सुमारे ६० वर्षांपूर्वींची गोष्ट! एका कॉलेजमधला ‘विठ्ठल ’ नावाचा विद्यार्थी एका लग्न समारंभाच्या निमंत्रण वरून मुंबईहून बंगलोरला गेला होता. रात्री १० च्या गाडीचे परतीचे तिकीट आरक्षित केले होते. सायंकाळचा वेळ मोकळा होता, शास्त्रीय विषयात त्याला अतिशय कृतुहल होते. आणि त्यामुळे या फावल्या वेळात बंगलोर येथील रामन इन्स्टिट्यूट पाहण्याचे ठरवून तो शोधत शोधत तेथे गेला. परंतु संध्याकाळचे ६ वाजल्याने ती इन्स्टिट्यूट बंद झाली होती. त्याला कुलूप होते. कुमारवयीन विठ्ठल ते पाहून उदास झाला.

त्याच परिसरात सभोवती अतिशय सुंदर बगीचा होता. आणि   त्या बगीच्यात, हातात एक मोठी कात्री घेऊन एक माळी बागकाम करण्यात गढून गेला होता. त्या माळ्याचे लक्ष्य वेधून कुमार विठ्ठल म्हणाला  “‘रामन इन्स्टिट्यूट’ पाहण्याची माझी लहानपणापासुन उत्सुकता होती आणि सर सि.व्ही. रामन या नोबेल पारितोषिक विजेत्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाला भेटण्याची फार इच्छा होती.”  

‘आपण उद्या या आता इन्स्टिट्यूट बंद झाली आहे, आपण उद्या सकाळी १० वाजता यावे.’ हे त्या माळ्याने उत्कृष्ट इंग्रजीमध्ये सांगितले “Please come tomorrow after 10 am  institute has been closed now."

“परंतु रात्री १० वाजता मुंबईला परत जावे लागणार आहे आणि असा योग पुन्हा येणे आवघड आहे. आणि त्यामुळे माझी फार निराशा झाली आहे.”

त्या मुलाच्या बोलण्यातली तगमग, त्याची निराशा, त्या माळ्यास जाणवली आणि तो म्हणाला, “किल्ली माझ्यापाशी आहे. मी इन्स्टिट्यूट उघडतो आणि दाखवतो.”

जवळजवळ दीड, दोन तास लागले सगळी इन्स्टिट्यूट बघायला त्या माळ्याने तेथील सगळी उपकरणे व यंत्रे त्यांचे कार्यपद्धती विलक्षण सोप्यारीतीने समजून सांगितली. त्यानंतर त्या माळ्याने कुलूप लावून इन्स्टिट्यूट बंद केली. निघताना विठ्ठलने स्वतःची ओळख करून दिली व त्यांचे मनोमन आभार मानले. आणि म्हणाला...

“मला प्रत्यक्ष रामन भेटले असते तर मी फार भाग्यवान समजलो असतो”, असे म्हणून विठ्ठल जायला निघाला आणि मनोमन विचार करत होता...  ‘त्या माळ्याचे इंग्रजी आणि संस्थेतील सगळ्या उपकरणांचे ज्ञान आश्चर्यकारक आहे.’ त्याने परत फिरून विचारले “माळीबुवा तुम्ही येथे बरेच दिवसांपासून नोकरी करत आहात का?”

“अगदी पहिल्या दिवसापासून मी इथेच आहे.”

विठ्ठल म्हणाला “माळीबुवा तुमचे नाव काय?” आणि विठ्ठलला आश्चर्याचा धक्काच बसला.. त्या माळ्याने स्वतःचे नाव सांगितले... “सी.व्ही. रामन”!

बालमित्रांनो,... ‘सर सी.व्ही. रामन’ हे इतके मोठे शास्त्रज्ञ होते की त्यांना ‘रामनइफेक्ट’ (प्रकाशकिरणांवर संशोधन) या संशोधनाबद्दल भौतिकशास्त्र या शाखेत नोबेल पारितोषिक मिळाले. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले आशियायी शास्त्रज्ञ होते. परंतु इतके थोर आणि विद्वान असूनही त्यांनी हे जाणवू दिले नाही, कुठलाही अहंकार नाही किवा गर्व नाही उलट किती नम्रपणा, किती ही विनयशीलता!.. खरचं ‘विद्या विनयेन शोभते’ हेचं खरे!

आणि बालमित्रांनो, आणखीन एक गोष्ट आहे यातून शिकण्यासारखी एखाद्या गोष्टीची खरीच इच्छा असेल न अगदी मनापासून तर माणसाने आपले प्रयत्न आणि आशा कधीच सोडून देऊ नये बघा या विठ्ठलची किती तीव्र इच्छा होती ना रामन इन्स्टिट्यूट बघण्याची आणि ‘सर सी. व्ही. रामन’ यांना भेटण्याची. थोडीशी धडपड केली आणि ती चक्क पूर्ण झाली अतिशय आश्चर्यकारक रित्या!

आणि हो एक सांगायचं म्हणजे हा कुमार विठ्ठल म्हणजे आताचे ‘डॉक्टर विठ्ठल प्रभू’! वैद्यकीय क्षेत्रातील त्यांची कामगिरी विशेष गौरविण्यात आली  आहे. 

-गोपाळ धडफळे 

[email protected]