशी संधी व अवधी त्यांना मिळाला नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात देशाच्या अनेक विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट पदव्यांचा त्यांनी विनयपूर्वक स्वीकार केला. मात्र त्या वेळी आपल्या राहून गेलेल्या पीएच.डी.चे त्यांना स्मरण होई. ते म्हणत, ही डॉक्टरेट प्रतीकात्मक आहे ते मला समजते. त्यामुळे ही माझ्या नावाच्या अलीकडे सजून दिसणार नाही हेही मी जाणतो. ती खरी पदवी राहूनच गेली ...... 
राजकारणाच्या धकाधकीत पडले नसते, तर संघकार्य आणि अध्यापन यात ते नक्कीच रमून गेले असते. पण नियतीचा संकेत काही निराळाच होता. ‘स्व’चा शोध हा शिक्षणाचा खरा अर्थ होतो अशी धारणा असलेला, कवी हृदयाचा राष्ट्रनेता, कसलेला संसदपटू, लोकशाहीचा झुंजार लढवय्या, समर्थ भारताचे स्वप्न पाहणारा राजनीतिज्ञ, मांगल्याच्या प्रेमात पडणारा आणि वेदनेच्या स्पर्शाने व्यथित होणारा मनस्वी, ग्वाल्हेरपासून ते दिल्लीच्या प्रदीर्घ प्रवासात मनाची प्रसन्न नितळता जपणारा, राष्ट्रसमर्पित, दूरदर्शी नेता, हिंदुत्व आणि विश्वबंधुत्वाचा अनुबंध जुळवणारा उदारहृदयी, कोमल अंत:करणाचा, उमद्या मनाचा, जाज्वल्य देशाभिमानी आणि निष्कलंक चारित्र्याचा, युग प्रवर्तक नेता म्हणून अटलजी भारतीयांच्या मनात ध्रुवतार्‍याप्रमाणे सदैव अढळस्थानी  राहतील. 
- मानसी वैशंपायन