प्रसिद्ध समुपदेशक दीपक करंजीकर यांच्या एकदिवसीय कार्यशाळेला उपस्थित राहण्याचा योग आला होता. पाच वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ शिकविणार्‍या शिक्षकांसाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिकवणं म्हणजे काय? हे या कार्यशाळेत सहभागी सर्व शिक्षकांना माहीत होतं, मात्र उत्तम शिकवणं म्हणजे काय?, हे शिक्षकांना कळावं हा या कार्यशाळेचा हेतू होता. खरं तर समाजातील तरुण पिढी घडविण्याचं काम शिक्षक करत असतो. ही जबाबदारी ते किती सक्षमतेनं पार पाडतात यावर विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अवलंबून असते. म्हणूनच उत्तम शिकवणं म्हणजे काय ते शिक्षकाला माहीत असणं आवश्यक असतं. पुस्तकात छापलेलाच मजकूर विद्यार्थ्यांना परत एकदा लिहून देणं किंवा त्याविषयीच परत परत बोलणं म्हणजे शिकवणं होत नाही, असं मला वाटतं. प्रत्येक विद्यार्थी हा क्षमता, गुणवत्ता, बुद्धिमत्ता याबाबत ‘युनिक’ असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या विकासात मदत करणं एक शिक्षक म्हणून आपलं कामच असतं. यासाठी सातत्यानं ज्ञानसाधना करणं, स्वतःच्या बौद्धिक क्षमता विकसित करणं, हे शिक्षकांचं प्रधान कर्तव्य असायला हवं.

साधारणपणे पाच वर्षे एकच एक विषय शिकवल्यानंतर, त्या शिकवण्यात तोचतोचपणा येतो. शिकवण्याची, बोलण्याची पद्धत, उदाहरणं देण्याची पद्धत यात एक प्रकारचं साचलेपण येतं; हे टाळण्यासाठी शिक्षकानं आपल्या विषयाचं सातत्यानं अध्ययन सुरू ठेवायला हवं. यामुळे तोच विषय प्रत्येक वर्षी उत्तमरित्या कसा शिकवायचा, याबाबत नवनवीन कल्पना सुचतील. अध्यापनात अभिनव प्रयोग करण्याची इच्छा होईल. अर्थात त्यासाठी आपलं अध्यापन प्रभावी, रोचक, उत्तम व्हावं ही इच्छा शिक्षकांना होण्याची गरज असते. वर उल्लेख केलेल्या कार्यशाळेत बोलताना करंजीकर यांनी याच मुद्द्यांची खूप रंजक आठवण सांगितली. त्यांच्या लहानपणी ‘घाल घाल पिंगा वारा’ ही कविता शिकवणारे मराठीचे मास्तर कधीही पुस्तकात बघून ती कविता शिकवायचे नाहीत. उलट वर्गातील मुलांनाच सासरी गेलेली तुमची मोठी बहीण फुरसतीच्या वेळी माहेराची जशी आठवण काढेल, ती भावना या कवितेत आहे, असं सांगून त्याचा अर्थ सांगायचे तेव्हा सगळ्याच मुलांना ती कविता चटकन समजायची; कारण विद्यार्थी स्वतःला त्याच्याशी कनेक्ट करायचे. हे कनेक्शन शिक्षकाच्या शिकवण्यात आणि विद्यार्थ्यांच्या उमजण्यात असावं. आपलं शिकवणं विद्यार्थ्यांना समजत आहे की नाही याची पडताळणीही शिक्षकांनी करण्याची गरज आहे. जर आपलं शिकवणं विद्यार्थ्यांना समजत नसेल तर आपल्या शिकवण्याच्या शैलीत, भाषेत लगेच योग्य ते बदल करता आले पाहिजेत. दिलेल्या वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नेमकं, मुद्देसूद शिकवणं शिक्षकाला जमायला हवं. विद्यार्थ्याला परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनवण्यासाठी कसं शिकवायचं, कोणती उदाहरणं द्यायची याबाबत भरपूर विचार होणं आवश्यक असतं.

याशिवाय विषय शिकवताना विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येऊ शकतात, त्या येऊ नयेत म्हणून त्यावर काय उपाय करता येतील, याचाही विचार शिक्षकांनी करायला हवा. असे प्रयत्न जितक्या प्रामाणिकपणे, सातत्याने, नियमितपणे होतील तेवढी शिक्षकाच्या अध्यापनाची गुणवत्ता वाढत जाते. विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा अंदाज घेत आपल्या अध्यापन शैलीत सातत्याने बदल करणारे शिक्षक विद्यार्थ्यांना आवडतात. अशा प्रकारच्या अध्यापनामुळे विषय चांगला कळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील गती, रुची आणि वर्गातील एकाग्रता वाढते.

आपली हल्लीची शिक्षणपद्धती स्पर्धात्मक आणि तांत्रिक कौशल्यावर आधारलेली आहे. व्यक्तीव्यक्तींमध्ये वादापेक्षा संवाद कसा निर्माण करता येईल, ही आताच्या शिक्षणापुढील खरी समस्या आहे. सतत वेगवेगळ्या ताणाखाली वावरणार्‍या आजच्या विद्यार्थ्यांना ‘स्वतःच्या मनाचं कार्य कसं चालतं’ हे समजावून सांगणार्‍या शिक्षकांची गरज आहे. आपण मुलांना कशाकशाचा विचार करायचा ते शिकवतो, पण विचार कसा करायचा, हे मात्र शिकवत नाही. खरं तर विचार, भावना आणि वर्तन यांची सांगड घालून शिक्षण देण्याची आज खरी गरज आहे. म्हणूनच केवळ उपदेश न करता स्वतःचे आचरण आणि विचार कसे असायला हवेत, हे निश्चित करून तशी कृती किंवा वर्तन शिक्षकानं करणं अपेक्षित आहे, कारण उपदेश कितीही योग्य असला तरी त्याला विरोध होणार, उलट कृतीतून विद्यार्थ्यांवर जास्त लवकर प्रभाव पडतो, हा माझा अनुभव आहे.

हल्लीचे विद्यार्थी हे खूप ‘स्मार्ट’ आहेत म्हणूनच विद्यार्थ्यांना काय येत नाही, यापेक्षा त्याला कशात गती आहे, हे लक्षात घेऊन न रागावता, न चिडता त्याला पुढे जाण्यास मदत करणारं ज्ञान दिल्यास ते घ्यायला त्याला आवडतं. विद्यार्थ्याला त्याच्या गुणवत्तेचा परिचय करून देणारं शिक्षकांचं प्रोत्साहनपर बोलणं आवडतं. मात्र अनेकदा ६० ते ८० विद्यार्थ्यांमधून प्रत्येकालाच असं प्रोत्साहन देणं शक्य नसतं. अशा वेळी वर्गातल्या विद्यार्थ्यांचा सरासरी कल बघत शिकवणं योग्य ठरतं. आपले शिक्षक आपल्याला विषय कळावा यासाठी प्रयत्न करत असतात, हे जेव्हा विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं तेव्हा ते ही अशा प्रयत्नांना प्रतिसाद देतात. पु.ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील चितळे मास्तर म्हणतात, ‘आयुष्यात व्रत एकच केलं- पोरगं सापडलं तावडीत की, त्याला घासून पुसून जगात पाठवून देणं.’ आज पुलाखालून बरचं पाणी वाहून गेलं असलं, पिढ्या बदललेल्या असल्या तरी शिक्षकाच्या या व्रतात तीळमात्रही फरक पडलेला नाही हेच खरं!

-आराधना जोशी 

[email protected]