दिवाळी सर्वांचाच आवडता सण !

दिवाळी आपल्यासोबत नवीन कपडे, फटाके, फराळ आणि दिव्यांची आरास घेऊन येते. पण याच दिवाळीची सुरुवात मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नानाने होत असते.

अनेकदा परंपरा व जेष्ठांनी सांगितले म्हणून हा अभ्यंगाचा प्रकार उरकला जातो. दिवाळीनंतर मात्र अभ्यंगाचे विस्मरण होते. परंतु त्यामागील शास्त्र व कार्यकारणभाव; तसेच त्याचे उपयुक्त गुण समजल्यास हा विधी नुसत्या दिवाळीपुरता मर्यादित न राहता नित्य वापरातील होऊ शकेल यासाठी हा लेखनप्रपंच.

यातील अभ्यंगस्नान या शब्दाचा अर्थ आधी सुगंधी तेलाने अभ्यंग (संपूर्ण शरीरास शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावणे) करून उटणे लावून स्नान करणे असा आहे.

दिवाळीपासून सुरुवात होणार्‍या थंडीचा प्रतिकार करण्यासाठी व त्वचा कोरडी पडू नये म्हणून या अभ्यंगयुक्त स्नानाची परंपरा असावी.

आयुर्वेद शास्त्रानुसार अभ्यंग हा विधी प्रासंगिक नसून दररोज करणे अपेक्षित आहे. या अभ्यंगाचे अनेक गुण आयुर्वेदात उल्लेखित आहेत.

अभ्यंगमाचरेन्नित्यं स जराश्रमवातहा ।

दृष्टीप्रसादपुष्ट्यायु: स्वप्नसुत्वक्त्वदाढर्यकृत्॥

नित्य अभ्यंग केल्याने वार्धक्य नाहीसे होणे, थकवा कमी होणे हे फायदे होतात व हा अभ्यंग डोळ्यांसाठी, त्वचेसाठी उपयोगी असून उत्तम निद्रा आणणारा आहे.

अभ्यंगात नित्य नियमाने संपूर्ण शरीराला हळुवारपणे तेल (उदा. शास्त्रोक्त सुगंधी तेल/तीळ तेल/खोबरेल/बदामतेल) जिरवणे अपेक्षित आहे. या विधीकरिता साधारणपणे १५ ते २० मिनिटे वेळ द्यावा. जेणेकरून वरील गुण मिळू शकतील. दररोज शक्य नसल्यास आठवड्यातून दोन वेळेस हा विधी करावा.

संपूर्ण शरीराप्रमाणेच दररोज रात्री दोन्ही पायांना वरीलपैकी एखादे तेल किंवा तूप लावावे. याला पादाभ्यंग म्हणतात. चांगली झोप येण्यासाठी व डोळ्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी याचा विशेष उपयोग होतो.

तसेच केसांच्या आरोग्यासाठी, चांगली झोप येण्यासाठी व एकाग्रता वाढविण्यासाठी दररोज स्नानापूर्वी १५ मिनिटे आधी टाळूवर खोबरेल किंवा बदामतेलाने अभ्यंग करावा. याला शिरोभ्यंग म्हणतात.

सर्वांगीण शारीरिक वाढीकरिता तर लहान मुलांना अभ्यंग हे वरदान ठरते. हाडे बळकट होणे, स्नायूंची शक्ती व कार्यक्षमता वाढणे, शरीराची लवचिकता वाढणे यांसारख्या फायद्यांसाठी मुलांना नित्य अभ्यंग करावाच.

एखादे निर्जीव यंत्र चालविण्याकरीताही जर वंगणाची (तेलाची) गरज असेल तर सजीव अशा शरीराला नित्य कार्यक्षम ठेवण्यासाठी तेलाचा अभ्यंग निश्चितच उपयुक्त ठरतो.

त्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढवायची असेल, शरीर सुदृढ आणि लवचिक ठेवण्याची इच्छा असेल तर दररोज अभ्यंग करावा. तरी सर्वांनी आता यानंतर फक्त दिवाळीतील स्नानापूर्वी नव्हे तर प्रत्येक स्नानापूर्वी नक्की अभ्यंग करावा ही अपेक्षा.

-सौम्या कुलकर्णी 

[email protected]

ई दिवाळी अंकातील कथा भाग २ :

गावाकडची मजा