आज जंगलातील साऱ्या प्राण्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. सारेजण एकमेकांना विचारत होते कोण बरं आहे हा नवा प्राणी. त्यांना त्या प्राण्याकडे पाहून आश्चर्यही वाटत होते आणि भीतीही वाटत होती. कोण असावा बर हा चित्रविचित्र प्राणी.  सारेजण त्याच्याकडे टकामका पाहत होते.पण कोणीही पुढे येऊन त्याच्याशी बोलायला पाहत नव्हते. शेवटी जंगलचा राजा सिंबा सिंह पुढे आला आणि गरजला.

“कोण आहेस तू, आणि या जंगलात काय करतोयस.?” त्यावर तो प्राणी भेदरला. त्याला दरदरून घाम फुटला.

“मी..मी.. आफ्रिकेच्या जंगलातून आलोय..” तो प्राणी घाबरत म्हणाला.

“नाव काय तुझ ?” सिंबा पुन्हा गरजला.

“मी..ओकापी..”

ओकापी अस काही नाव असत का अस म्हणत सारे प्राणी त्याला हसू लागले. तसा तो मान खाली घालून गप्प उभा राहिला. बिचारा ओकापी..

ओकापी हा जिराफाच्या कुटुंबाशी साम्य असणारा आफ्रिकेतला प्राणी आहे. त्याचे तोंड व धड हे जिराफासारखे असते पण तो काही जिराफाएवढा उंच नसतो. त्याची मान काळवीटासारखी असते तर पायावर झेब्रासारखे पट्टे असतात. असा हा ओकापी इतर प्राण्याहून काहीसा वेगळा असतो. आपल्या मित्रांसोबत तो भारतामध्ये सहलीला आला होता. जंगलात फिरता फिरता तो वाट चुकला होता व या प्राण्यांमध्ये येऊन मिसळला होता. त्याचे मित्र बहुतेक त्याला सोडून निघून गेले होते. इथे आता तो एकटाच होता. पण या जंगलातील प्राणी त्याच्याशी बोलत नव्हते. जंगलात तो एकटाच बसून राहत असे.

टप्पू माकड ओकापी जंगलात आल्यापासून त्याच निरीक्षण करत होता. आताही तो झाडावर बसून उदास ओकापीकडे पाहत होता. ओकापी बाजूच्या झाडाची पाने व फुले खात होता.

“तु झाडावरची फुले पण खातोस का?” टप्पू माकडाने कुतूहलाने ओकापीला विचारले.       

“हो, मला खायला खूप आवडते. मी शाकाहारी आहे. मी सतत वेगवेगळी झाडे, पाने, गवत फळ, फूल खात असतो. तुला माहीत आहे का?”  ओकापीला टप्पूच नाव माहित नव्हते म्हणून तो अडखळला.

“मी टप्पू. आजपासून आपण मित्र.” हे ऐकून ओकापी आनंदित झाला. आज जंगलात त्याला पहिला मित्र भेटला होता.

“ओकापी, मला सांग ना तुझ्याबद्दल..” टप्पू म्हणाला.

“तर टप्पू,  तुला माहित आहे का.?  शास्त्रज्ञ लोकांनी माझ्या खाण्याचा अभ्यास करून माणसाला खाण्यायोग्य अशा शंभर वनस्पतीचा शोध लावला.”

“खरच..” टप्पू आश्चर्याने म्हणाला.

“हो, खरच.”” त्यानंतर ओकापी आणि टप्पू बराच वेळ गप्पा मारत बसले.

जंगलात ओकापीला आता एक मित्र भेटला होता. टप्पू आणि ओकापी आता एकत्र राहू लागले. थोड्याच दिवसात ओकापीचे अजून बरेच मित्र जमले. एके दिवशी संध्याकाळी सारे मित्र झाडाखाली बसून गप्पा मारत होते. ओकापी झाडाची पाने खात होता. खाताना तो ‘चफचफ’ असा आवाज करत होता. प्राण्यांना त्याच्या आवाजाची मज्जा वाटत होती.

