बकुळ  

दिंनाक: 28 Nov 2018 15:07:03


बकुळ ही वनस्पती सदाहरित असून ती श्रीलंका, मलाया, उ. कारवार, कोकण, द. भारत जंगलातही आढळते. ती सामान्यतः सुगंधी फुलांकरिता भारतीय बागांतून लावतात. हिची उंची ३५-४० मीटर असते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव मिम्यूसॉप्स एलंगी असे आहे. बकुळीची फुले सामान्यच पण इतर फुलांपेक्षा त्यांचा रंग वेगळाच. तपकिरी रंगाचं, मातीय रंगाचं हे फूल टसर सिल्कच्या रंगावर, त्याच पोताचे. याचे कुळ सॅपोटेसी त्याच कुळात चिकू, मोह, याही वृक्षांचा समावेश आहे. याचा गोड सुगंध टवटवीतपणा आणतो. महाभारतात त्याचा उल्लेख आढळतो. श्रीकृष्ण याच्या झाडाखाली बासरी वाजवत असे. साधुसंत याला देवाची देणगी समजत. तो देवळाच्या उजव्या बाजूला लावतात. फुले देवाला वाहतात. कोकणात केळीच्या सोपटात (धागा) ही फुले ओवून बायका गजरे करून केसात माळतात. विकतात.

या वृक्षाचा माथा घुमटासारखा, साल गर्द करडी व भेगाळ असते. पाने साधी गर्द हिरवी, जाड, चिवट, लंबगोल, गुळगुळीत, एका आड एड व टोकदार असतात. हा वृक्ष सावलीसाठी चांगला. फुले लहान १.५ से.मी. व्यासाची पिवळसर पांढरी, फार सुवासिक तारकाकृती असून ती एकेकटी किंवा लहान झुबक्यात जानेवारी-मार्चमध्ये येतात. कातरकाम केलेल्या या फुलांचं रूपही आगळाच. प्रत्येक पानाच्या खोबणीतून एकांड शिलेदार फुलत असतो.

निंबोणीपेक्षा आकाराने जरा मोठा आणि लंबगोल असं याचं फळ असते. ते पितळ, शेंदरी होईपर्यंत झाडावरच असतं. ही फळं खाण्यालायक असतात. करवंदासारखी चव असते. या फळात १-२ बिया असतात. फळाचे लोणचे, मुरंबे घालतात. म्हणजे मुरवणे. 

थायलंडमध्ये या झाडाला हवेतील आर्द्रता व मातीतील ओलावा फार मानवतो. म्हणूनच आपल्याकडे हे झाड आलं ते अंदमानमार्गे मद्रास केरळातच. याची फुले एप्रिलमध्ये येतात तर फळे जूनमध्ये. साल जाड व पिंगट रंगाची. साल आकुंचन करणारी, शक्तिवर्धक असते. याचा घेर ३ फूट असतो. याचे लाकूड लाल रंगाचे असते. हे झाड थंडावा देते. फळ कच्चे असतानाच त्यावर केस दिसतात. फळातील बी तपकिरी, चकचकीत, थोडी चपटी असते. नवीन लागवड या बियांपासूनच होते. बी प्रथम टोपलीत रुजून २ वर्षांनतर रोपे पावसाळ्यात बाहेर लावतात. हे झाड सावकाश वाढते. उत्तम सावली व सुगंधी फुले यामुळे ते लोकप्रिय आहे.

सौंदर्य, सुवास, आकृती, सगळच कसं याचं नाजुकसं कोवळसं! संस्कृतात बकुळीला केसर म्हणतात. तसच तिला ओवळाही म्हंटले जाते. अशोक व बकुळ वृक्षांवर केलेल्या कविकल्पना फार मजेशीर आहेत. लहानपणी पुस्तकातल्या मोरपिसाची व बकुळीची सुकलेली फुले जुन्या आठवणी ताज्या करतात. मलाया, मॉरिशस, इथंही बकुळ वृक्ष आहे. यांचा सुवास फुले सुकल्यावरही दीर्घकाळ टिकतो. सायंकाळी फुलं गळून पडतात. फुलांचा हंगाम जानेवारी ते जूनपर्यंत. फळांचा गर पिवळट, चव गोड पण तूरट असते.

बकुळीच्या बियांतून (त्यात १६-२५%) स्थिर तेल मिळते. ते दिव्याकरिता उपयुक्त असते. या फुलाच्या सालीत, फळात तुरट द्रव्याचे (astringent) प्रमाण बरेच असते. फळ व फुलं एकत्र करून त्यापासून जखमा व व्रण यांकरिता मलम तयार करतात. या झाडांपासून  डिंकही मिळतो. खोडाच्या सालीत ३-७% टॅनीन असते. साल शक्तिवर्धक असून ती पाण्यात टाकून ते पाणी दंतरोगात चूळ भरण्यास उत्तम असते. याच्या कोवळ्या फांद्या दाट स्वच्छ करायला वापरतात. फल आमांश, अतिसारावर गुणकारी. या झाडापासून डिंकही मिळतो. सुक्या फुलांची भुकटी तपकिरीप्रमाणे ओढल्यास डोकेदुखी, वेदना कमी होतात.

लाकूड, गर्द पिंगट, कठीण, टिकाऊ, जड असून ते रंधून घासून गुळगुळीत, चकचकीत होते. बांधकाम, सजावटीचे सामान, घाणे, होड्या, वही, हत्याराचे, दांडे, कपाटे, वाद्ये, मुसळी, कातीव काम, हातातल्या काठ्या याकरिता ते वापरात आहे. सालीपासून उत्तम दंतमंजन करतात. दाट घट्ट होतात. फुलांचा काढा+साखर घेतल्याने डांग्या खोकल्यात बरे वाटते. फळाचा गार थोडा थोडा पण तुरट असते.    

-मीनल पटवर्धन 

[email protected]

श्वसनविकार, लठ्ठपणा इत्यादी रोगांच्या आधुनिक उपचार पद्धतीतमध्ये वापरल्या जाणाऱ्या शंकासूर या फुलाविषयी माहिती वाचा खालील लेखात.
शंकासूर