आज तरी ‘स्वरा’ येईल, आता तरी शोधेल मला, केव्हा तरी आठवण येईल माझी.. असं म्हणून किती दिवस झाले. किती वाट बघायची? हिला आपली खरंच आठवण येत नसेल? जराही शोधायचा प्रयत्न करू नये म्हणजे काय? आणि मी मात्र ती खूश व्हावी म्हणून सतत आपलं नाक अगदी टोकदार करून घ्यायचे. अशाने उंची कमी होते ना माझी. पण तरीही काही कुरबुर न करता तिला खूश करत राहायचं आणि आता मला इथे येऊन एक आठवडा झाला तरी तिला माझी काहीच आठवण नाही.

विचार करून करून मन अगदी दु:खी झालं होतं. आतल्या आत रडून घसाही सुजला आणि डोळे रडून रडून लाल झाले. नाक तर...

नवीन नवीन मला आणल्यानंतर स्वराला किती आनंद झाला होता.. अजूनही आठवतंय मला, मी जेव्हा या घरात पहिल्यांदा आले होते... त्या स्टेशनरीच्या दुकानातून!.. स्वरा आणि बाबा मला घ्यायला आले होते... आणि एवढ्या सगळ्या पेन्सिलींच्या गर्दीत असूनही स्वराला मीच आवडले होते, निळ्या निळ्या रंगाची मी, मलाही किती आनंद झाला होता तिला बघून... किती गोड मुलगी आहे ही. हिच्या हातात मी अगदी प्रेमाने राहीन.. अगदी ती हात फिरवेल तशी लिहीत जाईन असंच ठरवलं होतं मी.. आणि मग आमची गट्टीही छान जमली... तिला तर सगळीकडे मीच लागायची. सारखी माझं नाक अगदी टोकदार करून ठेवायची... कधी कधी तर टोकदार नाकांनी पुढच्या बाकावरच्या मिनूला टोचायची सुद्धा... त्या गडबडीत अनेकदा खाली पडून नाक मोडून घेतलंय मी.. आणि मग पुन्हा टोक.....पण कधी काही कुरबुर नाही की रुसणे नाही.

‘मी आपलं सगळं सहन करत गेले. केवळ तिच्या आनंदासाठी.. आणि.. आणि आता स्वरा विसरली मला.... बाप रे.. हे मला सहनच होत नाहीये. देवा अजून किती दिवस या अंधार्‍या जागेत पडून राहावं लागणार आहे? किती चांगलं घर होतं माझं कंपासपेटी नावाचं!! तिथे मी माझे मित्र-मैत्रिणी आम्ही किती आनंदात राहत होतो... मला सगळ्यांची खूप आठवण येतेय.... कुणी नाही का येणार मला शोधायला?’

या सगळ्या विचारांनी ती बिचारी कासाविस झाली होती. तेवढयात टुणूकटुणूक उड्या मारत तिथे आला ‘रबर’ ‘रबर’ ... त्या बिचार्‍या पेन्सिलीच्या तोंडून गेलं आणि रबराने दचकून पाहिलं. ‘अगं ताई, तू काय करतेस इथे? आम्ही किती काळजीत होतो तुझ्या!’

‘अरे, काय सांगू तुला? त्यादिवशी चित्र काढताना आपलं घर पडलं स्वराच्या हातून आणि मी आले गडगडत या पलंगाच्या खाली. तुम्हाला सगळ्यांना गोळा केलं असेल तिने. पण मी मात्र किती दिवस इथेच पडून राहिले. या अंधार्‍या जागेत वाट बघत बसले, रडत बसले. स्वरा येईल, मला इथून घेऊन जाईल. मला शोधायचा प्रयत्न सुद्धा केला नाही कुणीही?’

‘अगं ताई, किती वाट बघत होतो आम्ही सगळे तुझी. पट्टी दादा तर तुला शोधायला किती धडपडला. कंपास पेटीतून किती वेळा खाली उडी मारली त्याने मुद्दामहून...पण बिचारा तेवढंच तर करू शकत होता आणि उड्या मारण्याच्या नादात दोन-तीन भेगा पडल्या गं त्याला.. टोककटर तर तू गेल्यापासून उदास झालाय.. नाइलाजाने टोक करत असतो. कितीतरी वेळा त्या नवीन पेन्सिलीचं टोक तिथेच मोडतं. मग बसते ती रडत...  ‘कोनमापक’ तर कुठून तरी तू येशील आणि त्याच्याबरोबर कागदावर योग्य जागेवर खूण करशील या आशेवर सतत जागाच असतो, आणि ‘कंपास’ त्याला तर नवीन वर्तुळ काढण्यात तर काही रसच नाही.. सारख्या चुका करत असतो. तुला बघून किती आनंद झालाय म्हणून सांगू!..... आणि आम्ही तरी कुठे शोधणार? सगळे एकमेकांजवळ तुझी चौकशी करत बसतो.

