नाटकाचा मुख्य घटक म्हणजे नाटकाची संहिता, त्यानंतर वर्णी लागते ती कलाकार आणि प्रेक्षकांची. साधारणत: नाटकासाठी हे तीन महत्त्वाचे घटक मानले जातात. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा, वेशभूषा यांचं स्थान तसं दुय्यम म्हणून गृहीत धरलं जातं. किंबहुना ते योग्यही असू शकेल. परंतु या दुय्यम घटकांना इतर सर्व घटकांची सांगड घालून एखादं नाटक उभं राहिलं, तर चांगलं नाटक उत्तम होण्यासाठी मदत होते.

प्रकाशयोजना हा दुय्यम घटक असला तरी त्यास नाटकात एक विशेष स्थान आहे. रंगमंचावरील घडणार्‍या घटना, कलाकारांच्या हालचाली, त्यांच्या चेहर्‍यावरील भाव स्पष्टपणे आणि ठाशीवाणे प्रेक्षकांना दिसाव्यात आणि अनुभवता याव्यात म्हणून प्रकाशयोजना गरजेची आहे.

प्रकाशयोजना म्हणजे काय? : प्रकाशयोजना म्हणजे नाटकातील महत्त्वाचे प्रसंग प्रकाशाची योग्य साथ देऊन अर्थपूर्णरीत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करणे. त्या दृष्टीने लाइट्स डिझाइन करता येते. मोठ्यांचे नाटक असो किंवा बालनाट्य प्रकाशयोजनेची गरज तितकीच असते. संहिता, विषय, कलाकार यातच काय तो फरक असतो.

प्रकाशयोजनेचे साहित्य : प्रकाशयोजनेत सर्वप्रथम आवश्यक असते ते स्पॉट आणि पार. प्रखर आणि लख्ख प्रकाश निर्माण करण्यासाठी स्पॉट लाइट किंवा पार वापरतात. हे स्पॉट बॅटमला (अँगलच्या साहाय्याने लावलेले आडवे बांबू किंवा लोखंडी खांब) लावलेले असतात. साधारण तीन ते चार बॅटमची व्यवस्था असते. स्पॉट जमिनीवर किंवा स्टँडवरदेखील आपल्याला हव्या त्या उंचीवर लावता येतात. स्पॉटलाइट आपल्याला हव्या त्या प्रमाणात कमीजास्त करता येते. मात्र पारलाइटमध्ये तशी सोय नसते. प्रसंगानुसार प्रकाशाची तीव्रता आणि सौम्यता नियंत्रण करण्यासाठी डिमरचा वापर करता येतो. काळानुसार डिमर्समध्येही बदल होत गेले. लिव्हर, बरणी, स्लायडर आणि हल्ली ऑटोमॅटीक डिमर कन्ट्रोल उपलब्ध आहेत. संगणकाच्या साहाय्याने प्रकाशाची तीव्रता, वेग, वेळ नियंत्रित करता येतो.

प्रकाशयोजना ही मुख्यत: रंगमंचारवरील कलाकार दिसण्यासाठी आणि प्रसंगाला अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी असते. त्यामुळे त्याची रचना करताना कोणत्याही कलाकाराची सावली दुसर्‍या कलाकारावर पडणार नाही याची काळजी प्रकाश योजनाकाराने घ्यायला हवी. यासाठी प्रकाशाची दिशा म्हणजेच अँगल लक्षात घेणे महत्त्वाचे असते. कोणत्या स्पॉट कोणत्या बॅटमवर असावा, तो किती अंश कोनात असावा, त्याची तीव्रता किती असावी याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. उदा., संपूर्ण रंगमंच प्रकाशित करायचा असेल तर पाहिल्या बॅटमचा वापर करून डाव्या बाजूच्या स्पॉटने रंगमंचाची उजवी बाजू आणि उजव्या बाजूच्या स्पॅटने रंगमंचाची डावी बाजू प्रकाशित  केल्यास रंगमंचाचा जास्तीत जास्त भाग प्रकाशित करता येतो. शिवाय कलाकारांवर एकमेकांची सावलीही पडत नाही. त्यामुळे अँगलच्या योग्य कोनाचा वापर करून कमीत कमी स्पॉटचा वापर करून प्रकाशयोजना करता येऊ शकते. वेळही वाचण्यास मदत होते.

-ऋषिकेश वायदंडे 

[email protected]

 बालनाट्यातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या पार्श्वसंगीताविषयी माहिती घेऊ खालील लिंकवर  

बालनाट्याचे संगीत (पार्श्वसंगीत)