“अजून सांग ना आम्हाला तुझ्याबद्दल..आम्हाला ऐकायचं आहे.” मुनमुनखारूताई बदाम खाताखाता म्हणाली.

“अजून काय सांगणार बर मुनमुन..हम्म..मला जंगल झेब्रा अस ही म्हणतात बर का.” त्यानंतर ओकापी गप्प झाला. त्याचा चेहरा उदास दिसू लागला.

“काय झाल, ओकापी तू गप्प का झालास? असा उदास चेहरा का केलास?” टप्पू ओकापीच्या जवळ जात म्हटला.

“मला घरची आठवण येतेय टप्पू. माझी आई माझी वाट बघत असेल पण तिच्यापर्यंत मी कसा जाणार?” ओकापी हताश होत म्हटला.

“आफ्रिकेच्या जंगलात आम्ही राहत असलो तरी आमची संख्या खूप कमी आहे. आज आम्ही काही मोजक्याच संख्येने उरलो आहोत. जेव्हा मानवाला आमच्याबद्दल कळल तेव्हा प्राणीसंग्रहालयात ठेवण्यासाठी ते आम्हाला पकडून नेतात. पंधरा महिने आई ओकापीच्या पोटात राहिल्यानंतर आमचा जन्म होतो. आमचा जन्म झाला की आमचे आईवडील आमची खूप काळजी घेतात. तुम्हाला माहित आहे का मित्रांनो, बिबळ्यासारखे प्राणी तसेच इतर शिकारी प्राण्यांना आमची चाहूल लागू नये म्हणून सुरुवातीचे दोन महिने आम्ही विष्ठा विसर्जन ही करत नाही. रानटी प्राण्यांपासून जपण्यासाठी आम्हाला अशी काळजी घ्यावी लागते. ओकापी आपली माहिती सांगत होता आणि सारे त्याचे प्राणी मित्र लक्ष देऊन ऐकत होते. त्यांना ओकापीची माहिती ऐकताना गंमत वाटत होती.

त्या दिवसानंतर ओकापी उदास राहू लागला. त्याला आपल्या घरची आठवण येत होती. एवढ्या दिवसात जंगलाच्या बाजूलाच असणाऱ्या गावातील लोकांनी ओकापीला नदीजवळ पाणी पिताना बघितलं. त्यांना हा प्राणी नवीन वाटला. त्यांनी ओकापीला पकडून सर्कसवाल्यांना विकण्याचा प्लान केला. यात आपल्याला भरपूर पैसे मिळतील असा त्यांचा विचार होता. त्यानंतर ओकापी कधी नदीवर पाणी प्यायला येतो यावर त्यांनी पाळत ठेवली आणि एके दिवशी ओकापी पाणी प्यायला यायच्या वेळेला नदीजवळच्या झाडावर काही माणस लपून बसली. त्यांनी स्वतःसोबत जाळे आणले होते. ओकापी पाणी प्यायला आला तेव्हा त्यांनी वरून त्याच्यावर जाळे टाकले. काय झाल ते ओकापीला कळेना. त्याला तिथून पळता येईना. तो मोठ्याने ओरडू लागला. टप्पू माकडाने ओकापीचा आवाज ऐकला. ओकापी संकटात आहे याची त्याला जाणीव झाली. तो झाडावरून उड्या मारत नदीकाठी पोहचला. एव्हाना गावातले लोक त्याला घेऊन दुसऱ्या तीरावर पोहचले होते. क्षणाचाही विचार न करता टप्पू सिंबाकडे गेला. त्याने सिंबाला सारी हकीकत सांगितली. तोवर विठू पोपट ही ओकापीची बातमी घेऊन आला. गावातील लोक त्याला गाडीत घालून सर्कसवाल्याकडे घेऊन जाणार आहेत असे विठू पोपटाने सांगितले.

