दिल्ली उत्तर भारतात असल्यामुळे उत्तर भारतातल्या वेगेवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीचा इथे प्रभाव पडलेला दिसतो. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान ही सगळी राज्य दिल्लीपासून जवळच आहेत. त्यामुळे इथे बोलली जाणारी हिंदी  भाषासुद्धा आपण महाराष्ट्रात बोलतो त्यापेक्षा वेगळी आहे. एक गमतीशीर उदाहरण सांगते तुम्हाला - आपण जर कोणाशी हिंदीत बोलत असू तर आपण त्याला तुम म्हणतो, तुम क्या कर रहे हो, तू क्या कर रही है? असं . पण इथे दिल्लीत तू किंवा तुम म्हणत नाहीत. तसं कोणाला बोलणं अपमानकारक मानलं जातं. इथे छोट्या बाळापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच आप म्हटलं जातं. तसंच इथे प्रत्येकाच्या नावाला जी लावण्याची पद्धत आहे. कोणाला हाक मारायची असेल तर शर्माजी, चोप्राजी, खन्नाजी असं म्हणतात .  आपल्याकडे मराठीत एक वाकप्रचार आहे - हांजी हांजी करणे. हे हांजी काय आहे असा प्रश्न जर तुम्हाला कधी पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला दिल्लीत मिळेल. कसं? इथे जर दोन माणसं बोलत असतील तर एक माणूस दुसऱ्याला सांगत असेल तर ऐकणारा माणूस हां जी, हां जी असा प्रतिसाद देत असतो. आपण मराठीत म्हणतो ना, बरं - हो - ठीक आहे तसंच हे हां जी. हे हां जी इतक्या गोड आवाजात बोललं जातं की त्यामुळे आपल्याकडे हा वाक्प्रचार नकारात्मक अर्थ असणारा झाला आहे. महाराष्ट्रात मुघल आले शिवाजी महाराजांच्या काळात आणि नंतरही.  शिपायांच्या भाषेचा, बोलण्याच्या पद्धतीचा आपल्या मराठी भाषेवर प्रभाव पडला आणि त्यातूनच असे वाक्प्रचार किंवा शब्द मराठीत रूढ झाले. 
आपण महाराष्ट्रात काही हिंदी शब्द वापरतो ते इथे फारसे प्रचलित नाहीत. आपण साखरेला सर्रास शक्कर म्हणतो हिंदीत. पण इथे शक्कर म्हटलं तर काही लोकांना कळत नाही. इथे प्रचलित शब्द आहे चीनी. तुम्हाला कदाचित चीनी कम नावाचा पिक्चर माहीत असेल. मराठीत आपण ज्याला कोथिम्बीर म्हणतो त्याला इथे हरा धनिया म्हणतात आणि नुसतं धनिया म्हटलं तर ते असतात धणे. आपण स्वयंपाकात नारळ वापरतो. उत्तर भारतात जेवणात नारळाचा वापर होत नाही. नारळ हे फळ आहे, त्यामुळे इथे नारळाच्या खोबऱ्याच्या चंद्रकोरीच्या आकाराच्या फोडी नुसत्या खाण्यासाठी मिळतात. आपल्याकडे कधी कधी कलिंगडाच्या किंवा अननसाच्या अशा फोडी विकल्या जातात. आपण मेथी, पालक अशा पालेभाज्यांच्या जुड्या विकत घेतो. पैसे जुडीचे असतात. म्हणजे २० रुपयाला किंवा १० रुपयाला एक जुडी असं. इथे दिल्लीत पालेभाज्या वजनावर मिळतात . ६० रुपये किलो मेथी असं मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा मला गम्मतच वाटली. लिंबूसुद्धा आपण नगावर घेतो. म्हणजे १० रुपयांना २ लिंबं असं . इथे लिंबूसुद्धा वजनावर मिळतात. २० रुपये पाव किलो असं. केळीसुद्धा काही ठिकाणी डझनाच्या भावाने तर काही ठिकाणी किलोवर मिळतात. एखाद्या वेगळ्या शहरात आपण जेव्हा राहातो तेव्हा वेगवेगळे बारकावे आपल्याला कळायला लागतात. तिथल्या माणसांबरोबर आपण राहातो, बोलतो, ऑफिसात काम करतो त्यातून अशा वेगवेगळ्या गोष्टी कळतात. त्या तुमच्याशी शेअर करते मी. आवडतात की नाही तुम्हाला? 
 
-सुप्रिया देवस्थळी 
 
'दही भल्ले, शकरकंद, राम लाडू' यांसारख्या दिल्लीतील काही पदार्थांची माहिती घेऊयात सुप्रिया देवस्थळी यांच्या खालील लेखात.

शोधू नवे रस्ते - भाग ७