विद्यार्थी मित्रांनो! परीक्षा म्हणजे काही तरी त्रासदायक, मनावर ताण घेण्याची बाब आहे, असे समजू नका! ती एक पराक्रमाची संधी आहे, असेच समजा. तुम्हाला चांगले काम केल्याबद्दल कोणीतरी आपल्याला शाबासकी द्यावी असे वाटते ना, चला तर मग! आपण रोज अभ्यास करूया!

अभ्यास म्हणजे स्वयंअध्ययन!

अभ्यास कधीही आयत्या वेळी होत नाही. परीक्षा दूर असतानाच अभ्यासाला सुरुवात करा. ‘परीक्षा आठ दिवस आल्यावर पाहू’ असे कधीही म्हणू नका. ‘उद्या कधी उजाडत नाही.’ अभ्यासाला आजच सुरुवात करा.

अभ्यास करणे म्हणजे ‘स्वयंअध्ययन करणे’ होय. स्वयंअध्ययन म्हणजे स्वतःचा अभ्यास स्वतः करणे. स्वतः होऊन अभ्यास करणे होय.

आपल्याला अभ्यास करणे म्हणजे काय हे समजले पाहिजे. ‘चांगला अभ्यास झाला’ याचा आनंद आपल्याला झाला पाहिजे. अभ्यास हा आनंदासाठी, चांगल्या यशासाठी करू या. वरील आकृती पाहा. त्या आकृतीमध्ये पाच पायऱ्या आहेत  पायऱ्या याचा अर्थ असा कि, एक पायरी चढल्यावर दुसरी पायरी असते आणि पाच पायऱ्या चढून उत्तम यश मिळवणे म्हणजे अभ्यास होय.

अभ्यासाच्या पाच पायऱ्या

वरील आकृती नीट पाहा. अभ्यासासाठी लक्षात ठेवा. या पाच पायऱ्यांना अभ्यासात महत्त्व आहे. ‘अभ्यास करणे म्हणजे स्वयंअध्ययन ही तिसरी पायरी आहे. त्या अगोदरच्या नंतरच्या पायऱ्या खूप खूप महत्त्वाच्या आहेत. या पाचही पायऱ्या मिळून आपले विद्यार्थीजीवन आहे, हे लक्षात ठेवा.

विषयाचे पूर्वज्ञान :

आपल्याला नेमलेल्या प्रत्येक विषयाचे काही पूर्वज्ञान असते. ते आपल्याला माहिती असणे आवश्यक आहेच. म्हणून आपली जुनी पाठ्यपुस्तके  जपून ठेवा. अडले तर ती पुस्तके पाहा. आपल्या प्रत्येक प्रकरणात अशी काही माहिती, विचार, अगोदरच्या इयत्तेत झाले आहेत का याचा शोध घ्या. वर्गात शिकवले जाणारे प्रत्येक प्रकरण, पाठ, वर्गात शिकवला जाण्यापूर्वी वाचून जा. इंग्रजी, हिंदी, संस्कृत, मराठी यासारख्या भाषांमधील पाठात नवीन शब्द असतील तर आपल्या वर्गापाठाच्या वहीत त्याची यादी करा. वर्गात शिकविणे सुरु असताना त्या शब्दांचे अर्थ लिहून घ्या. एखादा शब्द अडला तर शब्दकोशात पाहा. आपल्या घरी या भाषा विषयांचे शब्दकोश असले पाहिजेत. शब्दशोधानाचे कौशल्य आपल्याला आले पाहिजे.

वर्गातील शिकणे :

वर्गातील शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले शिक्षक शिकवीत असताना पूर्ण लक्ष द्या. त्या किंवा ते वर्गात येण्यापुर्वीच आपले पुस्तक, वही उघडून ठेवा. शिकविणे चालू असताना शेजारच्या मुलांशी बोलू नका. सर्वच विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे वातावरण ठेवणे, शांतता ठेवणे, शिस्त राखणे, शिक्षकांना सहकार्य करणे म्हणजे स्वतःला मदत करणे हे लक्षात ठेवले पाहिजे.

वर्गात प्रसन्नता हवी, प्रश्नोत्तरे, सरांशी संवाद, फळ्याचा उपयोग, संगणकाचा उपयोग, प्रयोग, नकाशांचा उपयोग, चित्रकला वर्गातील चित्रे काढणे इत्यादी सर्वबाबी शिस्तबद्ध व्हाव्यात. त्यातूनच एक अभ्यासाचे वातावरण वर्गात राहते.

