नवीन घर घेतल्यानंतर सुरुवातीला आपला भर असतो ते लवकरात लवकर सामानसुमान आपापल्या जागेवर कसे बसवता येईल व या नवीन घराचा आपल्याला लवकरात लवकर वापर कसा सुरू करता येईल याच्यावर. एकदा का आपले बस्तान बसले, की मग मात्र अजून चांगले काही बदल करता येतील का? याचा विचार आपण करायला लागतो. हळूहळू केवळ "गरजेचा" विचार न करता "सोयीचा" देखील विचार होऊ लागतो. टीव्ही, फ्रीज आणि कधी कधी तर गाडी बदलली जाते!

भारत स्वतंत्र झाल्यानंतर इथल्या बहुतेक व्यवस्था सुद्धा अशाच स्थित्यंतराला सामोरे गेल्याचे दिसेल. मागच्या भागात आपण भारतीय शिक्षण व्यवस्थेचे बस्तान बसवण्यासाठी सुरुवातीला काय प्रयत्न झाले, हे बघितले. आता आपण शिक्षण व्यवस्थेचे बस्तान बसल्यानंतर काय बदल केले गेले, हे समजून घेणार आहोत.

शिक्षणव्यवस्थेचे बस्तान बसल्यानंतर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व उच्च शिक्षण असे ढोबळमानाने चार स्तर तयार झाले. प्राथमिक शिक्षण हे आठवीपर्यंत म्हणजे आठ वर्षे, माध्यमिक शिक्षण नववी, दहावी म्हणजेच दोन वर्षे तर उच्च माध्यमिक शिक्षणही दोन वर्षे म्हणजेच अकरावी व बारावी अशी विभागणी झाली, उच्च शिक्षण घेताना कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी तीन वर्षे, अभियांत्रिकीसाठी चार वर्षे तर वैद्यकीय व कायदा विषयासाठी पाच वर्षाचा अभ्यासक्रम ठरवला गेला.

पूर्व-प्राथमिक शिक्षणाचा फारसा आग्रह किंवा गंभीरपणे विचार शिक्षणाचे बस्तान बसूनही बहुतेक पालक करत नसत. कदाचित एकत्रित कुटुंब व्यवस्था त्यामुळे मुलांची काळजी घेण्यासाठी घरात कुणी ना कुणी उपलब्ध असणे, हे मुलांना शाळेत पाठवण्याची घाई न करण्यामागे एक कारण असावे!

१९६८ साली स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आले. शिक्षण हे देशाच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचे "इंजिन" असल्याची सरकारला जाणीव व्हायला सुरुवात झाली. त्याची निगा राखण्यासाठी, त्याची गती कायम राखण्यासाठी, सरकारने अनेक नव्या कल्पना या धोरणात मांडल्या.

मोफत व सक्तीचे शिक्षण, भारतातील स्थानिक भाषेतून शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध करून देणे, शिक्षणाच्या समान संधी, विशेष बुद्धीमत्ता असलेल्या मुलांचा शोध घेणे, कार्यानुभव, राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.), विज्ञान संशोधन व शिक्षण, कृषी, उद्योग यांच्याशी संबधित शिक्षणावर भर दिला गेला. परीक्षा पद्धतीमध्ये बदल, काम करता करता शिक्षण घेण्याची संधी मिळावी म्हणून रात्र शाळा, पत्राद्वारे शिक्षण, खेळ व प्रौढ शिक्षण, अशा अनेक विषयांना स्पर्श करणारे हे भारतातील खऱ्या अर्थाने पहिले समग्र शैक्षणिक धोरण होते.

१९८५ नंतर भारतात सर्वच क्षेत्रात मूलगामी बदल करून, भारताला २१ व्या शतकासाठी तयार करण्याच्या घोषणा व धोरणे आकाराला येऊ लागली. दूरसंचार व संगणक तंत्रज्ञानात वेगवान बदल घडताना, २१ व्या शतकात टिकून राहतील असे भावी नागरिक घडवण्यासाठी, १९८६ साली नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मांडले गेले.

या धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर भर देण्याचे ठरवण्यात आले. माध्यमिक स्तरापासूनच आता व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात झाली. माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर मुलांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या वेगवान बदलांशी अवगत करून, हे बदल त्यांच्या भावी आयुष्यात त्यांना वापरता येण्याच्या दृष्टीने प्रयत्नांना सुरुवात झाली.

त्याचबरोबर या धोरणामध्ये साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी बिगर सरकारी सेवाभावी संस्थांना सामील करून घेणे, अनौपचारिक शिक्षण व मुक्त शिक्षण याविषयी देखील विचार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी परीक्षा, पदवी यामध्ये जास्त अडकून न राहता शिकण्याच्या प्रक्रियेवर भर द्यावा, सगळ्या क्षेत्रातील लोकांना मुक्तपणे शिकता यावे, स्त्री व पुरुष दोघांनाही व्यावसायिक शिक्षणाच्या समान संधी असाव्यात, शिक्षणाचा त्यांच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये वापर करून प्रत्येकाला स्वत:ची प्रगती करून घेता यावी. यासाठी हे धोरण आग्रही होते. त्यासाठी नवोदय विद्यालये सुरू करणे, मुक्त विद्यापीठांची संख्या वाढवणे, ऑपेरेशन ब्लॅकबोर्ड सारखे उपक्रम राबवणे, असे अनेक प्रयत्न करण्यात आले.

या धोरणाला पाच सहा वर्षे पूर्ण होण्याआधीच १९९२ साली, एक नवा प्रस्ताव सादर करण्यात आला. नवोदय विद्यालयाचे यश बघता, अशी विद्यालये प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्याचे ठरवण्यात आले. मुलांच्यावर असणारे दप्तरांचे ओझे कमी करणे, सगळ्यांना जागतिक दर्जाचे मोफत शिक्षण कसे मिळू शकेल यासाठी प्रयत्न करणे, असे काही विचार या धोरणामध्ये मांडले गेले.

एकूणच भारतीय शिक्षण व्यवस्थेवर असणारा ब्रिटीशकालीन प्रभाव आता जवळपास संपवण्याचा प्रयत्न वरील धोरणांच्या मदतीने झाल्याचे दिसत असतानाच भारतीय शिक्षण क्षेत्रात अत्यंत मूलगामी व प्रगतीशील विचार मांडणारे एक धोरण आता आकार घेऊ लागले होते.

ते धोरण कोणते होते, त्याचे निर्माते कोण होते, हे आपण पुढील भागात समजून घेणार आहोत.

-चेतन एरंडे

[email protected]

 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल होत गेले हे वाचा खालील लेखात. 

 स्वतंत्र भारताची शैक्षणिक वाटचाल