सतराव्या शतकातल्या युरोपातल्या शास्त्रज्ञांनी हवा या विषयावर वैज्ञानिक पद्धतीने संशोधन सुरू केले. ज्वलन आणि श्वसन या क्रियांसाठी हवेची गरज असते हे पूर्वीपासून माहीत होतेच. जॉन मेयो या शास्त्रज्ञाने सन १६६८ मध्ये त्यावर शास्त्रीय प्रयोग केले. त्याने यासाठी एक पेटलेली मेणबत्ती आणि जिवंत उंदीर यांना एका काचेच्या हंडीखाली ठेवले. थोड्याच वेळात मेणबत्ती विझली आणि उंदीर तडफडून मेला, पण हवेचा मोठा भाग अजून शिल्लक होताच. हवेतला फक्त काही भागच त्यासाठी उपयोगाचा असतो आणि तो भाग संपला की मेणबत्तीचे ज्वलन थांबते आणि उंदराचे आयुष्य संपते असेही त्यावरून सिद्ध झाले. त्याशिवाय हंडीच्या बाहेरच्या परातीमधले पाणी आत शिरून त्याने सुमारे पाव जागा व्यापली होती. त्यावरून हवेतला फक्त तेवढाच भाग या कामांसाठी उपयोगी आणि बाकीचा निरुपयोगी असतो असेही दिसले.   
सुमारे शंभर वर्षांनंतर सन १७७१-७२ च्या सुमाराला स्वीडिश शास्त्रज्ञ कार्ल विल्हेम शील (Carl Wilhelm Scheele) याने प्रयोगशाळेत काही रसायने तापवून त्यामधून प्राणवायू म्हणजे ऑक्सीजन हा वायू तयार केला होता. त्याला त्याने अग्निवायू ("Fire air") असे नाव दिले होते. त्याला कदाचित त्या शोधाचे मोठे महत्त्व पूर्णपणे समजले नसेल. तो दूर स्वीडनमधल्या एका लहानशा जागी आपले संशोधन करत असल्यामुळे त्या काळातल्या प्रमुख शास्त्रज्ञांच्या संपर्कात नव्हता. या नव्या वायूचे आणि इतरही काही पदार्थांचे गुणधर्म तपासून त्याने आपले संशोधन १७७५ मध्ये छापायला दिले आणि १७७७ मध्ये ते प्रसिद्ध झाले.

त्यादरम्यान सन १९७४ मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ जोसेफ प्रीस्टली (१७३३ ते १८०४) याने एका काचबंद पात्रामध्ये मर्क्यूरिक ऑक्साइड (Mercuric oxide) हे रसायन ठेऊन ते सूर्यकिरणांनी तापवले आणि त्यातून एक विशिष्ट प्रकारची हवा तयार झाली. या खास हवेत मेणबत्तीचा उजेड प्रखर होतो आणि उंदराला जास्त चैतन्य येते हेसुद्धा त्याने दाखवले. त्यामुळे त्या हवेच्या म्हणजेच प्राणवायूच्या शोधाचे श्रेय प्रीस्टलीला दिले गेले. मात्र प्रीस्टलीने या हवेला डीफ्लॉजिस्टिकेटेड हवा ("Dephlogisticated air") असे नाव दिले होते. त्याच काळातला फ्रेंच शास्त्रज्ञ अँटनी लेवोजियरनेही हा वायू कृत्रिमरीत्या तयार करून त्यावर ज्वलनाचे प्रयोग केले आणि १७७७ मध्ये या वायूला 'ऑक्सीजन' असे वेगळे नाव दिले. आधुनिक विज्ञानावरील मराठी लेखन करताना जुन्या काळातल्या एका विद्वानाने त्याला प्राणवायू म्हंटले आणि ते नाव रूढ झाले. 
 
प्रीस्टलीचा जन्म इंग्लंडमधल्या एका सुधारक कुटुंबात झाला होता, पण लहानपणीच वडील वारल्यानंतर त्याचे बालपण इतर नातेवाइकांकडेच गेले. त्याने आधी अनेक भाषा, व्याकरण, धर्मशास्त्रे, तत्वज्ञान, इतिहास इत्यादींचा सखोल अभ्यास केला आणि त्यावर लेखन आणि अध्यापनही केले. १७६७ साली त्याने विजेचा इतिहास लिहायला घेतला आणि त्या कारणाने तो विज्ञानाकडे वळला. इतर शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा अभ्यास करता करता त्याने स्वतःही काही प्रयोग करून पाहिले. निरनिराळ्या पदार्थांमधून वीज किती वाहते यावर प्रयोग करून फक्त धातू आणि पाणी यामधून विजेचे वहन होते हा महत्त्वाचा शोध लावला.  
 
त्यानंतर त्याने रसायनशास्त्र, ज्वलन आणि हवेवरील संशोधनाकडे लक्ष दिले. त्याने अनेक रसायनांना प्रयोगशाळेमधील उपकरणांमध्ये तापवून किंवा जाळून निरनिराळे वायू तयार केले. त्यातलाच एक प्राणवायू होता. त्याशिवाय नायट्रस ऑक्साइड, नायट्रिक ऑक्साइड, अमोनिया वगैरे इतर अनेक वायू होते, पण त्या काळी त्यांची ओळख झाली नव्हती आणि त्यांना तशी नावे दिलेली नव्हती. प्रीस्टली या सर्वांना वेगवेगळ्या प्रकारची हवा असे म्हणत असे. त्याने कार्बन डायॉक्साइड वायूला पाण्यात विरघळवून सोडा वॉटर तयार करण्याचे तंत्र शोधून काढले. त्यामुळे त्याला शीतपेयांचा जनक असेही मानतात. त्याने प्रकाशकिरण आणि खगोलशास्त्रावरसुद्धा काम केले. तो एक अत्यंत बुद्धीमान, कल्पक, अभ्यासू आणि कष्टाळू संशोधक होता, तसेच त्याला इतरही अनेक विषयात गती होती.
 
प्रीस्टलीने इंग्लंडमधील तत्कालीन धर्मकारणात आणि राजकारणात बंडखोर किंवा क्रांतिकारकांच्या बाजूने सक्रिय भाग घेतला होता. त्याचा त्याला बराच त्रास भोगावा लागला. अखेर त्याने सन १७९४ मध्ये इंग्लंड सोडून अमेरिकेला स्थलांतर केले आणि अखेरची दहा वर्षे पेन्सिल्व्हानियामध्ये काढली.
 
-आनंद घारे 
 
 
सूत, कापड उत्पादनाच्या यंत्रांमध्ये झपाट्याने सुधारणा कशा होत गेल्या वाचा कापड गिरण्यांची सुरुवात या लेखात