चौकीलॉक

दिंनाक: 17 Dec 2018 15:09:19


छोट्या अन्वयला कॉटवर झोपायचं होतं. आई म्हणाली, ‘‘हरकत नाही पण तुझ्या बाजूला उश्या ठेवते म्हणजे तू झोपेत पडणार नाहीस.’’

अन्वय रागाने फुणफुणत म्हणाला, ‘‘पण आता मी काही लहान नाहीए. मी तीन वर्षांचा आहे. मी मोठ्या माणसांसारखाच कॉटवर हात पाय ताणून झोपणार म्हणजे झोपणार आणि खाली नाही पडणार.’’

आई फक्त हसली. काही नाही बोलली.

मोठ्या रुबाबात अन्वय कॉटवर झोपला आणि म्हणाला, ‘‘आई माझ्याजवळ बस ना. मला थोपट ना.’’

आई त्याच्या बाजूला बसत म्हणाली, ‘‘अरे, आता तू मोठा झालायस ना..?’’

‘‘अगं, मी मोठा इतरांसाठी. तुझ्यासाठी नाही. मी तुझा अन्वूच.’’

‘‘महालबाड आहेस तू.’’, असं म्हणत आई अन्वयला थोपटू लागली. गाणं गुणगुणू लागली. दोन मिनिटात अन्वय गाढ झोपला.

अन्वय झोपल्याचे पाहताच आईने कॉटच्या बाजूला सतरंजी घातली. त्यावर एक गादी घातली. त्यावर पाच उश्या पसरून ठेवल्या. म्हणजे जर का अन्वय कॉटवरून खाली पडला तर तो उशीवरच पडेल. त्याला लागणार नाही.

थोड्याच वेळात अन्वयची झोप चाळवली. त्याने काळोखातच बाजूला हात फिरवून आपण झोपल्यावर आपल्या बाजूला आईने उशा ठेवल्या आहेत का? हे पाहिलं. मग मात्र आनंदाने हात पाय ताणून झोपला.

सकाळी जाग आली तेव्हा मात्र अन्वय खाली उशांवर झोपलेला होता. तो किरकिरत म्हणाला, ‘‘आई मी इथे कसा आलो?’’ आई काही बोललीच नाही.

म्हणजे माझी लोळालोळी घसराघसरी? खालीमुंडी घसरगुंडी?

‘‘लागलं नाही ना? चल तोंड धू. दूध पी.’’

अन्वय दूधाचा कप घेऊन खिडकीत बसला. आपण असे कसे काय खाली घसरलो? झोपेत खाली कसे पडलो?  याचाच विचार करत होता.

इतक्यात कावळ्याचं एक भिजलेलं पिल्लू खिडकीत येऊन उभं राहिलं.

‘‘अरे, कावळू तुला पुसायला मऊमऊ रुमाल देऊ का?’’

‘‘अरे, अन्वू आमच्यासाठी रुमाल म्हणजे नुसती धमाल.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘अरे, आम्ही तुमच्यासारखे अंग पुसत नाही...’’

‘‘म.. .. काय?’’

‘‘नुसती फडफड फडफड आणि झडझड झडझड. बस्स! हे बघ..’’

कावूळने पंख उघडले पिसं फुलवली आणि केली फडफड झडझड.

तोंडावर उडालेलं पाणी पुसत अन्वू ओरडला, ‘‘अरे, बास..बास.’’

कावळू पंख मिटून घशातल्या घशात कुर्र..किवकिव करत राहिला.

‘‘कावळू, तू झाडावर बसून झोपतोस ना? ’’.. रात्री तुझी आई झाडाखाली पिसांची गादी घालून ठेवते का रे?’’

‘‘अरे, मी पडतच नाही. त्यामुळे आई गादी घालतच नाही.’’

‘‘तू झोपेत खाली पडतच नाहीस? कध्धीच पडत नाहीस.. खरंच?’’

‘‘हो रे. माझ्या पायांची बोटं बघ ना...’’

‘‘कावळू, तुझ्यापेक्षा माझ्या पायांना एक-एक बोटं जास्ती आहे. मला दोन हात पण आहेत. माझ्या हातांना पाच-पाच बोटं पण आहेत. तरी.. तरीपण मी झोपेत खाली पडतो रे.’’

‘‘अन्वू, नुसती बोटं महत्त्वाची नाहीत. महत्त्वाची असते बोटांची रचना.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘अरे, माझी बघ तीन बोटे पुढे आहेत आणि एक मागे आहे.’’

‘‘हां...हां... म्हणजे तू या चार बोटांनी फांदी पकडून ठेवतोस आणि झोपतोस.. हो ना?’’

‘‘मी फांदी पकडतच नाही.’’

‘‘आँ!.. तुला कोण पकडतं?’’

‘‘तुमच्या हाताला पाच बोटं आहेत म्हणून तुम्ही त्याला पंजा म्हणता किनई? आम्हीपण तसंच म्हणतो. पण माझे बाबा ‘शाना कौआ’ आहेत. ते म्हणतात...’’

‘‘काय म्हणतात?’’

‘‘आपल्याला चार बोटं आहेत म्हणून आपण त्याला ‘चौकी’ म्हणायचं. किर्रकूर्र....’’

‘‘ओरडू नकोस. तू झोपेत पडत का नाहीस ते मला सांग.’’

‘‘ऐक. आम्ही ज्या चौकीने फांदीला घट्ट पकडतो त्या चौकीचे नियंत्रण करणारे स्नायू आमच्या घोट्याला जोडलेले असतात. आम्ही फांदीवर बसलो की आमचं वजन पायांवर पेललं जातं.’’

‘‘... त्यामुळे काय होतं?’’

‘‘त्यामुळे पायांचे स्नायू ताणले जाऊन, आमचे चौके फांदी भोवती गच्च आवळले जातात. जोपर्यंत आम्ही झाडावर बसून आहोत तोपर्यंत...’’

‘‘कळलं मला.’’

‘‘तोपर्यंत तुमचे चौके जणूकाही फांदीला कुलुपबंद होतात. हो ना?’’

‘‘बरोब्बर!’’

‘‘म्हणजे कधीपण तू झाडावर बसलास तर तू मुद्दामहून फांदी पकडत नाहीस तर.. तुझ्याकडून ती कुठलाही प्रयत्न न करता घट्ट पकडली जाते.’’

‘‘बिलकूल सही! म्हणून तर आई झाडाखाली गादी घालत नाही.’’

‘‘ए मला चिडवू नकोस हं. पण तू हे चौकीलॉक काढतोस कसं?’’

‘‘पायांवरचं शरीराचं वजन काढलं की झालं...’’

‘‘म्हणजे उडण्याच्या वेळी.. हो ना?’’

‘‘किर्रकुर्र शाबास किर्रकुर्र म्हणत कावळू उडाला.’’

अन्वय मात्र पंजे चोळत पाहातच राहिला.

-राजीव तांबे 

[email protected]

मुंगीशी गप्पा  

गप्पागप्पी मुंगीशी