खूप खूप वर्षांपूर्वी, कुशाण राजा कनिष्क उत्तर भारतात राज्य करत होता. त्याच्या राज्यातून जाणार्‍या ‘सिल्क रोड’वरील व्यापाराने त्याचे राज्य भरभराटीस आले होते. या राजाचे एक बिरूद होते - ‘शाहो नानो शाहो’, अर्थात शहांचा शहा, शेहेनशहा!

तर, या कनिष्क राजाला बौद्ध धर्माबद्दल अंतरिक ओढ होती. त्याने पुरुषपुरामध्ये बुद्धाचा एक प्रचंड मोठा स्तूप बांधला होता. हा स्तूप आता ‘शहाजी की डेरी’ या नावाने ओळखला जातो. बौद्ध धर्मातील विविध पंथांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी कनिष्कने बौद्धधर्म परिषद भरवली. काश्मीरमधील कुंडलवन येथे त्याने परिषदेचे आयोजन केले होते आणि परिषदेचे  कामकाज पाहण्यासाठी कनिष्काने कवी अश्वघोषला बोलावले होते.

अश्वघोष नावाचा एक विद्वान कवी अयोध्येत राहत होता. त्याने आचार्य पूर्णयश यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो कवी होता, संगीततज्ज्ञ होता आणि तो बुद्धाच्या कथा सांगत असे. असे म्हणतात की तो कथा सांगत असता, रस्त्याने जाणारे अश्वसुद्धा आवाज न करता जात, म्हणून त्याचे नाव अश्वघोष! तर संगीताच्या कामकाजासाठी काश्मीरमध्ये आलेला अश्वघोष नंतर इथेच रुळला व कनिष्कच्या दरबारात राजकवी म्हणून रुजू झाला. 

अश्वघोषाने नंतर अनेक बौद्ध ग्रंथ, काव्य व नाटक लिहिली. त्याच्या बौद्ध साहित्यात रामायण, महाभारत, गीता, उपनिषदे, पौराणिक कथा यांचा संदर्भ येतो. त्याने लिहिलेले बुद्धचरित हे महाकाव्य मानले जाते! यामध्ये बुद्धाच्या जन्मापासून बुद्धाला बोधीप्राप्ती होईपर्यंतचे कथानक आले आहे. अश्वघोषाने बुद्धचरित लिहिताना आधार घेतला ‘महावस्तु’ व ललितविस्तार’ या जुन्या ग्रंथांचा. ‘ललितविस्तार’मध्ये देखील बुद्धाचे चरित्र आले आहे, तर  ‘महावस्तू’मध्ये बुद्धाचे चरित्र, कथासाहित्य व जातककथा होत्या. अश्वघोषाने या दोन्ही ग्रंथातील अतिशयोक्ती, चमत्कारिक घटना, दंतकथा यांना बगल देऊन बुद्धाचे चरित्र लिहिले.

‘बुद्धचरित’मध्ये आपल्याला राजकुमार सिद्धार्थचे वर्णन, त्याची राजवाड्याबाहेरची पहिली फेरी, त्या वेळी त्याला दिसणारे हृदयद्रावक दृश्य, राजकुमाराचा गृहत्याग, त्याची साधना आणि बोधीप्राप्ती अशी कथा येते. ‘बुद्धचरित’मध्ये एक गोष्ट आहे, बलराम नावाच्या राजाची. ती अशी -

राजा बलराम चार मोठ्या पेट्या आणवतो. एक पेटी असते सोन्याची, हिरे - माणकांनी जडवलेली. दुसरी चांदीची, मोत्या - पोवळ्यांनी मढलेली. तिसरी साधी लोखंडाची आणि चौथी पेटी कासेची. पहिल्या दोन पेट्यामंध्ये राजा हाडे भरतो. दुसर्‍या दोन पेट्यांमध्ये तो सोन्याचे दागिने, रत्नजडीत अलंकार भरतो. या चारी पेट्या बंद करून, समोर मांडून तो आपल्या सरदारांना बोलावतो. त्यांना विचारतो यातील सर्वांत मौल्यवान पेटी कोणती? सगळे सरदार पहिल्या दोन पेट्यांकडे बोट करतात. राजा त्या पेट्या उघडतो, तेव्हा आतील किळसवाणे सापळे पाहून सरदार चपापतात. त्यावर बलराम राजा उरलेल्या दोन, अगदी साध्या पेट्या उघडतो. त्यामध्ये सोने, मोती, हिरे, माणके व मौल्यवान रत्नजडीत अलंकार पाहून त्यांचे डोळे दिपतात. तेव्हा राजा त्यांना सांगतो - वरवर सुंदर कपडे घालून आतमध्ये मात्र दुष्ट विचारांना थारा देणारी लोकं या पहिल्या दोन पेटीप्र’ाणे असतात; तर आतून सुंदर विचार धारण करणारी लोकं, वरून कसले का कपडे घालेनात, या साध्या पेटीसारखी मौल्यवान असतात. तुम्ही राज्यात फिरताना, प्रजेशी व्यवहार करताना हे लक्षात ठेवा. गरिबाची हेटाळणी करू नका आणि श्री’ंतीच्या देखाव्याला भुलू नका. 

अशा सुंदर कथांनी भरलेलं अश्वघोषचे बुद्धचरित भारतातच काय, चीन आणि पर्शिया मध्ये सुद्धा लोकप्रिय होते. कालांतराने बुद्धाच्या कथा पर्शिया मधून रोम मध्ये पोचल्या. मग, १३ व्या शतकात, काय झालं? “Gesta Romanorum” अर्थात “रोमन लोकांचे कार्य” या नावाचा एक लॅटिन कथासंग्रह लिहिला गेला. या कथासंग्रहात अनेक भारतीय कथा मिळतात. त्या मध्ये बलरामाच्या पेट्यांची कथा पण आहे.

१६ व्या शतकात, शेक्सपीयरने Gesta Romanorum  मधली पेट्यांची कथा “मर्चंट ऑफ व्हेनिस” मध्ये घेतली. शेक्सपीयरच्या गोष्टीचे नावे आहे “Story of 3 caskets“. शेक्सपीयरच्या कथेत तीन पेट्या आहेत – एक सोन्याची, एक चांदीची आणि एक लाकडाची. एका पेटीमध्ये श्रीमंत नायिकेने आपले चित्र ठेवले असते. जो कोणी चित्र असलेली पेटी ओळखेल, त्याच्याशी लग्न करायचे असे तिने ठरवले असते. जो येतो तो सोन्याची नाहीतर चांदीची पेटी उघडतो. तिला असे वाटते की त्यांचे तिच्यावर नाही तर तिच्या संपत्तीवर प्रेम आहे. शेवटी नायक येतो. तो लाकडी पेटी उघडतो, त्या मध्ये नायिकेचे चित्र असते. नायिकेला आनंद होतो, त्या दोघांचे लग्न होते, आणि मग ते सुखाने राहतात!

तर ही आजची कहाणी – अश्वघोषाच्या जगप्रसिद्ध  कथांची!

-दिपाली पाटवदकर

[email protected]

राजा, कवी आणि कथा या कथामालेत कथा - अमरशक्ती, विष्णुशर्मा आणि पंचतंत्र.
अमरशक्ती, विष्णुशर्मा आणि पंचतंत्र