शिक्षणविवेकच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते स्वा. सावरकर स्मारक, पुणे येथे आज सायंकाळी ४.३० वाजता झाले. या वेळी बाल साहित्यिक राजीव तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक अर्चना कुडतरकर आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सविता केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील मैत्रभाव जपणाऱ्या शिक्षणविवेक मासिकाने नेहमीच विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय हाताळले आहेत. या वेळी दिवाळी विशेषांकासाठी संस्थांच्या वेगवेगळ्या शाळांतून शिकलेल्या आणि आज आपलं कर्तृत्व सिद्ध केलेल्या माझी विद्यार्थ्यांच्या मुलाखती त्याचं शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी घेतल्या आहेत.
दिवाळी अंक प्रकाशनचे औचित्य साधून सुधीर गाडगीळ यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला होता. इतरांना प्रश्नांच्या माध्यमातून बोलत करणारे सुधीर गाडगीळ यांनी आज मात्र राजीव तांबे यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्या खुमासदार शैलीत दिलखुलास उत्तरे दिली.
राजीव तांबे यांनी सुधीर गाडगीळांना त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल विचारले असता ते म्हणाले, "मला दिसेल ते पुस्तक आणि भेटेल तो माणूस मी वाचत गेलो, त्यातूनच प्रश्नांचा समृद्ध साठा होतं गेला. आणि मी इथपर्यंत पोहोचलो आहे. यामध्ये मी माझ्या आई-बाबांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी मला माझ्या लहानपणी देवळात भजन कीर्तन ऐकायला तर नेलंच, शिवाय तेव्हाच्या दिग्गज लोकांच्या भाषणाला देखील आवर्जून घेऊन गेले. त्यातून माझा शब्दसाठा आणि बोलण्यात लय आली."
या वेळी सुधीर गाडगीळांनी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, आशा भोसले, पु.लं. देशपांडे अशा अनेक दिग्गजांच्या आठवणी सांगितल्या.
दुसऱ्यांच्या मुलाखती घेण्याची सवय असल्यामुळे सुधीर गाडगीळ यांनी स्वतः मुलाखत देता देता राजीव तांबे यांना अधेमधे प्रश्न विचारून त्यांचीदेखील एकप्रकारे मुलाखतच घेतली.
शिक्षणविवेकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. या वर्षभरात घेतलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही या वेळी पार पडला. तसेच विद्यार्थ्यांसाठी शिक्षणविवेक तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील काही निवडक चित्रांचे प्रदर्शनदेखील भरविण्यात आले होते.
अर्चना कुडतरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर रुपाली सुरनिस यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

काही क्षणचित्रे :
-प्रतिनिधी