कापूस, लोकर, रेशीम, ताग वगैरेंमधील तंतूंपासून धागे तयार करणे आणि त्यांची वस्त्रे विणणे या कला किंवा विद्या प्राचीन काळापासून जगभरात प्रचलित होत्या. पण कुशल कारागीर साध्या साधनांचा वापर करून आपल्या हातानेच ही कामे घरातच करीत असत. खादी ग्रामोद्योग उद्योगांमध्ये कापड तयार करण्यासाठी हे काम अजूनही होत असते. अठराव्या शतकातील काही ब्रिटिश शास्त्रज्ञांनी या कामांसाठी पहिली यंत्रे तयार केली आणि कापड गिरण्या सुरू झाल्या. त्यातून तिथल्या समाज जीवनात क्रांतिकारक बदल घडत गेले आणि त्याचे परिणाम पूर्ण जगावर झाले.   
 
सतराव्या शतकापर्यंत इंग्लंडमध्ये चामडे, लोकर आणि ताग यांचेच जाडेभरडे कपडे तयार होत होते आणि वापरले जात होते. रेशमी आणि तलम सुती कापड पूर्वेकडून म्हणजे मुख्यतः भारत आणि चीनमधून युरोपमध्ये आयात होत असे. हळूहळू युरोपमध्ये पूर्वेकडून, तसेच अमेरिकेमधून कापसाचीही आयात सुरू झाली, पण तिथे जुन्या पद्धतीने तयार होत असलेले सुती कापड सुरुवातीच्या काळात महाग पडायचे आणि ते भारतीय कापडांच्या तोडीचे नसेच. 
 
इंग्लंडमधले काही लोक फावल्या वेळात टकळी किंवा चरखा चालवून धागे तयार करायचे. हे धागे ताण देऊन उभे मांडून ठेवून त्यांच्यामध्ये आडवे धागे गुंतवण्याचे काम खूपच जिकीरीचे आणि वेळ घेणारे असते. काही कुशल विणकर ते काम करून आपली उपजीविका करीत असत. सतराव्या आणि अठराव्या शतकांमध्ये युरोपात चांगल्या प्रतीचे लोखंड आणि पोलाद तयार व्हायला लागले, तसेच त्यापासून पत्रे, नलिका, चाके, दांडे, निरनिराळ्या आकारांची अवजारे, गिअर, स्क्रू वगैरे यंत्रांमध्ये उपयोगात येणाऱ्या वस्तू तयार करण्याचे कौशल्य विकसित झाले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमधील या प्रगतीमधून विणकामाच्या पारंपरिक मागांमध्येही सुधारणा होत गेल्या. त्यांच्या आधाराने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमधल्या कापड उद्योगाची वाढ व्हायला सुरुवात झाली. 
 
सन १७३३ मध्ये जॉन के या शास्त्रज्ञाने उडती शटल (flying shuttle) तयार केली आणि त्यात सुधारणा करीत १७४४ पर्यंत त्यांच्या उपयोगाने विणकरांची उत्पादनक्षमता दुपटीने वाढवली. पण धाग्यांचे उत्पादन हळूहळूच होत राहिल्याने त्याचा फायदा लगेच दिसला नाही. पुढे सन १७६० मध्ये जॉनचा मुलगा रॉबर्ट याने ड्रॉप बॉक्सचा (drop box) शोध लावला. त्याच्या आधी सन १७३८ मध्ये ल्युइस पॉल आणि जॉन यॉट या जोडगोळीने रोलर स्पिनिंग मशीन या नावाचे सूत कातण्याचे यंत्र तयार केले. या यंत्राने कमी वेळात अधिक चांगल्या प्रकारचे धागे तयार होऊ लागले. त्यांनी सन १७४३ मध्ये नॉर्दम्प्टन इथे सुताचे धागे तयार करण्याचा कारखाना सुरू केला. सन १७६४ मध्ये जेम्स हारग्रीव्ह्ज याने स्पिनिंग जेनीचा लावलेला शोध जास्तच लाभदायक ठरला आणि त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग व्हायला लागला. सन १७६९ मध्ये रिचर्ड आर्कराइट याने स्पिनिंग फ्रेम किंवा वॉटर फ्रेम (spinning frame or water frame) तयार केली. या यंत्रामुळे इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच चांगल्या प्रतीचा सुती धागा तयार करणे शक्य झाले. या यंत्राने धागे तयार करण्याचा पहिला कारखाना डर्बीशायरमध्ये सन १७७१ मध्ये सुरू झाला. स्पिनिंग जेनी आणि स्पिनिंग फ्रेम या दोन्हींच्या संयोगामधून सॅम्युअल क्राँम्प्टन याने सन १७७९ मध्ये स्पिनिंग म्यूल (Spinning Mule) तयार केले. अशा प्रकारे सूत आणि कापड उत्पादनाच्या यंत्रांमध्ये झपाट्याने सुधारणा होत गेल्या.
 
या लोकांच्याशिवाय त्या काळातले इतरही अनेक संशोधक सूत आणि कापड तयार करण्याच्या कामावर संशोधन आणि प्रयोग करून नवनव्या प्रकारची यंत्रे तयार करीत होते. याचे मुख्य कारण त्यासाठी लागणारे साहित्य त्यांना उपलब्ध होत होते. त्या काळातली ही यंत्रे माणसांच्या शक्तीनेच हँडल फिरवून किंवा पॅडल मारून चालवावी लागत. काही ठिकाणी या कामासाठी घोडे किंवा खेचरे यांना जुंपले होते. काही गिरण्यांमधली मोठी चक्रे फिरवण्यासाठी कालव्यांमधल्या वाहत्या पाण्यावर चालणाऱ्या वॉटर व्हील्सचा उपयोग व्हायला लागला. सन १७८१ मध्ये जेम्स वॉटने तयार केलेले वाफेचे इंजिन या गिरण्यांसाठी वरदान ठरले, तसेच वॉटला त्याच्या इंजिनांसाठी आयते ग्राहक उपलब्ध झाले. त्यानंतर वाफेच्या इंजिनांवर चालणाऱ्या इंग्लंडमधील कापड गिरण्यांच्या उद्योगाची झपाट्याने वाढ झाली. अठरावे शतक संपेपर्यंत मँचेस्टरमध्ये ४२ गिरण्या सुरू झाल्या आणि ते शहर इंग्लंडमधलेच नव्हे तर जगातले कापड उद्योगाचे अव्वल शहर झाले.  
 
चांगल्या लोखंडाची निर्मिती, यंत्रोद्योग, वाफेचे इंजिन आणि कापडाच्या गिरण्या या चार मुख्य स्तंभांच्या आधारावर अठराव्या शतकात युरोपमधली औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि तिने जगभरातल्या माणसांचे जीवन बदलून टाकले.
 
-आनंद घारे 

[email protected]

विज्ञानामधील प्रगतीमध्ये काचेचा मोठा वाटा आहे. काचेच्या या इतिहासाविषयी वाचा खालील लेखात