परोपकारी मिनू

दिंनाक: 10 Nov 2018 14:59:20


एका छोट्या गावात एक मिनू नावाची मुलगी राहत असते. तिला एक छोटा भाऊ असतो. मिनूचे आई - बाबा एका अपघातात देवाघरी जातात. त्यामुळे मिनूला स्वतःचे शिक्षण बाजूला ठेवून आपल्या लहान भावाची जबाबदारी घ्यावी लागते. त्याला खायला - प्यायला व्यवस्थित मिळावं, त्याला शिक्षण मिळावं म्हणून मिनू लोकांकडे काम करत असते.

दिवाळी जवळ येते. त्या गावातील अत्यंत धनवान व्यक्ती असे जाहीर करते की, जी व्यक्ती दिवाळीपर्यंत चांगले काम करेल तिला मी बक्षीस देणार आहे.

बक्षिसाच्या लोभाने प्रत्येकजण आपापल्या परीने चांगले काम करायचा प्रयत्न करतो. कोणी अनाथाश्रमातल्या मुलांना खाऊ-खेळणी देतात, कोणी मंदिरांना तर कोणी शाळांना देणग्या देतात, कोणी रस्त्यांची साफसफाई करतात. मिनूला मात्र या गोष्टींचा पत्ताच नसतो. ती दिवस-रात्र कष्ट करून आपल्या भावाचा सांभाळ करत असते.

दिवाळीत नरकचतुर्दशीच्या दिवशी गावातले सर्व लोक पहाटे उठून, छान तयार होऊन देवाला जातात. मिनू ज्या घरी काम करत असते, त्यांनाही सकाळी लवकर देवाला जायचे असते. म्हणून मिनू पहाटेच त्यांच्या मुलांना सांभाळायला त्यांच्या घरी जाते. ती त्या घरातल्या मुलांना उठवते. त्यांना छान तेल लावून अंघोळ घालते, नवीन कपडे घालते व त्यांना फराळाचे पदार्थ खायला देते. त्या दिवशी खूप पाऊस पडत असतो. दारावर टकटक असा आवाज येतो. मिनू दरवाजा उघडते तर काय? दारात एक छोटा मुलगा उभा असतो. तो खूप भिजलेला असतो. त्याला बर्‍याच ठिकाणी लागलेले असते, रक्त येत असते, त्याच्या पायात काटे गेलेले असतात व तो घाबरून रडत असतो.

मिनूला त्या मुलाला पाहून खूप वाईट वाटते. ती त्याला घरात घेते, पाणी तापवून छान अंघोळ घालते. त्याच्या जखमांना औषध लावते. तिच्या भावासाठी म्हणून जे कपडे तिच्या मालकांनी दिलेले असतात ते ती छोट्या मुलाला घालते व तिला घरी नेण्यासाठी म्हणून जी मिठाई, जे फराळाचे पदार्थ दिलेले असतात. त्यातले काही त्या मुलाला खायला देते. तोपर्यंत पाऊस थांबतो. तो मुलगा निघून जातो व त्या घरातली माणसे परत येतात. मिनू आपल्या घरी जाते.

बक्षीस देण्याचा दिवस उजाडतो. गावातली सर्व मंडळी गोळा होतात. प्रत्येकालाच असे वाटत असते की, बक्षीस आपल्यालाच मिळणार. एवढी गर्दी का जमली आहे हे पाहण्यासाठी मिनूसुद्धा तेथे जाते. तो धनवान माणूस बक्षीस मिळालेल्या व्यक्तीचे नाव जाहीर करतो व ते नाव असते ‘मिनू’.

सगळ्यांना फार आश्चर्य वाटते की या मुलीने काय असे चांगले काम केले की, एवढे मोठे बक्षीस तिला मिळाले. त्या सगळ्यांच्या चेहर्‍यावरचे प्रश्नार्थक भाव बघून तो माणूस सांगायला सुरुवात करतो....

तुम्ही सगळ्यांनीच आपापल्या परीने चांगली कामे केलीत. कोण कोण काय काय करतंय हे पाहण्यासाठी मी माझी काही माणसे नेमली होती.

तुम्ही सगळ्यांनी बक्षिसांच्या लोभाने काम केले. पण या मुलीला कशाचाच पत्ता नव्हता. तिची स्वतःची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही तिने दिवाळीच्या दिवशी एका अत्यंत गरीब, दुःखी व जखमी मुलाला मदत केली. त्याच्या जखमा साफ केल्या. त्याला स्वतःच्या भावासाठी मिळालेले कपडे घातले. स्वतःचा खाऊ दिला आणि म्हणून मी तिला बक्षीस दिले.

-अमिता दाते 

[email protected]

ई दिवाळी अंक: प्रथम आणि त्याच्या मैत्रीची एक सुंदर कथा  

दोस्तांच्या दुनियेत