मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध मोक्षदा एकादशीला गीताजयंती साजरी करतात. ‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथाची जयंती ही आपल्या भारतीय संस्कृतीच्या महानतेची खूण आहे. एखाद्या महान ग्रंथाला ही महती लाभते, हे त्या संस्कृतीचे मोठेपण, ज्या देशात ती साजरी होते त्या देशाचे मोठेपण, ‘गीता’ आपल्या जीवनाचा आधार मानतात, त्या माणसांचेही मोठेपण.

‘श्रीमद्भगवद्गीता’ श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. प्रत्यक्ष भगवंतांनीच स्वतः सांगितलेले जीवनविषयक तत्त्वज्ञान म्हणून या ग्रंथाची थोरवी आहे.

‘महाभारत’ या महाकाव्यातील भीष्मपर्वामध्ये ‘गीता’ आलेली आहे. महाभारतातील पांडव व कौरव यांच्या कथा आपल्याला माहीत आहेत. कौरव व पांडव यांच्या युद्धाचा नाट्यमय प्रसंग सार्‍यांना माहीत आहे. हे युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्णांनी शिष्टाई केली. ती असफल झाली. कौरव व पांडव यांचे युद्ध निश्‍चित झाले. पांडवांच्या बाजूने श्रीकृष्ण होते. अर्जुनाच्या रथाचे ते सारथी होते.

कौरव व पांडव यांच्या सेना कुरुक्षेत्रावर समोरासमोर उभ्या राहिल्या. कौरवांकडे अकरा अक्षौहिणी सैन्य होते आणि पांडवांकडे सात अक्षौहिणी सैन्य होते. एक अक्षौहिणी सैन्य म्हणजे एकवीस हजार आठशे रथ, एकवीस हजार आठशे सत्तर हत्ती, पासष्ट हजार सातशे दहा घोडे आणि एक लाख नऊ हजार तीनशे पन्नास पदाजी! या सगळ्यांचा समूह. असा विशाल समूह! असे विराट सैन्य! हे नीती-अनीतीचे द्वंद्व होते. हे धर्म-अधर्म यांचे युद्ध लढले जाणार होते.

अर्जुन आपले सारथी श्रीकृष्ण यांना म्हणाले, ‘दोन्ही सेनांच्यामध्ये माझा रथ नेऊन उभा कर.’ ज्यांच्याशी युद्ध करावयाचे आहे ते सारे स्वजन आहेत हे अर्जुनाने पाहिले. ते सारे पितामह, गुरू, काका, मामा, भाऊ, मित्र इत्यादी स्वजन होते. या सार्‍यांच्या संहाराचे चित्र त्याच्यासमोर उभे राहिले. यांना ठार मारून आपण जिंकण्याची कल्पना त्याला सहन होईना. त्या सार्‍यांबद्दल मोह त्याच्या मनात जागा झाला. त्याच्या हृदयात करुणा जागी झाली. तो संहार डोळ्यांनी पाहण्यापेक्षा युद्धातून निवृत्त होऊन संन्यास घेतलेला बरा, असा विचार त्याच्या अंतःकरणात प्रबळ झाला. काय करावे, काय करू नये, आपले कर्तव्य काय आहे, याबद्दल त्याच्या मनात द्विधा अवस्था निर्माण झाली. अर्जुनाच्या मनाच्या स्थितीचे आणि त्या रणांगणाचे अत्यंत वेधक असे चित्र गीतेच्या पहिल्या अध्यायात उभे केलेले आहे, या पहिल्या अध्यायाचे नाव ‘अर्जुन विषाद योग’ असे आहे.

अर्जुनावर अंतःबाह्य जो परिणाम झाला, त्याचे चित्रण या पहिल्या अध्यायात आले आहे. अर्जुनाची गात्रे शिथिल झाली. त्याचे तोंड कोरडे पडले. शरीराला कंप सुटला. अंगावर रोमांच उभे राहिले. त्याचे धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले. त्वचेचा दाह होऊ लागला. मन भ्रमिष्ट झाले आणि या सार्‍यांचा परिणाम होऊन उभे राहण्यासाठी तो असमर्थ झाला. त्याच्या मनातील वीरवृत्तीची जागा कारुण्याने घेतली. कर्तव्य-अकर्तव्यांचा विवेकच अर्जुनाला कळेना. श्रीकृष्णांना तो शरण गेला. म्हणून श्रीकृष्णांना गीता सांगावी लागली. गीतेचा उपदेश श्रीकृष्णांनी अर्जुनाला केला. मात्र गीतेच्या उपदेशाचा हेतू फारच व्यापक होता.

