रवींद्रनाथांचे क्र. २ चे मोठे भाऊ सत्येंद्रनाथ यांनी वडिलांच्या परवानगीने रवींद्रनाथांना वकिलीच्या अभ्यासासाठी आपल्याबरोबर इंग्लंडला घेऊन जाण्याचे ठरवले. त्या वेळी रवींद्रनाथांचे वय होते सतरा वर्षे. असेही ठरले की, त्याआधी इंग्रजी रीतिरिवाज शिकून घेण्यासाठी आणि तिथे राहायच्या तयारीसाठी रवीने सत्येंद्रनाथांबरोबर अहमदाबादला जावे. अहमदाबादला सत्येंद्रनाथ डिस्ट्रिक्ट जज पदावर काम करत होते.

त्यानुसार तरुण रवी अहमदाबादला गेले. घराजवळच साबरमती नदी वाहत होती. तिच्या शांत किनाऱ्यावर रवींद्रनाथ तासनतास बसत आणि आपल्या कल्पनाशक्तीची साधना करत. (त्यावर आधारित ‘क्षुधित पाषाण' लघुकथा त्यांनी नंतर लिहिली.) रिकाम्या वेळात त्यांनी तिथे भरपूर इंग्रजी वाचन केले आणि त्या भाषेचा अभ्यास केला. नंतर सत्येंद्रनाथांनी त्यांना मुंबईला एका पारशी कुटुंबात राहायला पाठवले, ज्या योगे इंग्रजी संभाषण करताना त्यांना कुठली अडचण येणार नाही.

सप्टेंबर १८७८ मध्ये दोघे भाऊ इंग्लंडला रवाना झाले. सत्येंद्रनाथांच्या पत्नी आणि मुले आधीपासूनच ब्रायटनला राहत होते. रवींद्रनाथ काही दिवस त्यांच्याबरोबर राहिले. नंतर बॅरिस्टरीच्या अभ्यासासाठी ते लंडनला गेले.

सुरुवातीला रवींद्रनाथ एका बोर्डींग स्कूलमधे राहिले. त्यानंतर डॉ. स्कॉट यांच्या घरी राहिले. तिथे त्यांना मिसेस स्कॉट आणि त्यांच्या मुली यांच्याकडून घरातल्याप्रमाणे खूप प्रेम, आपलेपणा मिळाला. लंडनमध्ये युनिव्हर्सिटी कॉलेजमधे त्यांनी प्रवेश घेतला. अभ्यासाशिवायच्या रिकाम्या वेळात समवयस्क तरुणांबरोबर काव्य आणि साहित्यचर्चा करण्यात त्यांना आनंद मिळे. साहित्यातील सौंदर्यशास्त्र, नवीन प्रवाह यांवरील मतमतांतरे ऐकून, वाचून रवींद्रनाथांची प्रतिभा संपन्न होऊ लागली.

दुर्दैवाने रवींद्रनाथ तो कोर्स पूर्ण करू शकले नाहीत. सत्येंद्रनाथांची दीर्घ रजा संपली आणि त्यांच्याबरोबर रवींद्रनाथांनी भारतात परत यावे, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले. फेब्रुवारी १८८० मध्ये ते भारतात परतले. या छोट्या लंडनमधील मुक्कामात रवींद्रनाथांचा पाश्चिमात्य संगीताशी उत्तम परिचय झाला. भारतीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीत यांतील फरकाचा त्यांनी अभ्यास केला. युरोपियन संगीतात अनेकानेक विषयांचा अंतर्भाव असतो आणि अतिशय प्रेमाने ते सर्वांशी नाते जोडते. मात्र ते सामान्य माणसांच्या साध्या साध्या, दिवसभराच्या घडामोडींशी निगडित असते. त्याउलट भारतीय संगीतात मर्यादित विषय असतात. जसे भक्ती, मुक्ती, आत्मा, परमात्मा, त्याग इ. त्याद्वारे भारतीय संगीत जगण्यातील क्षुद्रपणा काढून टाकायला सांगते आणि मनाला शांततेची अनुभूती देते. भारतीय संगीत आत्म्याला साद घालते आणि परमात्म्याशी आपल्याला जोडून टाकते. पाश्चिमात्य संगीतातील रोमँटिकपणाचे त्यांना कौतूक वाटले. त्यातील विविधता, भावनांचे प्रगटीकरण, उत्तम दर्जा आणि मोठा आवाका याबद्दल त्यांना उत्सुकता वाटत होती. भारतीय संगीतात हे सर्व गुण आहेत, पण ते अशा प्रकारे उघड आणि विस्तृत प्रमाणात नाहीत. भारतीय संगीत मनाला, आत्म्याला भिडते, शांततेचा, अलौकिकतेचा सुखद अनुभव देते, असे अभ्यासाअंती त्यांचे मत बनले.

इंग्लंडमध्ये ते संगीताला सुरांमधे गुंफायला शिकले. पुढील काळात रवींद्रनाथांनी आपल्या कवितांना चाली लावताना पाश्चिमात्य आणि अभिजात भारतीय संगीत यांचे एकत्रीकरण करुन, फ्युजन करुन संगीताची स्व:ताची वेगळी शैली निर्माण केली. ही शैली म्हणजेच सुप्रसिद्ध ‘रवींद्र संगीत‘ ! रवींद्र संगीत आजही जगभरात गायले जाते आणि अभ्यासले जाते.

यू ट्युबवर किंवा इंटरनेटवर रवींद्र संगीत नक्की ऐका.

-स्वाती दाढे

[email protected] 

 

गुरुदेव रवींद्रनाथांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या त्यांच्या भावंडांविषयी माहिती घेऊ खालील लेखात
रवींद्रनाथांचे भाऊ आणि बहिणी