स्वयं- अध्ययन :

घरी करण्याचा स्वतःचा अभ्यास म्हणजेच स्वयंअध्ययन. आपल्या विद्यार्थी जीवनाचा हा पाया आहे. आपण अभ्यासाची कौशल्ल्ये समजून घेतली पाहिजेत. एकाग्रतेने वाचणे, वाचलेले समजून घेणे, ते आठवणे, पाठाचे सलगपणे सर्व मुद्दे आठवणे, त्याची टिपणे थोडक्यात लिहिणे, समजलेला भाग पक्का लक्षात राहण्यासाठी पाठांतर करणे, काही प्रश्नांची उत्तरे लिहून पाहणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

तसेच, आकृत्यांचा सराव करणे (भूमिती, भूगोल, विज्ञान यांचा) नकाशा काढण्याचा सराव करणे, निबंध लेखनाचा सराव (सर्व भाषा) करणे हेही महत्त्वाचे आहे.

सर्व विषयांकडे समान रीतीने लक्ष देणे, आवश्यक आहे. जर एखाद्या विषयात कमी गुण मिळाले तर निराश न होता त्या विषयाचा अधिक अभ्यास करणे महत्त्वाचे. आपल्या उणिवा आपणच दूर करणे ही महत्त्वाचे असते.

आपल्या अभ्यासाबद्दल आपले आई, बाबा, ताई, दादा, आपले शिक्षक यांच्याशी बोलले पाहिजे.

अवांतर वाचनासाठी ग्रंथ मैत्री, ग्रंथालय संपर्क आणि वृत्तपत्र कात्रणे यांच्याशी जवळीक साधली पाहिजे.

परीक्षेची दृष्टी :

प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घ्या. प्रत्येक विषयाचे विविध प्रश्न प्रकार समजून घ्या. प्रश्न प्रकारांचा सराव करा. प्रत्येक प्रकार वेगळा असतो त्यानुसार अभ्यास करा व सराव करा. निबंध, पत्रलेखन, दीर्घोत्तरी प्रश्न, लघुत्तरी प्रश्न, गाळलेल्या जागा भरणे, जोड्या लावणे, बहुपर्यायी प्रश्न, टिपा देणे इत्यादी. विविध प्रश्न अनेक विषयांत असतात ते लक्षात घेऊन परीक्षेपूर्वी त्यानुसार अभ्यास करणे. परीक्षेसाठी उजळणी करणे, प्रश्नपत्रिका सोडवणे, आपल्या उत्तरपत्रिकांचा आपणच अभ्यास करणे, यांना परीक्षेच्या दृष्टीने महत्त्व असते.

प्रत्यक्ष परीक्षा :

परीक्षेची पूर्वतयारी नीट करा. वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करा. परीक्षेच्या काळात मन शांत ठेवणे आवश्यक आहे. मनावर ताण ठेऊ नका. चांगला अभ्यास केला की मनावर ताण येत नाही व आत्मविश्वास वाढतो.

सर्व प्रश्नपत्रिका शांतपणे सोडवा. प्रश्न समजून घ्या व उत्तरे लिहा. परीक्षेच्या वर्गात गडबडून जाऊ नका. आपले लेखनसाहित्य बरोबर ठेवा. प्रश्नांची उत्तरे लिहून झाल्यावर शांतपणे पुन्हा वाचा. वेळेचे भान ठेवा.

आपल्या या साऱ्या अभ्यासात श्रद्धा महत्त्वाची आहे. ‘श्रद्धावान लाभते ज्ञानम्’ हे लक्षात ठेवा. अभ्यास व आरोग्य हातात हात घालून चालतात. म्हणून आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्या. आपल्या मनाच्या एकाग्रतेसाठी प्राणायाम, योगासने यांचाही उपयोग होतो, हे विसरू नका. परीक्षेसाठी व परीक्षेपुरताच अभ्यास करू नका. अवांतर वाचनही करा. आपल्या शाळेतील सर्व स्पर्धांमध्ये सहभागी व्हा.

‘अभ्यासाची पंचपदी’ लक्षात ठेवा. त्याप्रमाणे वागा. परीक्षेसाठी शुभेच्छा !

-श्री. वा. कुलकर्णी

[email protected]

पालकांनी आपल्या मुलांशी ‘अभ्यासाबद्दल संवाद’ कसा साधावा.

पालकांशी हितगुज