कार्तिक येतो नि थंडीच्या चाहुलीने सृष्टी बदलते,           

शारदीय शोभेत वातावरणाचे सौंदर्यही खुलते,      

आकाश देवता रंगपंचमी खेळते नि सूर्यास्त विलोभनीय होतो, 

सोन्याचा चुरा उधळीत लाल सूर्य अतीव सुंदर दिसतो ll १ ll

 

कार्तिकातच असतो प्रकाशाचा, तेजाचा उत्सव,

दिवाळी म्हणजे मांगल्य नि ज्ञानाचा दीपोत्सव,                         

मनामनात उजळावी एक प्रशांत ज्योत,   

इवली पणती करते अज्ञानरूपी अंध:कारावरील मात ll २ ll

 

वननिवास, सहभोजनासह करू आनंद वृद्धी,    

धनसंपत्ती सह होवो विचार समृद्धी,  

प्रदूषण मुक्त दिवाळीच्या प्रकल्पाची करू सिद्धी, 

आरोग्यदायी जीवनासाठी मिळे सद्बुद्धी ll ३ ll

 

निसर्गाचे रंगवैभव नि दारी रांगोळ्यांची बहार,                                 

दिव्यांची आरास करीत जीवन होईल नक्षीदार, 

कार्तिक म्हणजे शरदाच्या मनोहारी अलंकारांना देतो साथ, 

सृष्टीचे वैभव दाखविण्या देतो मार्गशीर्षाच्या हाती हात ll ४ ll

 

-रोहिणी पंचवाडकर

न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड.