तानपुरा

दिंनाक: 02 Nov 2018 15:32:49


भारतीय संगीतात तानपुरा (तंबोरा किंवा तानपुरी) हे स्वराचे एक मूळ वाद्य आहे. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे त्याची मान खूप उंच असते. तानपुर्‍याच्या तारांमधून फक्त चार किंवा पाच स्वर निघतात, जे गायकाला पूर्ण वेळ मूळ स्वर प्रदान करतात. या तारा सलग एका लयीत वाजविल्या जातात. तानपुर्‍याचे नाव हे मूळ पर्शियन नाव आहे (तंबूर). तंबोरा लावताना (ट्यून करताना) सर्वप्रथम खुंट्यांचा वापर केला जातो. तानपुरा खूप उतरला किंवा चढला असल्यास ज्या स्वरात तो लावायचा असेल त्या स्वरात लावण्याकरता या खुंट्यांचा वापर केला जातो. तानपुरा या वाद्याचा जो आवाज असतो तो आवाज येण्याकरता त्याचा भोपळाच अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. तानपुर्‍याची तार छेडल्यावर त्यातून जो टणकार उमटतो, तो टणकार या पोकळ भोपळ्यात घुमतो आणि एका घुमार्‍याच्या स्वरूपात हा आवाज आपल्याला ऐकू येतो. तानपुर्‍याकरता लागणार्‍या भोपळ्यांची विशेष मशागत केली जाते. त्यानंतर ते भोपळे ७५ टक्के कापून, त्यातील गर बाहेर काढला जातो व ते रिकामे भोपळे कडकडीत उन्हात वाळवले जातात. घोडी किंवा ब्रिज हा तंबोर्‍याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तंबोर्‍याच्या तारा या खुंटी ते भोपळ्याची मागील बाजू, अशा बांधलेल्या असतात. त्या तारा या घोडीवरून गेलेल्या असतात. तार छेडल्यानंतर तारेतून टणकार उत्पन्न करण्याचे काम ही घोडी करते. जवारीला तानपुरा वादनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तानपुर्‍याच्या तारा घोडीवरून गेलेल्या असतात आणि घोडीच्या मधोमध तारेच्या खाली एक बारीक दोरा दिसतो. तानपुर्‍यातून गोळीबंद व गोलाकार आवाज येण्याकरता हा दोराच अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो. त्याकरता तानपुर्‍याची घोडी कानसेने, पॉलिश पेपरने एका विशिष्ठ पद्धतीने घासावी लागते. यालाच तानपुर्‍याची ‘जवार काढणे’ असे म्हणतात. हे अत्यंत कठीण काम असते. ही जवार अतिशय निगुतीने व काळजीपूर्वक पद्धतीने काढावी लागते. त्यामुळे दोरा तारेतून आत सरकवल्यावर घोडीच्या मध्यभागी एका विशिष्ठ ठिकाणी अडतो आणि बरोबर त्याच जागेवर तार छेडली असता घोडीतून गोलाकार, गोळीबंद असा टणकार उत्पन्न होतो. हा दोरा घोडीच्या एका ठरावीक जागी असतानाच तानपुर्‍यातून सुरेल व मोकळा टणकार ऐकू येतो. यालाच जवारी लागली असे म्हणतात. हा दोरा थोडासा जरी आपल्या जागेवरून हलला, तर तारेतून मोकळा टणकार उत्पन्न न होता बद्द आवाज ऐकू येतो. जवारीच्या जागी उत्पन्न झालेला टणकार पोकळ भोपळ्यात घुमून त्या भोपळ्यातून अतिशय सुंदर असा गोलाकार ध्वनी ऐकू येतो. तंबोरा कारागिरीत पिढ्यान्पिढ्या असलेले मिरजेतील काही कारागीर, हे जवारीचे काम जाणतात.

उत्तम जवारी कशी असावी, कशी लावावी, तानपुरा कसा गोळीबंद बोलला पाहिजे, कसा मिळून आला पाहिजे याबाबत या मंडळींचा अधिकार आहे. घोडीच्या पुढे असणारे मणी हे तंबोर्‍याच्या फाईन ट्युनिंगकरता वापरले जातात. स्वरांचे सूक्ष्म फरक या मण्यांच्या साहाय्यानेच सुधारले जातात. तंबोर्‍याच्या पहिल्या तारेवर रागानुसार मंद्र पंचम, किंवा मंद्र शुद्ध मध्यम किंवा मंद्र शुद्ध निषाद लावला जातो, मधल्या दोन तारांना ‘जोड’ असे म्हणतात आणि या तारांवर मध्य षड्ज लावला जातो आणि शेवटची तार ही खर्जाची असते आणि त्यावर खर्जातला षड्ज (मंद्र षड्ज) लावला जातो. शेवटची खर्जाची तार ही नेहमी तांब्याची असते आणि इतर तीन तारा या स्टीलच्या असतात.

-यशोधन जटार

[email protected].com


तबला