‘बरं पण मला सांग, स्वराला माझी आठवण नाही का आली? काय केलं तिने माझ्यावाचून?’

‘अगं, तिने नवीन पेन्सिल घेतली कपाटातून.’ पेन्सिलीने हे ऐकले मात्र तिच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले.

‘आम्ही सगळे त्या नवीन पेन्सिलीबरोबर कसेबसे जमवून घेतोय. पण खरं सांगू का? तू गेल्यापासून कुणाचे कशात लक्षच लागत नाही. रबर भराभर बोलत होता. पण पेन्सिल मात्र ‘स्वरा’ किती सहज मला विसरून गेली,’ या विचाराने आणखीनच दुःखी झाली.

‘बरं झालं सापडलीस. चल तशीच गडगडत. म्हणजे स्वराला दिसू.’ पण तसं स्वतःहून गडगडत पुढे जाणं सोपं असतं होय?

रबर आणि पेन्सिल तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार तेवढयात एक हात आला तिथेच, ज्या दिशेला रबर पडला त्या दिशेला पलंगाखाली आणि चाचपडू लागला. मग रबरने एक युक्ती केली. आधी हाताला लागला आणि मग अजून लांब गेला. त्यामुळे हाताला एवढं मात्र नक्की कळले की रबर तर आहे इथेच. म्हणून तो आणखी आत आला आणि काय आश्चर्य.... ती पेन्सिल हाताला लागली आणि मग त्या हुशार हाताने पेन्सिल पकडून मग रबरालाही बाहेर काढलं. कोणाचा होता तो हात? अर्थातच आमच्या स्वराचा ....

बाप रे, स्वराने पेन्सिल पाहिली आणि तिला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला... आई माझी पेन्सिल सापडली गं, म्हणून ती नाचूच लागली.... ते पाहून पेन्सिलीला पण आनंद झाला. त्यादिवशी स्वरा ती पेन्सिल हातातून ठेवायलाच तयार नव्हती. अगदी रात्री झोपताना सुद्धा उशाशी घेऊनच झोपली ....

‘स्वरा ए स्वरा अगं किती सहज विसरली होतीस गं मला? ... मी दिसले नाही तर लगेच दुसर्‍या पेन्सिलीला घेतलंस तू. शोधलं सुद्धा नाहीस ना?’ स्वराला जाब विचारायची हीच योग्य वेळ आहे असं समजून पेन्सिल बोलत राहिली. आपलं दु:ख सांगत राहिली .. ‘त्या अंधार्‍या जागेत मला किती रडू येत होत माहिती आहे का तुला?.. तुझ्या आठवणीनी रडून रडून डोळे लाल झाले माझे..... आपली एखादी वस्तू जपून ठेवावी गं ...सापडली नाही तर सोडून देऊ नये..... त्या वस्तूला पण मन असत गं... किती लाडकी होते मी तुझी... तुझ्या इच्छेप्रमाणे चालत होते. किती सुंदर अक्षर काढत होते... तू किती वेळा माझ नाक टोकदार करायचीस. माझी उंची कमी होत होती. तरीही तुझ्या प्रेमासाठी मी ते अभिमानाने मिरवत होते. पण तुझ्यापासून दूर जाऊन खूप वाईट वाटलं गं मला. मला वचन दे!.. दे वचन. यापुढे मलाच काय पण तुझ्या प्रत्येक वस्तूला जपशील.. जपशील ना?

अरेच्या, हे काय? आज स्वराला चक्क एक तास आधी जाग आली. ‘नाही मी परत हरवू देणार नाही तुला ... तू तर माझी लाडकी निळी पेन्सिल.’

‘स्वरा अगं स्वरा.. काय झालं गं,...  अंथरुणात उठून बसलेल्या स्वराकडे पाहत आई म्हणाली .... म्हणाली खरं. पण स्वराच्या हातात पेन्सिल बघून आई सगळं काही समजून गेली...

-अंजली अत्रे

[email protected]