एकदा माझी नणंद जयश्री आणि मी आपापल्या पाल्यांबाबत बोलत होतो. दोघांचंही पहिलंच अपत्य त्यामुळे दोघींनाही पालक म्हणून आलेल्या अनुभवांबद्दल आणि झालेल्या चुकांबद्दल आम्ही बोलत होतो आणि बोलता बोलता दोघींच्याही एक गोष्ट लक्षात आली की, पालक होण्याचा आमचाही पहिलाच अनुभव होता. आम्हाला एकएक मूल असल्यामुळे पहिला आणि शेवटचाही. पण पालकत्वाबाबतची ही गंमत लक्षात आली आणि फोनच्या दोन बाजूंनी आम्ही जोरजोरात हसत सुटलो. बरोबरच एकदम म्हणालो, आपलं पालकत्व उमलतंय बरं का दिवसेंदिवस. या उमलत्या पालकत्वाची ही गजाल (मी मालवणी आहे म्हणून हा शब्द बरं का!) तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी यापुढचा प्रपंच मांडणार आहे.

पालकत्व म्हणजे खूप ओझं, पालकत्व म्हणजे खूप मोठ्ठी जबाबदारी, सतत आपल्या मुलांचा विचार म्हणजे पालकत्व, मुलांचं कायम नि कायम भलं झालंच पाहिजे हा सतत भेडसावणारा किडा म्हणजे पालकत्व, आजकालचं पालकत्व म्हणजे केवढी मोठ्ठी चिंता, काही नाही हो एवढं, पोरं वाढतात आपली आपली! कशाला हा पालकत्वाचा बाऊ? करू दे पोरांना काय हवं ते, मोठी झाली की सुधारतात आपली आपली, कसलं ते पालकत्व नि काय? बी हॅप्पी, लिव्ह हॅप्पी, ज्याच्या त्याच्या नशीबात जे जे लिहिलंय ते ते होणार, कशाला एवढी काळजी करायची? पेरेंटिंग वगैरे थेरं आहेत हो नुसती, आमच्या लहानपणी कोणी केला होता एवढा विचार झालोच ना आम्ही मोठे!  कशाला एव्हढा विचार करायचा त्या पालकत्वाचा. पालकत्वाबाबतची अशी दोन टोकांची, उलटी सुलटी मतं कायमच ऐकायला मिळत असतात आणि नवा नवा पालक भांबावून जातो. चिंता करणं योग्य की केअरलेस होणं, काळजी घ्यावी की निष्काळजीपणा दाखवावा, मदत करावी की स्वतंत्र जगायला द्यावं हे ना ते, अनेक प्रश्न भेडसावतात आणि या प्रश्नांच्या भेंडोळ्यात आपण अडकत जातो. हे भेंडाळणं थांबावं किंवा ते आपल्या अनुभवास येऊ नये म्हणून हा लेखनप्रपंच. कोणताही अतिरेक टाळत विवेकी विचाराने आपण जर का पालकत्वाचा विचार केला तर पालकत्व अनुभवता येईल, पालक व पाल्य दोघांनाही त्याचा आनंद लुटता येईल. फक्त, हा विवेकी विचार कसा करावा त्यासाठी आपण आपल्यामध्ये कोणता बदल करावा, आपल्यामधल्या बदलांमुळे आपल्यावर व आपल्या पाल्यामध्ये कोणते सुंदर परिणाम दिसू शकतील याबाबत थोडीशी चर्चा करण्यासाठी या महिन्यापासूनचं हे सदर ‘उमलतं पालकत्व’.

-मेघना जोशी

[email protected]l.com