'हॅपी बर्थ डे टू यू.... हॅपी बर्थ डे टू यू । हॅपी बर्थ डे डिअर वेदा...हॅपी बर्थ डे टू यू '

एका सुरात सगळ्या मुलमुलींनी वेदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.... टाळ्या वाजवल्या... अभिनंदन केलं..

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये, वेदा आज खूप गोड दिसत होती. अगदी परीराणी सारखी.

बार्बी डाॅलची प्रतिकृती असलेला छान छान केक तिनं कापला. 

इतक्यात वेदाची आजी हातात औक्षणाचं तबक घेऊन आली. तिनं वेदाला छोटासा कुंकुम् तिलक लावला. वेदाच्या गो-या कपाळावर तो खूपच शोभून दिसत होता. डोक्यावर अक्षता घातल्या. हातात सुपारी अन् अंगठी घेऊन, वेदाच्या चेहे-यावरून ओवाळली. नंतर निरांजनाने ओवाळलं. निरांजनाच्या त्या शांत प्रकाशात, वेदाचे हसरे डोळे छान चमकले. त्यातून ओसंडणारा आनंद सर्वांनाच जाणवला. वेदानं आजीला वाकून नमस्कार केला. आजीनं मोठ्या मायेनं तिला जवळ घेऊन, ' यशस्वी भव ' असा तोंडभरून आशीर्वाद दिला. नंतर तिच्या आईनंही औक्षण केलं आणि वेदानं नमस्कार केल्यावर ' खूप मोठी हो ' असा आशीर्वाद दिला. 

नंतर तिला गिफ्ट देण्यासाठी सगळे तिच्या भोवती जमले. वेदा अगदी हरखून गेली होती.

सगळ्यात वेगळं गिफ्ट दिलं होतं स्नेहलताईनं. सर्वांनाच खूप उत्सुकता होती, काय दिलं असेल बरं स्नेहलताईनं ?

सर्वांच्या आग्रहावरून वेदानंही मोठ्या उत्सुकतेनं ते गिफ्ट उघडलं. तर काय .... खूप रंगीबेरंगी चित्रं असलेलं एक छानसं पुस्तक होतं ते....."... महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती देणारं. .

स्नेहलताई म्हणाली, ' आता आपण अधून मधून अशा गड किल्ल्यांना भेटी देऊ या. निरनिराळी निसर्गरम्य ठिकाणं पाहूया. त्याची पूर्वतयारी म्हणून सर्वांनीच या पुस्तकातील माहिती वाचून ठेवूया. '

' वा.... खूप छान कल्पना... ' वेदाची आई उत्साहानं म्हणाली. ' मीसुद्धा या मुलांना रिटर्न गिफ्ट म्हणून पुस्तकंच आणली आहेत. निरनिराळ्या फळा- फुलांची, शहरांची, ऐतिहासिक वास्तूंची, कलाकारांची, शास्त्रज्ञांची, वैज्ञानिक शोधांची माहिती देणारी पुस्तकं आहेत ही. तसंच वेदाच्या छोट्या दोस्तांसाठी गोष्टींची आणि चित्र रंगवण्याची पुस्तकं आहेत. ज्याला जे आवडेल ते निवडायचं. पण वाचायची नक्की.'

' अरे वा... मस्तच आहे ही आयडियाची कल्पना.... काय दोस्तांनो ? ' स्नेहलताईनं वेदाच्या आईला थॅंक्यू म्हंटलं.

' आणि बरंका, प्रत्येकानं आपलं पुस्तक वाचून झालं की, आपल्या ग्रुपमध्ये एकमेकांना वाचायला द्यायचं. म्हणजे दिवाळीच्या सुट्टीत भरपूर वाचन होईल सगळ्यांचं. वेदाच्या आई तुमच्यामुळे यांना मस्त खाऊ मिळालाय हं दिवाळीचा '

' अग होतं काय दरवर्षी माहितीये कां, दिवाळी संपल्या संपल्या दोन दिवसांनी वेदाचा वाढदिवस येतो. मग काय... दिवाळी साठी कपडे, खाऊ, चाॅकलेटं.... सगळी सगळी खरेदी होते, मजा करून होते. मग वाढदिवसाला काहीतरी नवीन कल्पना हवी ना... म्हणून पुस्तकं. ' वेदाची आई सांगत होती. 

' मग काय, मस्तच की...' निखिल म्हणाला... ' माझा वाढदिवस पण असाच .... न्यू ईयरची धमाल करून झाल्यावर .... २ जानेवारीला... तेव्हा माझे बाबासुद्धा मला वेगवेगळ्या समाजसेवी संस्थांमध्ये घेऊन जातात. '

' खूप छान....' स्नेहलताई आनंदानं म्हणाली. ' नाहीतरी दिवाळी काय किंवा नवीन वर्षं काय, शेवटी आपण त्याकडे कसं पाहतो ते महत्वाचं. सणाची मौजमजा करून झाल्यावर त्या पलिकडे जाऊन काही विचार केला तर अशा छान छान गोष्टी करता येतात. आपले नातेवाईक असोत किंवा नेहमी न भेटणारे मित्र मैत्रिणी असोत, अशा निमित्तानं मुद्दाम वेळ काढून स्नेहसंम्मेलन घडवून आणलं, साहित्य - नाटक - सिनेमा यांचा एकत्रितपणे आस्वाद घेतला तर ती मजा जास्त काळ स्मरणात राहील. आपल्या जवळपास असलेल्या ग्रामीण भागांत मुद्दाम जाऊन, तिथल्या लोकांशी संवाद साधला, त्यांच्या प्राॅब्लेम्समध्ये काही मदत करू शकलो, आपल्याला असलेली माहिती त्यांना दिली, पुस्तकांद्वारे त्यांच्यात काही नव्या गोष्टींची जाणीव निर्माण केली तर ती खरी दिवाळी अन् ती खरी नव्या वर्षाची सुरवात. म्हणतात ना ' ज्ञानदीप लावू जगी ' असं काहीसं. ' म्हणजे आपण काही मौजमजा करायची नाही असं नाही, तर आपण जो आनंद घेतला, तसाच थोडासा इतरांबरोबरही शेअर केला तर काय हरकत आहे? '

स्नेहलताई असं काही बोलली की सर्वांनाच कसा उत्साह येतो. 

