फुलपाखरू

दिंनाक: 11 Nov 2018 14:51:56


चार फुलपाखरं होती. छानशा बागेत राहत होती. एक होतं रंगीबेरंगी. खूप रंग होते अंगावर आणि छानशी नक्षी सुद्धा! दुसरं होतं दुरंगी. पांढरं आणि सुंदर निळ्या रंगाचं मखमली! तिसरं होतं खेळकर हसरं छोटुकलं! पूर्ण पानासारखं दिसणारं. उडायला लागलं तर वाटायचं की पानालाच पंख फुटलेत! आणि चौथं होतं अगदी काळं कुळकुळीत! पण सगळ्यांची खूप काळजी घेणारं!

सगळे मजेत राहत होते. आनंदाने बागडत होते.

मित्र मैत्रिणींनो, फुलपाखरांचं आयुष्य नं खूप छोटं असतं! कोशातून बाहेर पडताना अळीला खूप त्रास होतो म्हणे! पण त्यातूनही तावून सुलाखून बाहेर पडतं आणि फुलपंखी रंगात उडायलाही लागतं!!

काही फुलपाखरं जास्त दिवसही जगतात बरं का! पण काही अगदीच थोडे दिवस!

रंगीबेरंगी फुलपाखरू जास्त दिवस जगणारं असं होतं खरं पण त्याला आपल्या सुंदर असण्याचा खूप अभिमान होता. इतर मित्रांशी नीट बोलायचं नाही. आपल्याच तोर्र्‍यात उडायचं. फुलांशीही भांडायचं.

एक दिवस देवाने त्याला बोलावून घेतलं. देव म्हणाला, ‘अरे, असं वागू नये. अजून तुझे पृथ्वीवरचे थोडे दिवस शिल्लक आहेत.परत जा आणि नीट वाग सगळ्यांशी, पण याने काही ऐकलं नाही. परत आल्यानंतरही ते वेडं काही शहाणं झालं नाही!!

नंतर मग ही चारही फुलपाखरं देवाच्या घरी पोहोचली. देव काळ्या फुलपाखराला म्हणाला ये बाळा! माझ्या हातावर बस.

तेवढ्यात रंगीबेरंगी फुलपाखरू रागावलं. ते म्हणालं ते नाही मी बसणार. कारण मीच आहे सर्वांत सुंदर! मी आकाराने पण मोठं आहे की नाही!!

देव हसला आणि म्हणाला की, काळं फुलपाखरू खूप शहाणं आहे. तुम्ही राहत होतात, त्या बागेत खूप फुलपाखरं होती. पण त्यातली काही छोटी होती. काहींचे आई-बाबाच हरवले होते. काहींना नीट उडता येत नसे, कारण त्यांच्या पंखाला इजा झाली होती. काळं फुलपाखरू अशा मित्रांसाठी फुलातला मध गोळा करून पाठवत असे. तुमचे आणखी दोन मित्र त्याला मदत करत असत. पक्ष्यांच्या मदतीने त्यांनी पानांच्या छोट्या वाट्या तयार केल्या होत्या. पक्षीही चोचीतून या वाट्या नेत मधाने भरलेल्या!! अशी सगळी छान गंमत सुरू असे!

त्यामुळे काळ्या फुलपाखराला मान मिळाला आहे, माझ्या हातावर बसण्याचा आणि उद्या उरलेली दोन फुलपाखरंही बसणार आहेत माझ्या हातावर!

बागेतल्या परीताईने हे सगळं पाहिलं आहे आणि तिच्या छोट्याशा सोनेरी वहीत हे लिहूनही ठेवलं आहे!!

देवबाप्पा पुढे म्हणाला, आपल्या छोटुकल्या आयुष्यातही सर्वांना मदत करणार्‍या फुलपाखरांचं आणि त्याला मदत करणार्‍या मित्र मैत्रिणींचंही आपण कौतुक करूया. आणि बरं का बाळांनो मला तुम्ही सगळेच सारखे आहात कारण तुम्ही सगळीच माझी बाळे आहात, रंगरूपाने वेगवेगळे असलात तरी! पण माझ्या त्या बाळांचा मलाही अभिमान वाटतो, जी इतरांना मदत करतात आणि सर्वांवर प्रेमही करतात.

-आर्या जोशी 

[email protected]

ई दिवाळी अंक : अमिता दाते यांची कथा

परोपकारी मिनू