कल्याणदादा व जुईताईच्या कामाची सर्वत्र चर्चा सुरू होती. सोसायटीत काही कचऱ्याची समस्या उद्भवली की सर्वजण त्यांचे सल्ले मागत. त्यांच्याशी चर्चा करत. कधी कधी चॅनलवाले त्यांची मुलाखत घायला येत. शालेय कार्यक्रमांना त्यांना पाहुणे म्हणून बोलावले जाई. हे सर्व सोसायटीतील बच्चेकंपनी पाहत होती. त्यांना फार भारी वाटत होते. उगीचच आपली कॉलर ताठ करत होते. मैदानावर, बागेत जमा झाले की फक्त एकच विषय गप्पांचा. कल्याणदादा आणि जुईताईने केलेले काम. कोणी त्यांच्याबरोबर सेल्फी घेत होते. आमच्या शेजारचे म्हणून भाव खात होते. पण तरीसुद्धा बच्चेकंपनी खूश नव्हती. काहीतरी कमी आहे असे सतत त्यांना वाटत राही. एक दिवस खेळता खेळता त्यांना लक्षात आले आणि समर्थ पटकन म्हणाला, ’मी सांगू का, आपण कल्याणदादा आणि जुईताई सारखे काहीतरी भारी केले पाहिजे.’ अक्षता म्हणाली, ‘पण अरे, आपण किती छोटे आहोत. आपण काय करणार?’ लगेचच पियुष म्हणाला, ‘म्हणून काय झाले? आपणही काहीतरी आयडिया शोधू या. आणि त्या दोघांसारखे काम करूयाच.’ हो हो नक्की करू या! म्हणून मोठा गलका झाला.

सर्वजण विचार करू लागले. आपले डोके खाजवू लागले. सोसायटीतील १०-१५ मुलामुलींनी विचार करायला सुरुवात केली. पण हे सगळं गुपचुप हं! अजून तरी कुणा मोठ्यांना काहीही सांगायचे नव्हते. आठ दिवस चर्चा व विचार करण्यात गेले. शेवटी एक मस्त, भन्नाट आयडिया समोर आली. ओंकार म्हणाला, ‘मी सांगतो सगळं व्यवस्थित.’ त्याने सुचलेली कल्पना सर्वांना समजावून सांगितली. प्रत्येकाला एक-एक काम वाटून दिले. वेळा ठरवून दिल्या. प्रत्येकजण वेगवेगळ्या वर्गात व वेगळ्या शाळेत शिकणारी मंडळी होती. आज होळी होती. ठरले. सर्वांना होळीसमोर शपथ घेतली. सर्वांनी नीट काम करायचे. ठरल्याप्रमाणे आपल्याला वर्गात प्लॅन सांगितला.

आपण अभ्यास केलेल्या गृहपाठ, निबंध, वर्गपाठ, गणित सरावाच्या वह्या भरल्यानंतर रद्दीत टाकतो. त्याचे फार पैसे ही येत नाही. शिवाय ही वही रद्दीवाला फाडून-तोडून पुठ्ठे बाजूला करतो. किती मन लावून अभ्यास केलेला असतो आपण. आपल्याला किती वाईट वाटते. मग या वह्या जर आपण आपल्या काही मित्रमैत्रीनांना वापरायला दिल्या तर? मुले ओरडू लागली, “अरे, रद्दीतल्या आणि लिहून संपलेल्या वह्या कोण घेणार?” त्यावर मुले सांगू लागली, 'अरे, असे आपल्या आजूबाजूला किती मित्रमैत्रिणी आहेत. जे वही पेन खरेदी करू शकत नाही. छोटे मोठे काम करून शिकतात. आई-बाबांना मदत करतात. त्यांना कुठे वहीत अभ्यास करायला वेळ असतो? मग त्यांनी आपल्या वह्या वाचून अभ्यास केला तर त्याचा वेळ त्यांचा वेळही वाचेल आणि खर्चाचीही बचत होईल. मुख्य म्हणजे आपल्या वह्या रद्दीत जाणार नाहीत व रद्दी आणि कचरा वाढणार नाही. जी काही कोरी पाने असतील ती पाने वापरून नव्या वह्या तयार करू. तोच आपला प्रोजेक्ट होऊ शकतो. आपण आपल्या शाळेत दाखवू शकतो.'

ही रद्दीतील भन्नाट कल्पना ऐकून सर्वांचे मन आनंदून गेले. प्रत्येकाने हे काम करण्याचे ठरविले. परीक्षा संपल्या आणि वह्या एकत्रित करण्याचे काम सुरू झाले. आता मोठ्यांना सांगितले गेले. समर्थ, ओंकार, अक्षता, पियुष यांनी आजी-आजोबांना सांगितले. त्यांच्या मदतीने काही वस्त्यांमध्ये हिंडून गरजू मित्रमैत्रिणींना शोधून काढले. त्यांच्या आई-बाबांच्या परवानगीने त्या-त्या वर्गाच्या वह्या त्या-त्या मुलांकडे पोहोचवल्या. ज्यांना कोऱ्या वह्या हव्या होत्या त्यांना त्या दिल्या.

जूनमध्ये मुलांचा हा गुपचुप कार्यक्रम जेव्हा आईबाबांच्या कानावर गेला तेव्हा ते जाम खुश झाले. त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना, ऑफिसमधील सहकाऱ्यांना अभिमानाने सांगितला. आता हळूहळू शहरातील इतर मुलेही रद्दीतील भन्नाट जादूत रमू लागली. कचरा कमी करू लागली. आपणही त्यांच्यात सामील होऊ या. कचरा कमी करू या. पर्यावरण वाचवू या !  

-सुनिता वांजळे 

[email protected]

 

कचऱ्याची समस्या या विषयावरील जुईचा निबंध तिच्या कल्याण दादाने प्रत्यक्षात कसा उतरवला? याविषयीची कथा.
जुईचा निबंध