गुरुदेव रवींद्रनाथांना ६ भाऊ आणि ५ बहिणी. सर्वजण सुशिक्षित, उच्चशिक्षित, कलानिपूण, साहित्यप्रेमी.
१) द्विजेंद्रनाथ : हे सर्वांत मोठे भाऊ. साधी राहणी, ज्ञानसाधनेची आस, भोगविलासाची नावड हे यांचे गुण. त्यांना सर्व गोष्टींमधे रुची होती आणि काव्यचर्चा विषेश आवडत असे. आपले दीर्घायुष्य त्यांनी साहित्यसाधना करण्यात व्यतीत केले. त्यांनी कालिदासाच्या मेघदूताचा बंगाली भाषेत प्रथम अनुवाद केला. अनेक संशोधनपर ग्रंथ त्यांनी लिहिले. 'भारती' या ठाकूर कुटुंबाच्या पत्रिकेचे ते पहिले संपादक.
2) सत्येंद्रनाथ: क्र. २ चे भाऊ सत्येंद्रनाथ हे अतिशय बुद्धिमान. इंग्लंडला जाऊन भारतीय सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतात परतले. भारत सरकारच्या पहिल्या सिव्हिलियन पदावर मुंबईत त्यांची नियुक्ती झाली. सिव्हिल प्रशासक आणि जिल्हा जज म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केले. स्त्रियांसाठी त्यांनी खूप काम केले. रवींद्रनाथांना प्रथम सत्येंद्रनाथांनीच इंग्लंडला शिक्षणासाठी नेले आणि युरोपियन सोसायटी आणि वेस्टर्न संगीताशी त्यांचा परिचय करुन दिला.
३) हेमेंद्रनाथ : हे तिसरे भाऊ. यांना अनेक विषयांत रुची होती. मेडिकल सायन्स, कुस्ती, सांस्कृतिक गोष्टी अशा विविध विषयांचे  शिक्षण त्यांनी घेतले व  इतरांनी शिकावे यासाठी खूप प्रयत्न केले. स्वदेश, स्वभाषा यांवर हेमेन्द्रनाथ यांचे खूप प्रेम होते. म्हणून बंगाली भाषेतून शिक्षण देण्याबद्दल ते नेहमी आग्रही राहिले. ठाकूर कुटुंबातील स्त्रिया, मुली आणि सुना़- ज्या लहान वयात लग्न करून आल्यात, त्यांना लिहायला, वाचायला यांनीच शिकवले.
रवींद्रनाथ हेमेंद्रनाथांचे कृतज्ञतेने ऋण मानतात की, त्यांच्यामुळे बंगाली भाषेचा पाया भक्कम झाला. दुर्दैव म्हणजे वयाच्या चाळीशीत हेमेन्द्रनाथांचे निधन झाले.
४)ज्योतिरिंद्रनाथ : अतिशय हुशार, गुणवान. उत्तम पियानोवादक, संगीतकार. बंगाली गीतांसाठी नोटेशनची पद्धत यांनी शोधून काढली, जी आजही प्रचलित आहे. संगीत या विषयावरील बंगालीतील प्रथम मासिक यांनी प्रकाशित केले. नाटक लिहिणे आणि मंचावर सादर करणे हे आवडीचे काम. रवींद्रनाथांच्या सांस्कृतिक जडणघडणीत यांचा महत्त्वाचा वाटा.
५) वीरेंद्रनाथ आणि ६) सोमेंद्रनाथ : यांच्याबद्दल विशेष माहिती नाही.
 
बहिणी 
१)सौदामिनीदेवी : सर्वांत मोठी बहीण. रवींद्रनाथांच्या शिक्षणासाठी, त्यांनी शाळेत जावे, खूप अभ्यास करावा यासाठी खूप आग्रही, प्रयत्नशील होत्या. 
सुकुमारीदेवी, शरदकुमारीदेवी, बर्नाकुमारीदेवी यांची विशेष माहिती नाही.
२)स्वर्णकुमारीदेवी : महर्षि देवेंद्रनाथांची चतुर्थ कन्या. कथा, कादंबरी,नाट्यरचना लिहिण्यात या सिद्धहस्त. संगीतरचना करण्यातही प्रवीण. ठाकूर कुटुंबाची मासिक पत्रिका 'भारती' चे संपादकपद यांनी अनेक वर्षे समर्थपणे सांभाळले. या आपले ज्येष्ठ भाऊ आणि इतर पुरुषांबरोबर साहित्य चर्चेत नेहमी सहभागी होत असत.
 
असे हे ठाकूर कुटुंबीय,  बंगालमधील एक सुप्रतिष्ठित, उच्चविद्याविभूषित, सुशिक्षित आणि अनेक गुणांनी युक्त असे होते. स्त्री-पुरुष भेद न मानणारे आणि आपल्या भारत देशावर मनापासून प्रेम करणारे असे हे ठाकूर घराणे. छोट्या रवींद्रनाथांवर या सर्वांचा उत्तम प्रभाव पडला होता.
-स्वाती दाढे
 

कवी रवींद्रनाथ यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती?याविषयी माहिती खालील लेखात घेऊ.
रवींद्रनाथांचे आईवडील