अनिरुद्ध, दिशा, अनीश, केतकी, श्रेया आणि शमिका सगळ्यांचा गोतावळा जमला होता, आज केतकीच्या घरात. परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या आणि केतकीचे आई - बाबा पण रात्री मिंटिंगहून उशीरा येणार होते. मग काय गप्पांना नुसतं उधाण आलं होतं. चक्क ऋषीदादा पण आला होता ट्रेकिंगच्या गमतीजमती सांगायला.

“अरे, या वेळी फार थरारनाट्य झालं बाबा येताना.”

“थरारनाट्य?”, सगळे एका सुरात ओरडले.

“अरे, आम्ही रात्री साधारण १० वाजता गडउतार झालो.”

“गडउतार?” व्वा! “दादा”, अनीश मिश्किलपणे हसत म्हणाला. “पुढं ऐक. १०.३० ची शेवटची बस मिळाली परत यायला. जेमतेम २० माणसं आणि दोन - तीन बायका. मध्ये एका ठिकाणी निर्मनुष्य रस्त्यावर बस आली आणि बसमध्येच दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी बस थांबवली. त्या ड्रायव्हरच्या गळ्याला सुरी लावली. आम्हाला म्हणाले, “काय पैसे, सोनं असेल ते द्या पटकन.”

ऋषीदादा रंगवून रंगवून हकीकत सांगत होता आणि इकडे केतकीला मात्र तो विषय कधी संपतोय असं झालं होतं. 

“ए दादा, तुम्ही ट्रेकिंगला काय काय केलं ते सांग नं. हे काय फार ळपींशीशीींळपस वाटत नाहीये रे.”, केतकीच्या आवाजातली भीती सगळ्यांच्याच लक्षात आली. पुन्हा सगळे एका सुरात ओरडले, “ए ऽऽऽ घाबरली घाबरली.”

“हॅ! मी मुळीच घाबरली वगैरे नाहीये. पण आधीच दादाचे पैसे वगैरे गेलेत. त्यामुळे त्याला वाईट वाटत असेल. त्यात कशाला मग पुन्हा तोच विषय? म्हणून”, केतकी फणकारून म्हणाली.

अनिरुद्ध आणि अनीशने एकमेकांकडे पाहत डोळे मिचकावले. बरीच संध्याकाळ झाल्यावर सगळे आपापल्या घरी जायला निघाले.

“केतकी, दार नीट लावून घे गं. मी आहेच शेजारी. भीती वाटली तर हाक मार”. ऋषीदादा हसत हसत म्हणाला तशी केतकी पण कशीबशी हसली. सगळ्यांना बाय करून घाईघाईने घरात आली. दरवाजा लोटला आणि आधी टी.व्ही. ऑन केला. थोड्या वेळाने तिला दाराशी कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. बहुतेक आईबाबा आले असावेत असे म्हणत तिने घड्याळाकडे पाहिले. पण त्यांना यायला तर अजून वेळ होता.

“मग आत्ता कोण येणार?”, असा विचार करत असतानाच पाठोपाठ दारावर टकटक आणि नंतर जोरजोरात थापा मारल्याचे आवाज येऊ लागले. केतकी जाम घाबरली. मघाशी ऋषीदादाने केलेलं वर्णन तिला आठवलं आणि तिची खात्रीच पटली की हे अतिरेकीच असणार.

‘अरे बापरे,  मी तर फक्त दार लोटूनच आलेय. आता काय करू?’ केतकी रडकुंडीलाच आली. ती पळत गॅलरीत लपून बसायला आणि काळ्या ओढण्या बांधलेले अतिरेकी घरात शिरायला एकच गाठ पडली.

केतकी गॅलरीत अलेल्या चाफ्याच्या झाडाची फांदी धरून कशीबशी उभी होती. घरात अतिरेक्यांचा आरडाओरडा चालू होता. शेवटी निर्धार करून केतकी चाफ्याच्या फांदीवरून हळूहळू खाली उतरली आणि अनिरुद्धच्या घराकडे धावत सुटली.

“अनिरुद्ध ऽऽ. अरे, याच्या घराला तर कुलूप आहे. अरे, बाप रे. श्रेयाकडे जाते”.

“श्रेया ऽऽ. अगं, आमच्या घरात अतिरेकी शिरलेत गं. चल नं माझ्याबरोबर. काका, काकू नाहियेत का?”, केतकी म्हणाली.

“काहीही काय केतू?”, अगं, असे अतिरेकी शिरतात का कुणाच्याही घरात?. घाबरट आहेस एक नंबरची.”

“जाऊ दे. मी ऋषीदादाकडेच जाते.” केतकी दबकत तिच्या बिल्डिंगच्या पायर्‍या चढत असतानाच तिच्याच घरातून परत तिला मोठमोठ्याने हसण्याचे आवाज आले. तिने हळूच खिडकीतून डोकावले तर काय? ऋषीदादा, अनीश, अनिरुद्ध आणि शमिका हसत एकमेकांना टाळ्या देत बसले होते तिच्याच घरात. केतकी घाईघाईने आत आली. पुन्हा एकदा हास्याचा फवारा उडाला. सगळे ओरडले, “काय हे केतू? अतिरेकी आले घरा, तोचि घाबरून पळा.”

“ए काय रे!!” असं म्हणत कपाळावरचा घाम पुसत केतकीही त्यांच्या हसण्यात सामील झाली.

-स्वाती देवळे

[email protected]

ई दिवाळी अंक : आर्या जोशी लिखित कथा

फुलपाखरू