हिवाळा ॠतू हा भटकंतीसाठी उत्तम असा ॠतू. याच ॠतूमध्ये सर्वाधिक गड, किल्ल्यांना गवसणी घातली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे पाऊस आणि उन्हाची भीती नसते. हा ॠतू आरोग्य कमाविण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. पहाटेची बोचरी थंडी, नंतर कोवळ्या उन्हामुळे मिळणारी ऊब आरोग्यासाठी चांगली मानली जाते.

अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज डोंगररांगेतील हरिश्‍चंद्र किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय. ४००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदूर्ग प्रकारातील आहे. ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड. एखाद्या गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो, हे हरिश्चंद्रगडाकडे पाहिले की कळते.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

हरिश्चंद्रेश्‍वराचे मंदिर : तळापासून या मंदिराची उंची साधारणत: १६ मीटर आहे. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणार्‍या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ॠषींनी’ चौदाशे वर्षे तप केले आहे, असे स्थानिक गावकरी सांगतात. चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर, भिंतींवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्‍चर्या करून ‘तत्त्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे, त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबार्‍याच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.

केदारेश्वराची गुहा : केदारेश्वराच्या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरेएवढे पाणी आहे. याच गुहेत एक खोली आहे. खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.

Image result for harishchandra fort kedareshwar cave

तारामती शिखर : तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणत: उंची ४८५० फूट आहे. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुहेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. गुहेपासूनच अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर पोहोचता येते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, तसेच घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात.

कोकणकडा : कोकणकडा म्हणजे हरिश्‍चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळाकभिन्न रौद्र-भीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणत: ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पाहायला मिळतो.

कसे जाणार?

खिरेश्वर गावातून जाणारी वाट : सर्वात प्रचलित असणारी वाट खिरेश्वर गावातून गडावर येते. या वाटेने येण्यासाठी पुण्याहून आळेफाटा मार्गे अथवा कल्याणहून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्यास उतरावे. खुबी फाट्यावरून धरणावरून चालत गेल्यावर ५ कि.मी. अंतरावर खिरेश्वर गाव लागते. या गावातून दोन वाटा गडावर जातात. एक वाट ही टोलार खिंडीतून गडावर सुमारे ३ तासात मंदिरापर्यंत पोहोचते.

नगर जिल्ह्यातून : हरिश्चंद्रगडावर जाण्याची वाट ही नगर जिल्ह्यातून आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. एक राजूर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्‍वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे. दुसरा मार्ग म्हणजे, हल्लीच राजूर ते टोलारखिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. एक तासात टोलारखिंडीत पोहोचता येते, तर तेथून २ तासात मंदिरात पोहोचता येते.

गडावर हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या गुहेत तसेच गणेशगुहा व आजूबाजूच्या गुहेत राहता येते. खिरेश्वर मार्गे ४ तास तर पाचनई मार्गे ३ तास लागतात. जाताना पुरेसे जेवण आणि पाणी घेऊन जावे. हिवाळ्याच्या सुट्टीत आई बाबांसोबत हरिश्चंद्रगडाच्या भटकंतीला जरूर जा आणि तुम्ही केलेली मज्जा अनुभवा आणि आम्हाला नक्की लिहून पाठवा.

- प्रतिनिधी

[email protected]

नुकतीच हिवाळ्याची चाहूल लागली आहे. या ऋतुत निरोगी कस राहावं सांगत आहेत बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रमोद जोग.

हिवाळ्यातील आरोग्य