पुणेरी परमवीर

दिंनाक: 23 Dec 2018 15:24:44


पूर्वापार पराक्रमाचा वारसा घेऊन आलेले पुण्याचे कर्नल अर्देशीर बुरजरजी तारापोर यांनी १९६५च्या युद्धात चार्विडाच्या रणांगणावर मिलोरा गावात झालेल्या धुमश्‍चक्रीमध्ये १७ पूना हॉर्सच्या या सेनापतीने तुटपुंज्या सैन्यास स्फूर्ती देत पाकिस्तानच्या प्रचंड झंझावातास परतवून लावून चार्विडा भागात आपले पाय पक्के रोवले. या लढाईत कर्नल तारोपार आपल्या रणगाडा पलटनीचे नेतृत्व करत बाजी प्रभूंच्या तडफेने पाकिस्तानी सैन्यावर तुटून पडले. मनाची शांतता व मनगटाची ताकद ढळू न देता कर्नल तारापोर यांच्या पुणेरी मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करत १०० पेक्षा जास्त ‘अमेरिकन’ पॅटर्न टँकना जमीनदोस्त केले. विजेप्रमाणे तळपत शत्रूवर तुटून पडलेल्या कर्नल तारोपार यांना तीन गोळ्या लागून ते जायबंदी झाले.

सहा दिवस या युद्धाचे जखमी अवस्थेत नेतृत्व करत हा पुणेरी मावळा लढत राहिला. आघाडीवरच्या कमांडरने कर्नल तारापोर यांना आदेश दिला. आपण युद्धभूमी सोडून हॉस्पिटलमध्ये दाखल व्हा, तेव्हा या तानाजीने नम्रपणे नकार देत युद्धभमीवरच पलटणीची साथ द्यायचे ठरवले. १४ सप्टेंबरला जखमी अवस्थेत जसोर व बुसूर डोराडी ही गावे जिंकत १६ सप्टेंबरला परत शत्रूच्या तोफेने कर्नल तारापोर यांचा वेध घेतला. पण तोपर्यंत चार्विडा मिलोरा हिंदुस्थानच्या ताब्यात आले होते. कर्नल तारापोर यांनी अतूट पराक्रमाने पूना हॉर्सच्या पलटणीला जोश देऊन शत्रूचे ‘वॉटर्लू’ झाले. या संग्रामात १७ पूना हॉर्सचे फक्त ९ रणगाडे कामी आले. शर्थीने चामुंडा राखणार्‍या या कर्नल तारापोर यांना मरणोपरांत परमवीर चक्राने अलंकृत करण्यात आले. १७ पूना हॉर्सला दुसरे परमवीर चक्र १९७१च्या युद्धात सेकंड लेफ्टनंट अरुण खेजमाल याने मिळवून दिले. या अरुणचा जन्मही पुण्याचा.

-कॅप्टन विनायक अभ्यंकर

[email protected]

 

संस्कारांचे औदार्य सांगणारी वीरकथा - भाग ५

संस्कारातून निर्माण झालेले औदार्य