बालनाट्याच्या लेखनाइतकाच महत्त्वाचा घटक आहे बालनाट्याचे दिग्दर्शन.

दिग्दर्शन हा नाटकाच्या जहाजाचा खलाशी म्हणजेच कॅप्टन असतो. आपण पूर्ण नाटक त्याच्या नजरेने पाहत असतो. त्यामुळे त्याची नजर तयारीची असणे गरजेचे आहे. दिग्दर्शकाला नाटकाची संहिता वाचल्यानंतर त्याच्या मनात त्या नाटकाचा जो प्रयोग उभा राहतो, तो प्रत्यक्ष प्रेक्षकासमोर नाटकाच्या इतर घटकांचा (संहिता, अभिनय, संगीत, प्रकाश, नेपथ्य इ.) वापर करून सादर करायचा असतो. त्यामुळे त्याला या सर्व घटकांचे सखोल ज्ञान नसले तरी जुजबी ज्ञान असायला हवे.

दिग्दर्शकाच्या हातात नाटकाचा पहिला घटक जो असतो, तो म्हणजे त्याची संहिता. संहिता वाचून नाटकात मांडलेला विषय दिग्दर्शकाने नीट समजून घेणे गरजेचे असते. वाचल्यानंतर त्यात काही बदल, अधिक-उणे लिखित स्वरूपात करायचे असेल तर ते त्याने लेखकाच्या मदतीने करावे. अन्यथा लिखाणात बदल न करताही तो ती संहिता आपल्या आकलन आणि समजेनुसार फुलवू शकतो. माझ्या‘अ’ ते ‘ज्ञ’ (मुलांना आपल्या आईवडिलांच्या रागात असलेलं प्रेम समजत नाही. त्यांना रागावणारे आईवडील आपले शत्रू वाटतात, असा या नाटकाचा विषय आहे.) या नाटकात पहिल्या खर्ड्यात जिगूच्या घरातील कुत्राही इतर प्राण्यांप्रमाणे बोलतो असे मी लिहिले होते. पहिला प्रयोग झाल्यानंतर मला जे लिखाणात म्हणायचे होते ते मला दिग्दर्शक म्हणून उभं करता आलं नाही असं जाणवलं. शिवाय कुत्र्याची भूमिका करणारा मुलगा कुत्र्याचा आवाज छान काढतो. (खरं तर त्यामुळेच मी त्याची निवड केली होती.) मात्र त्याच्याकडून त्याचे संवाद चांगल्या पद्धतीने मला डिलिव्हर करून घेता येत नव्हते आणि अचानक एके दिवशी साक्षात्कार झाल्याप्रमाणे मला सुचले की मी याचे सर्व संवाद काढून टाकले आणि फक्त याचं भुंकण ठेवलं तर! तसं करून बघितलं. शिवाय मुलांना त्यांच्या घरातल्या कुत्र्याचं भुंकणं म्हणजे त्याची भाषा समजत नाही असा बदल केला. त्यामुळे मुलांना दुसर्‍यांची, त्यांच्या जवळच्या माणसांची भाषा, त्यातला नेमका अर्थ समजत नाही, हे नाटकातलं म्हणणं या कुत्र्याच्या पात्राला दिलेल्या वेगळ्या ट्रिटमेन्टमुळे अधिक अधोरेखित झालं आणि कुत्र्याची भूमिका करणार्‍या कुणाल वाबळेला राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस मिळालं.

कलाकार निवड हे देखील दिग्दर्शकासाठी फारच आव्हानात्मक काम असतं. भूमिका देत असताना उपलब्ध असलेले कलाकार,  त्यांची उंची, चेहरा, रंग-रूप याचा नीट विचार करायला हवा. त्यात काही उणे-अधिक असेल तर त्याची नीट व्यवस्था लावायला हवी. कारण ते उणं प्रेक्षकांना नाटकभर जाणवत राहिलं तर रसभंग अटळ आहे. एका नाटकात आजीबाईची भूमिका करणारी मुलगी छान काम करत होती. मात्र तिने बॉयकट केलेला होता. त्यामुळे ती आजी वाटतच नव्हती.