श्रीकृष्णांनी, कर्तव्य आणि अकर्तव्य कोणते? याचा विवेक जागा केला. अर्जुनाचे कर्म हे निष्काम, ईश्‍वरार्पण आणि धर्मरक्षणार्थ व्हावे; म्हणून भगवंतांनी त्याच्या कर्माला ज्ञानाचे डोळे दिले. विविध प्रकारचे ज्ञान त्याला दिले. पुढील एकूण सतरा अध्यायांमधून भगवंतांचा व अर्जुनाचा जो संवाद झाला; तो म्हणजे गीता! सर्व प्रकारच्या शंकांचे निरसन झाल्यावर, ज्ञानी झाल्यावर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला,

‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादरान्मयाच्युत।

स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव॥

(गीता - १८-७३)

‘हे श्रीकृष्णा, (अच्युता) आपल्या कृपेने माझा मोह नष्ट झाला. मला स्मृती प्राप्त झाली, त्यामुळे मी संशयरहित झालो आहे. आपल्या आज्ञेचे मी पालन करीन.’

श्रीमद्भगवद्गीतेचा हेतू माणसाला त्याच्या कर्तव्याचे ज्ञान देणे हा आहे. त्याला आत्मोन्नत करून आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणे, हे गीतेचे प्रयोजन आहे.

श्रीमद्भगवद्गीता हा जगातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ आहे. गीतेमध्ये १८ अध्याय आहेत, ७०० श्लोक आहेत. उपनिषदांमधील श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचे सार गीतेमध्ये आले आहे. भारतीय तत्त्वज्ञानात उपनिषदांना सर्वोच्च असे स्थान आहे. उपनिषदांतील तत्त्वज्ञानालाच ‘वेदान्त’ असे म्हणतात. ‘वेदान्त’ म्हणजे अध्यात्मविद्या किंवा सर्वश्रेष्ठ अशी जीवनविद्या होय.

‘सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः।

पार्थोवत्साः सुधीभोक्ता दुग्धं गीतामृतं महत्॥

‘सर्व उपनिषदे याच कोणी गायी, भगवान श्रीकृष्ण हे स्वतः दूध काढणारे (गवळी), बुद्धिमान अर्जुन हा भोक्ता वत्स आणि (अशी अपूर्व सामग्री जुळून आल्यावर) जे दूध काढले तेच हे मोठे गीतारूपी अमृत होय.’

श्रीमद्भगवद्गीतेच्या पाठीमागे मोठे व्यक्तिमत्त्व उभे आहे, ते श्रीकृष्णांचे. गीता आणि श्रीकृष्ण यांचे वर्णन करण्यासाठी भारतीय साहित्य व तत्त्वज्ञान या क्षेत्रात गेली शतके अनेक बुद्धिमान, प्रज्ञावान व्यक्तींनी आपले सारे चिंतनसामर्थ्य पणाला लावले आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या व्यक्तिमत्त्वाचे किती पैलू सांगावेत. दुर्गा भागवत यांनी ‘व्यासपर्व’ या आपल्या ग्रंथात म्हटले आहे, ‘या अनासक्त योगेश्‍वराला उचित मरण समाधीचे! पण याही पारंपरिक भूमिकेचा त्याने त्याग केला. त्याला मरण आले विननात; व्याधाचा बाण लागून. मुलगा, सवंगडी, भाऊ, वादक (मुरलीचे वादन करणारा कलावंत), प्रियकर, योद्धा, पती, राजा, राजकारणपटू, वक्ता, योगी, तत्त्वज्ञ या सार्‍या भूमिकांत अपरंपार रस ओतून श्रीकृष्णाने शेवटी या सार्‍यांची परमावधी साधा माणूस म्हणून मरण पत्करण्यात गाठली!’

