मित्रांनो आणि मैत्रिणींनो, दिल्ली हे अनेक ऐतिहासिक इमारतींसाठी प्रसिद्ध आहे . पण तुमच्यासारख्या छोट्या मुलांना इतिहासात रस असेलच असं नाही. तुमच्यातल्या काही जणांना तर इतिहास बोअरिंग पण वाटत असेल. पण लहान मुलांना इंटरेस्ट वाटेल अशाही खूप गोष्टी दिल्लीत आहेत बरं का. इथे जंतरमंतर आहे ज्यात थोडं विज्ञान थोडी मजा आहे. इथे रेल्वे म्युझियम आहे तसंच बाहुल्यांचंही म्युझियम आहे. आज मी तुम्हाला बाहुल्यांच्या म्युझियमबद्दल सांगणार आहे. दिल्लीतली जी फिरायला जाण्याची प्रसिद्ध ठिकाणं आहेत त्यात सहसा हे डॉल्स म्युझियम ऐकायला मिळणार नाही . पण लहान मुलींना हे पाहायला आवडेल हे नक्की. मी जेव्हा हे म्युझियम पाहायला गेले, तेव्हा मला असं वाटलं होतं, बाहुल्यांचं काय म्युझिअम. इतकी काय व्हरायटी असणार बाहुल्यांची. पण मी तिथे गेले तेव्हा वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुल्या पाहायला मला खूप मजा आली. आता या म्युझियममध्ये ६००० बाहुल्या आहेत. झालात ना आश्चर्यचकित? १८० देशांमधून आलेल्या या बाहुल्या आहेत. इथल्या बाहुल्या अगदी काळजीपूर्वक ठेवलेल्या आहेत. त्यांना काचेच्या पेटीत ठेवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला त्या स्पष्ट पाहाता येतात आणि त्यांचं धुळीपासून संरक्षण होतं. परत तुमच्यासारख्या लहान मुलांना बाहुलीला हात लावून पाहावासा वाटणार, मग त्या बाहुलीचे कपडे, केस खराब होणार, त्यामुळे ती काचेतच असलेली बरी.  प्रत्येक बाहुलीच्या बरोबर ती बाहुली ज्या देशाची आहे त्या देशाच नाव लिहिलेलं आहे आणि त्या देशाचा झेंडाही आहे. काही काही ठिकाणी या बाहुल्या कोणी भेट म्हणून दिल्या आहेत त्यांची नावंही लिहिलेली आहेत.  अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, जर्मनी, चीन, जपान, पेरू  अशा वेगेवेगळ्या देशातल्या खास खास बाहुल्या इथे आहेत. भारतीय बाहुल्यांचा वेगळा सेक्शन आहे इथे. भारताच्या वेगेवेगळ्या भागातल्या नवरा आणि नवरीच्याही बाहुल्या आहेत बरं इथे. आहे की नाही गम्मत? माझी छोटी मुलगी आहे ना तिला वाटायचं बाहुली म्हणजे फक्त मुलगी असते. ह्या म्युझियममध्ये तिने नवरे पाहिले बाहुलीच्या रूपातले तेव्हा तिला आश्चर्यच वाटलं . भारतातले वेगवेगळे नृत्य प्रकार करणाऱ्या बाहुल्याही आहेत. पंजाबचा भांगडा आणि गिड्डाह डान्स, महाराष्ट्रातली लावणी, आसामचा बिहू ,गुजरातचा दांडिया आणि गरबा. कथकली करणाऱ्या बाहुलीची मानही मस्तपैकी हलते हं इथे. बाहुल्या वेगेवेगळ्या मटेरियलपासून बनवलेल्या असतात. काही जुने कपडे, कपड्याचे तुकडे यांनी भरून केलेल्या असतात, काही बाहुल्यांमध्ये स्पंज किंवा कापूस भरलेला असतो, काही बाहुल्या मातीच्या असतात, काही लाकडाच्या असतात. ह्या म्युझियममधल्या बऱ्याचशा जपानी बाहुल्या  लाकडाच्या आहेत.  ज्या ज्या देशातल्या बाहुल्या आहेत त्या देशातला पेहेराव किंवा त्या देशाची वैशिष्ट्य ह्या बाहुल्यांमध्ये दिसतात. अफगाणिस्तानच्या बाहुल्या बुरखा घातलेल्या आहेत. थंड देशांमधल्या बाहुल्यानी स्वेटर घातले आहेत. आफ्रिकेतल्या बाहुल्या काळ्या रंगाच्या आहेत. स्पेन देशातला प्रसिद्ध फ्लॅमेन्को डान्स करणाऱ्या बाहुल्या आहेत. भारतातल्या बाहुल्यांच्या भागात रामायणाचा देखावाही दाखवला आहे . चीन आणि जपानच्या बाहुल्यांबरोबर ड्रॅगन आहेत. जपानच्या बाहुल्यांमध्ये दोन खास प्रकार होते, एकात फक्त मुली आणि एकात फक्त मुलगे. गर्ल्स फेस्टिवल आणि बॉईज फेस्टिवल अशा नावांचे हे सेक्शन आहेत. पेरू या एका देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या खूप बाहुल्या इथे तुम्हाला पाहायला मिळतील. इथे एक 300 वर्ष जुनी स्वित्झर्लंडची बाहुली तुम्हाला पाहायला मिळेल. ही बाहुली म्हणजे छोट्या लाकडी पाळण्यात झोपलेलं बाळ आहे. त्याच्या अंगावर छानसं पांघरुणंही आहे. 
तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडेल आता की हे बाहुल्यांचं म्युझियम करायची आयडिया कोणाला सुचली असेल? ह्या म्युझियमचं नाव आहे शंकर्स डॉल्स म्युझियम. शंकर पिल्लई नावाचे एक कार्टूनिस्ट होते. त्यांना एकदा हंगेरी देशातली बाहुली भेट म्हणून मिळाली. मग त्यांना बाहुल्यांमध्ये इंटरेस्ट वाटायला लागला आणि त्यांच्याकडे अशा भेट म्हणून मिळणाऱ्या बाहुल्या जमायला लागल्या. मग त्यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहेरू आणि त्यांची मुलगी इंदिरा ह्यांना सांगितलं की ह्या बाहुल्या अशाच राहिल्या तर खराब होतील. यातूनच मग बाहुल्यांचा म्युझियम करण्याची कल्पना आली. वेगवेगळ्या देशातल्या पाहुण्यांनी भेट म्हणून दिलेल्या बाहुल्या इथे आहेत. इथे मुलांसाठी वर्कशॉप्स होतात त्या वर्कशॉप्समध्ये केलेल्या बाहुल्या आहेत. ह्या म्युझियममध्ये फोटो काढायची परवानगी नाही. त्यामुळे तुम्हाला स्वतालाच त्या बघितल्या पाहिजेत. जाल दिल्लीला तेव्हा तुमच्या आई बाबांना सांगा तुम्हाला तिकडे घेऊन जायला. 

 
-सुप्रिया देवस्थळी
 
दिल्लीमध्ये बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेविषयीच्या गमतीजमती सांगत आहेत सुप्रिया देवस्थळी खालील लेखात

शोधू नवे रस्ते - भाग ८