' म्हणूनच नेहमी निबंधाचा विषय देतात ना..... वाचाल तर वाचाल..... मला तर प्रवास वर्णनं वाचायला खूप आवडतात. लेखकानं जर छान लिहिलं असेल ना, तर अगदी डोळ्यासमोर चित्रच उभं राहतं त्या ठिकाणाचं. ' 

सागर म्हणाला. ' ही पुस्तकं सा-या जगाची माहिती आपल्याला घरबसल्या देतात. वेगवेगळ्या देशात प्रगत झालेलं नवीन तंत्रज्ञान, नवीन शोध, नवीन उपक्रम सगळ्याची माहिती या पुस्तकांतून मिळते.'

' मला कोणा कोणाची आत्मचरित्रं वाचायला खूप आवडतं ' केतकीताई म्हणाली. ' मग ते अब्दुल कलामांचं असो की सचिन तेंडुलकरचं. आपलं ध्येय गाठण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत आणि आपल्या कामावरील निष्ठा बघून आपल्यालाही स्फूर्ती मिळते. शेवटी काय ही पुस्तकं आपला मित्र, दोस्त होऊन जातात. अगदी कोणत्याही वयापर्यंत साथ देतात.'

आपल्यातल्या या ताई दादांचं बोलणं छोटी मंडळी सुद्धा कुतुहलानं ऐकत होती.

नेहा लगेच म्हणाली, ' माझ्याकडे पण लहान मुलांच्या गोष्टींच्या व्हिडिओ सी.डी.ज आहेत. काय मज्जा येते त्या गोष्टी पहायला. '

निखिलनं आणखी माहिती पुरवली......' आता तर इंटरनेटमुळे ई-पुस्तकं आॅनलाईन उपलब्ध असतात. जगातल्या कोणत्याही लेखकाचं, कोणत्याही भाषेतलं पुस्तक इथे उपलब्ध असतं. त्याचबरोबर आता आॅडिओ बुक्सही यायला लागली आहेत. '

' म्हणजे काय ? ' सारिकाचा प्रश्न.

' म्हणजे ज्यांना एका जागी बसून वाचायला वेळ मिळत नाही, ते आॅफिसला जाताना रोजच्या प्रवासात ही पुस्तकं ऐकू शकतात. तसंच दृष्टिहीन व्यक्तींना किंवा वयोमानानुसार कमी दिसायला लागलेल्या आजी आजोबांना ही पुस्तकं ऐकता येतात. मी मावशीकडे अमेरिकेला गेले होते ना तेव्हा अशी आॅडिओ बुक्स आणली आहेत. आता आपल्याकडेही मिळायला लागली आहेत. माझ्या आजोबांनी आत्ताच स्वातंत्र्यवीर सावरकरांचं - माझी जन्मठेप - हे पुस्तक ऐकलं. नव्या युगाच्या तंत्रज्ञानाचा असा उपयोग सर्वांना फायदेशीरच नाही कां ? ' शमिका.

' मग काय, अगदी पोथ्या पुराणं वाचणारे आजी आजोबासुद्धा आता सी.डी. ऐकत गुरुचरित्राची पारयणं करतात. गणपतीची पूजा सांगतात, वाद्यवृंदासह साग्रसंगीत आरत्याही म्हणतात. ज्याला जे हवं ते आता या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध आहे. फक्त आयुष्यातल्या वेळेचा सदुपयोग करता आला पाहिजे. जगण्यावर श्रद्धा पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद शोधण्याची कला साधली पाहिजे. ' स्नेहलताई.

' अशीच निष्ठा आणि श्रद्धा आषाढी - कार्तिकी ला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणा-या वारक-यांमध्येही दिसून येते. ' इतका वेळ सगळ्यांच्याच गप्पा ऐकणा-या वेदाच्या आजीनेही संभाषणात भाग घेतला. ' मोठ्या श्रद्धेनं ते दरवर्षी ही वारी दोनदा करतात. सगळे एकत्र हरिनामाचा गजर करत ही वाट चालतात. त्यामुळे ना त्यात कसला त्रास वाटत, ना कसले श्रम. आपल्या आनंद ते या वारीतून मिळवतात. यंदा कार्तिक एकादशीला मी पण जाईन म्हणते वारीला. '

'हो आणि या कार्तिकी पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेला नीलकंठेश्वराच्या देवळातला दीपोत्सव पहायला जाऊया बरंका आपण. ' वेदाच्या आईनं सगळ्यांना सांगितलं. ' आणि तुळशीचं लग्नही पहायला मिळेल तिथे. '

इतक्या वेगवेगळ्या प्रकारे, दिवाळीच्या सुट्टीत मजा करता येईल या विचारानं सगळेजण खूष झाले.

- मधुवंती पेठे

[email protected]

 

 दसरा या सणाची माहिती सांगणारा मधुवंती पेठे यांचा लेख.

लेख ९ - सांग ना स्नेहलताई....