आपल्याला उपलब्ध असणार्‍या कलाकाराचा दिग्दर्शकाला नाटकात योग्य पद्धतीने वापर करता आला पाहिजे. यश नवले याने ‘आजोबा’ हे बालनाट्य दिग्दर्शित करायला घेतलं. काही तालमीनंतर त्यातील एक मुलगा आजारी पडला. पण त्याची भूमिका करण्यासाठी दुसरा कोणीही मुलगा उपलब्ध नव्हता. मग त्याने एका मुलीला ती भूमिका दिली आणि मुलाच पात्र मुलीचं केलं. वास्तविक ती मुलगी ‘मुलगा’ म्हणून वापरता आली  असती मात्र पात्र साकारत असेल तर प्रेक्षकांना बर्‍याचदा ते दृश्य पातळीवर खटकतं (अर्थात अपवादात्मक परिस्थितीही असू शकते.) आणि मग ते नाटकाशी एकरूप होत नाहीत. हा धोका लक्षात घेऊन यशने हा निर्णय घेतला असावा,  अशी कल्पकता दिग्दर्शकात असायला हवी.

वृषांक कवठेकरने ‘अ‍ॅक्ट१९७२’ हे बालनाटक दिग्दर्शित केलं होतं. या नाटकाची निर्मिती कथा फारच इंटरेस्टींग आहे. त्याने त्याला नाटकात हव्या असणार्‍या सर्व कलाकारांची नाटक लिहिण्याआधी लेखकाशी भेट घालून दिली. लेखकाने त्याचे स्वभाव नीट समजून घेतले आणि त्यानुसार नाटकात तशी पात्रयोजना केली. याचा फायदा असा झाला की, हे नाटक मुंबई केंद्रातून महाराष्ट्र राज्य स्पर्धेत पहिलं आलं आणि मुख्य कलाकार अनया जोशी हिला अभिनयाचं रौप्यपदक मिळालं. या नाटकाची निर्मितीकथा ऐकून मला विजय तेंडुलकरांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ ची प्रक्रिया आठवली.

आपलं मराठी नाटक हे काही अपवाद वगळता बहुतांशी बोलकं नाटक असतं. यात संवाद बोलणं,  त्या त्या संवादाचा त्याच्या सर्व संदर्भासह योग्य अर्थ समजणं याला फार महत्त्व असतं. त्यामुळे दिग्दर्शकाला भाषेचं नीट ज्ञान, जाण आणि भान असायला हवे. मुलांचं नाटक दिग्दर्शित करत असताना बर्‍याचदा त्याला त्यातील संवाद त्याच्या आरोह-अवरोह आणि अचूक अर्थच्छटेसह शिकवावे लागतात. ही शिकवण जोवर दिग्दर्शक स्वत: त्याचा अभ्यासक असणार नाही, तोवर नीट देऊ शकणार नाही.

माझ्या ‘हनुमान’ या नाटकात मुख्य भूमिका करणार्‍या राधिका झणकरने- ही मराठी बोलत नाही- प्रत्येक वाक्यन् वाक्य घोटून घेतल्यामुळे रविकिरणसारख्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींचा पुरस्कार मिळवला. (अर्थात यात तिच्या मेहनतीचा वाटा मोठा आहे.)

नाटक बसवत असताना आपल्याला नेपथ्यात काय हवं आहे,  काय नको याची स्पष्ट कल्पना नेपथ्यकाराला द्यायला हवी. रंगमंचावरील प्रेक्षकांची डावी बाजू मध्य बाजू या ठिकाणी नाटक प्रामुख्याने जास्त घडायला हवं. शिवाय कलाकारांच्या सर्व हालचाली (मोव्हमेन्टस्) एकाच बाजूला बसवून रंगमंचाचा समतोल (बॅलन्स) घालवू नये.

दिग्दर्शक एखादी चांगली संहिता वायाही घालवू शकतो किंवा तिचं सोनंही करू शकतो. म्हणजेच नाटकाला वेस्ट करणं किंवा बेस्ट करणं हे त्याच्याच हातात असतं. त्यामुळे त्याने आपल्याच नाटकाचं सतत परीक्षण करणं, वारंवार प्रेक्षागृहातून पाहणं, प्रेक्षकांचा अंदाज घेणं हे करत राहायला हवं.

-सुरेश शेलार 

[email protected] 

 

बालनाटकाची चांगली संहिता म्हणजे काय, याविषयी माहिती घेऊ सुरेश शेलार यांच्या लेखात.
बालनाट्याचे लेखन