“ओकापीला सर्कसवाल्यांकडे नेत असतानाच आपण त्याची सुटका करायची. चला कामाला लागू. विठू उंदरांच्या टोळीला बोलावून आण. आपल्याला त्यांची गरज पडेल.” सिंबा म्हणाला

“टप्पू तू भालू अस्वल आणि चिंटी मुंग्यांना बोलावून आण. आणि सारेजण मला जंगलपायथ्याजवळच्या घाटावर भेटा.” सारेजण कामाला लागले. सारे पायथ्याशी आल्याबर काही वेळातच त्यांना लांबून गाडी येताना दिसली.

“याच गाडीत ओकापी आहे”  मिठू पोपट म्हणाला. खात्री झाली तशी सिंबाने सर्वाना कल्पना सांगितली. आता सारेजण तयारीला लागले. गाडी जवळ आली तशी भालू आणि टप्पू अचानक गाडीसमोर आले. तस ड्रायव्हरला काय झाले ते कळले नाही आणि त्याने गाडी थांबवली. त्याने पाहिले तर भालू गाडीसमोर गोलगोल फिरत होता तर टप्पू गाडीवर चढला होता.

“काय हा प्राण्यांचा त्रास अस म्हणत ड्रायव्हर खाली उतरला तसा मुंग्यांनी त्याच्या पूर्ण शरीराचा ताबा घेतला आणि त्याला चावायला सुरुवात केली. एव्हाला उंदरांची टोळी मागच्या बाजूने गाडीत शिरून आपले काम करत होती.

“ओकापी घाबरू नको, आम्ही तुला काही होऊ देणार नाही.” सिंबा म्हणाला आणि जोरात डरकाळी देत त्या माणसासमोर जाऊन उभा राहिला. तस सिंहाला पाहून त्या माणसांची भीतीने गाळण उडाली. तो वाट मिळेल तसा पळू लागला. त्याची अशी मज्जा बघून सारे प्राणी हसायला लागले. उंदरांनी तोपर्यंत ओकापीची जाळ्यातून सुटका केली होती. सारेजण ओकापीला घेऊन जंगलात आले. साऱ्या जंगलाने आता ओकापीला आपले मानले होते. सारेजण त्याची काळजी घेत. ओकापीही आता साऱ्यांमध्ये मिसळला होता. एके दिवशी सारे जण खेळ खेळत असताना ओकापीला त्यांचे मित्र दिसले. ओकापीने त्यांना हाक मारून बोलावले.

“तुम्ही इथे काय करताय?” ओकापी आश्चर्याने म्हणाला.

“ओकापी, कुठे कुठे शोधायचं तुला...चल आम्ही तुला न्यायला आलोय.” ओस्त्रिच म्हणाला. “आणि आता आमच्यासोबतच राहा. पावसाळ्याच्या आधी आपल्याला घरी पोहचायचं आहे. शाळेच्या सुट्ट्याही आता संपत आल्यात.” घरी जायचं ऐकल्यावर ओकापी खुश झाला. पण आपल्या मित्रांना सोडून जाव लागेल याच त्याला दुःखही झाल. टप्पूने आपल्या मित्राची मनस्थिती ओळखली.

“ओकापी, तू जा आपल्या घरी...आम्ही जसे आपल्या घरी आहोत तस तुलाही आपल्या आई-वडिलांकडे जायला हव. तू जा..शाळेत जा. स्वतःची काळजी घे. आम्ही तुला भेटायला येऊ.” टप्पू म्हणाला तस ओकापीला गहिवरून आल. त्याने ही आपण पुन्हा भेटायला येऊ अस मित्रांना प्रॉमिस केल आणि तो आपल्या घरी जायला निघाला. साऱ्या प्राण्यांनी त्याला टाटा करून निरोप दिला.

-उत्कर्षा मुळे-सागवेकर

ओकापी माहिती संदर्भ – देशिंगकर- पारखे रुपाली: साप्ताहिक विवेक, दिवाळी अंक २०१७: लेख: प्रत्यक्षातील अद्भुत दुनिया.