‘श्यामची आई’, ‘धडपडणारी मुले’, ‘तीन मुले’, ‘खरा मित्र’, ‘क्रांती’, ‘नवा प्रयोग’ अशा अनेक पुस्तकांमधून बालमित्रांना भेटणार्‍या साने गुरुजींचा २४ डिसेंबर हा जन्मदिन.

साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. यांचा जन्म कोकणातील पालगड या गावी झाला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना अत्यंत कष्ट करून त्यांनी १९१८ साली मॅट्रिकचे शिक्षण आणि पुढे पुण्यात जाऊन बी.ए. आणि एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले.

एम.ए. होताच त्यांना 300 रुपये पगाराची नोकरी देऊ केली. त्या काळी 300 रुपये पगार ही खूप मोठी गोष्ट होती. पण पैसे कमवून सुखात राहणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय नव्हते. त्यांना उगवत्या पिढीवर संस्कार करायचे होते, म्हणून त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते.

पुढे नोकरी सोडून त्यांनी कायदेभंगाची चळवळ, तसेच विविध चळवळींमध्ये भाग घेतला, त्यामुळे त्यांना अनेकदा कारावासाची शिक्षा झाली. कारावासात व बाहेर त्यांनी एकूण ८० पुस्तके लिहिली. धुळ्याच्या तरुंगात असताना विनोबा भावे गीतेवरील प्रवचने देत असत. ती प्रवचने साने गुरुजींनी लिहून घेतली. तीच पुढे ‘गीता प्रवचने’ या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध व विविध भाषांमध्ये भाषांतरित झाली. नाशिकच्या तुरुंगात त्यांनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिले. ‘गोड-गोड गोष्टी’च्या दहा भागांमुळे ते विशेषकरून मुलांचे अतिशय आवडते लेखक झाले. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ यासारखी प्रेमावर आधारलेली समाजरचना निर्माण करण्याची प्रार्थना त्यांनी मुलांसाठी सांगितली.

स्वातंत्र्यलढ्यामध्येही साने गुरुजींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी  १९३८ साली त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. तर १९४८ ला त्यांनी ‘साधना’ नावाचे सुरू केलेले साप्ताहिक आजही सुरू आहे. १९४२ च्या भारत छोडो स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना शिक्षा झाली. तुरुंगाबाहेर आल्यावर त्यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले व्हावे म्हणून आमरण उपोषण सुरू केले. त्यांनी केलेल्रा ११ दिवसांच्या उपोषणाचा परिणाम म्हणूनच विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी खुले झाले.

अशा या ध्येयनिष्ठ, प्रेमळ,स्वातंत्र्याची आस असणाऱ्या, मुलांमध्ये रमणाऱ्या,  मुलांवर संस्कार घडावेत म्हणून अनेक पुस्तके लिहिणाऱ्या साने गुरुजींच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे आपण वाचन करू आणि त्यांनी पुस्तकरूपाने दिलेले संस्कार अमलात आणू.

- सायली नागदिवे

[email protected]