प्रथमची एक जम्माडीजम्मत होती. ती फक्त त्यालाच माहीत होती. तो रोज मधल्या सुट्टीत मुद्दाम उशीरा वर्गात जाई. पाण्याच्या टाकीच्या मागे लपून ती गंमत पाहत असे. वर्गात उशीरा येतो म्हणून त्याला शिक्षा होई. धडा लिहून काढावा लागे. पण प्रथम हसत हसत आनंदाने शिक्षा भोगत असे. रोज असेच घडत होते. काय बरं होती ती गंमत?

प्रथमची शाळा म्हणजे महामार्गालगतची एक प्रसिद्ध शाळा होती. या महामार्गावरून सतत भरधाव वेगाने वाहने धावत असत. शाळेसमोर महामार्ग ओलांडला की एक जंगल होतं. हरणाच एक पाडस रोज पाणी पिण्यासाठी शाळेच्या टाकीजवळ यायचे. अगदी गुपचूप पाणी पिऊन निघून जायचे. ५वीत शिकणारा प्रथम हळूच त्याला पाहायचा. हळूहळू प्रथमशी त्याची ओळख झाली. हरणाचे पाडस आता धीट झाले होते. तेही टाकीच्या मागे प्रथमच्या अंगावर चार उड्या मारून जंगलात पसार व्हायचे.

पण आजचा दिवस भयानक होता. या हरणाच्या पाडसाने रस्ता ओलांडण्यासाठी झेप घेतली आणि त्याला एका वाहनाने ठोकरले. त्याच वेळी मैदानावर उभा असलेल्या प्रथमची नजर त्याच्यावर पडली. त्याने जोरात किंकाळी ठोकली आणि रस्त्याकडे धावला. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने प्रथमचे मित्रही त्या दिशेने धावू लागले. मैदानावर एकच गोंधळ उडाला. सगळे वर्गाबाहेर आले. शिक्षकही मुलांच्या मदतीला धावले. तोपर्यंत प्रथमने पाडसाला उचलून घट्ट पोटाशी धरले होते. पाडसाचे चारही पाय जखमी होते. त्याला हलताही येत नव्हते. त्याच्या पोटालाही जखम झाली होती. त्यातून भळाभळा रक्त वाहत होते. प्रथमचा शर्ट रक्ताने माखला होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. तसेच नाकही वाहत होते. नक्की कोणाला लागले होते? प्रथमला की हरणाला? कळायला काहीच मार्ग नव्हता. शिक्षक आता त्यांच्याजवळ पोहोचले. त्यांनी प्रथमला हरणापासून दूर केले. तेव्हा कळले की, हरीण गंभीर जखमी आहे. प्रथम तर ओक्साबोक्शी रडत होता. त्याच्या जिवलग दोस्ताला होणार्‍या वेदना त्याला सहन होत नव्हत्या. कसेबसे एका झोळीत उचलून हरणाला सावलीत आणले. पाडस व प्रथम दोघेही भीतीने थरथर कापत होते. दोघांनाही उपचाराची गरज होती. पाडसाला पाणी पाजले. चिमुकल्या प्रथमने झाडाच्या मजबूत काटक्या तोडून आणल्या. तो व त्याचे मित्र हरणाच्या तुटक्या पायांना त्या काटक्या रुमालाने बांधून आधार देत होते. हरीण केविलवाण्या नजरेने सर्व पाहत होते. जीव वाचविण्यासाठी विनक्त होते. त्याच्या जखमेवर हळद लावण्यात आली. त्याला आग होऊ नये म्हणून प्रथम व त्याचे मित्र जखमेवर हळूहळू फुंकर मारत होते. शिक्षकांनी मुलांच्या हट्टापायी डॉक्टरांना कळविले. डॉक्टरांनी त्यांच्या ओळखीतल्या प्राण्यांच्या डॉक्टरांना फोन केला. आता हरणावर रीतसर उपचार सुरू झाले.

हरीण आता प्रथमच्या घरी राहू लागले. गोळ्या-औषधे घेऊ लागले. प्रथम त्याची आपल्या आजारी भावंडाप्रमाणे काळजी घेऊ लागला. डॉक्टर येऊन तपासून जात होते. जवळजवळ दीड महिना हरणावर उपचार सुरू होते. त्याला प्रथमचा फारच लळा लागला होता. तो सारखा प्रथमच्या अवतीभोवती घिरट्या घालत असे. आता हरणाला बरे वाटत होते. जंगलातील या स्वतंत्र प्राण्याला आपल्या घरी डांबून ठेवणे चांगले नाही हे प्रथमला कळत होते. त्याचीही आई जंगलात त्याला शोधात असेल ना? वाट पाहत असेल ना?

प्रथमने आपल्या आई-बाबांच्या मदतीने हरणाला त्याच्या खर्‍या घरी म्हणजेच जंगलात सोडले. लांब जाईपर्यंत हरीण व प्रथम एकमेकांकडे पाहत होते. दोघांनाही एकमेकांपासून दूर जाताना वाईट वाटत होते. दोघांच्याही डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या होत्या. आई-बाबा ही जगावेगळी दोस्ती कौतुकाने न्याहाळत होते.

प्रथम हल्ली गप्पगप्प असायचा. त्याला घरी करमायचे नाही. मित्रांमध्येही हल्ली त्याचे मन रमत नसे. तो सतत विचार करायचा. ते हरीण आता कुठे असेल? काय करत असेल? त्याला माझी आठवण येत असेल का? पुन्हा भेट झाली तर ते मला ओळखेल का? असेच हरणाच्या आठवणीत दिवस पुढे पुढे जात होते.

एक दिवस अचानक हरीण प्रथमच्या अंगणात दाखल झाले. दोघे एकमेकांच्या गळ्यात पडले. प्रथमने त्याला उचलून घट्ट मिठीत घेतले. हरीण प्रथमला चाटू लागले. प्रथमचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याने हरणाला मऊमऊ गवत आणले. थंडगार पाणी पाजले आणि त्याच्या सोबत खेळला. अंधार पडायच्या आधी जंगलात सोडून आला. आता दर रविवारी हरीण प्रथमला भेटायला येऊ लागले. त्याच्याकडून लाड करून घेऊ लागले.

आज प्रथम इंजिनियर झाला आहे. एका मोठ्या कंपनीत काम करतो. पण दर रविवारी आपल्या मित्रासोबत खेळतो. त्यांची गाठभेट अजूनही संपली नाही. आता गावातील सर्वांना प्रथमचा हेवा वाटतो? असा छानसा मित्र आपल्याला का नाही? असा प्रश्न पडतो?   

-सुनिता वांजळे

[email protected]

 

ई दिवाळी अंक : चारूता प्रभुदेसाई यांची दिवाळी सणाची माहिती सांगणारी कविता.
दिवाळी