महाभारतातील श्रीकृष्ण ही एक महान अजरामर अशी व्यक्तिरेखा! गीतेच्या रूपाने त्यांची वाणी अमर झालेली आहे.

भागवत धर्माचाच नव्हे, तर हिंदू धर्मातील सर्व धार्मिक संप्रदायांना मान्य असलेला हा ग्रंथ म्हणजे ‘श्रीमद्भगवद्गीता’ होय. भारताच्या बाहेरही शेकडो वर्षे या ग्रंथाचे भक्त व भाष्यकार होऊन गेले आहेत. अरबी मुसाफीर अल्बिरूनी याने हा ग्रंथ अभ्यासल्याचा उल्लेख सापडतो. १७८५ मध्ये लंडनमध्ये विलकिन्सन याने गीतेचे भाषांतर करून प्रसिद्ध केले. युरोप खंडातही त्याचा अभ्यास झाला.

‘श्री ज्ञानेश्वरी’ हा महान ग्रंथ श्री ज्ञानेश्‍वरांनी लिहिला. गीतेवरील हा भाष्यग्रंथ गेली ६००-७०० वर्षे अवघ्या महाराष्ट्रात सामान्य भक्तांपासून बुद्धिमान, संशोधक, चिकित्सकांपर्यंत अभ्यासला जात आहे. ‘भावार्थदीपिका’ या नावानेही तो ओळखला जातो. वामन पंडितांनी ‘यथार्थदीपिका’ या नावाने गीतेवर भाष्यग्रंथ लिहिला. संतांनी, पंडितांनी गीतेचा अभ्यास करून त्यावर विवेचन केले आहे.

आधुनिक काळात लोकमान्य टिळकांनी ‘श्रीमद्भगवद्गीतारहस्य’ अथवा ‘कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला. या अपूर्व अशा ग्रंथातून लोकमान्यांनी कर्मयोगाचा सिद्धांत मांडला. अत्यंत वाचनीय, चिंतनीय अशा या ग्रंथात लो. टिळकांच्या विद्वत्तेचे दर्शन घडतेच; पण त्यांच्या सामाजिक-राजकीय जीवनाची प्रेरणा, तात्त्विक भूमिकाही त्यात पाहावयास मिळते.

महाराष्ट्राचे पूर्व शिक्षण संचालक यांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे, ‘‘माणसाने माणूस म्हणून जगावं कसं - इतकंच नव्हे, तर शेवटचा श्‍वास कसा घेतला जावा याचं मर्म सांगणारी, जीवनाचं निव्वळ शास्त्रच नव्हे; तर जगण्याची कलाही शिकवणारी गीता केवळ व्यक्तिगत मुक्तीचा संकुचित विचार न करता आपल्या सभोवतालच्या समष्टीचा आणि सृष्टीचा विचार करून आपलं प्रत्येक कर्तव्यकर्म करत करत विश्‍वव्यापी परमेष्टीशी त्या जगदीश्‍वराशी, आपल्या अंतःस्थ चित्शक्तीशी - एकरूप होऊन जीवनातलं खरंखुरं सुख, खराखुरा आनंद आणि खरीखुरी शांती कशी मिळवायची याचं आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शन करते.’’

विचारांचा महान ठेवा देणारा हा ग्रंथ म्हणजे गीता! त्या गीतेचं अध्ययन, चिंतन आपल्याला जीवनाची वाट दाखवते. गीतेवरील भाष्यग्रंथ आणि भाष्यकार आपलं मन व जीवन समृद्ध करतात. भगवान श्रीकृष्ण, महर्षी व्यास, श्री ज्ञानेश्‍वर, संतश्रेष्ठ तुकाराम, लो. टिळक अशी किती म्हणून नावे घ्यावीत? त्याच्या जीवनचरित्रांचा, विचारांचा अभ्यास करून आपल्या विद्यार्थीजीवनाचं सार्थक करू या! श्रीमद्भगवद्गीता आपल्या जीवनाचा आधार मानू या! गीता, श्रीकृष्ण यांना अभिवादन करू या!

- श्रीराम वा. कुलकर्णी

[email protected]