मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच चमचमीत गोष्टी खायला आवडतात. वडापाव, भजी, भेळ, पाणीपुरी. नुसती नावं वाचली तरी तोंडाला पाणी सुटलं ना? आपल्याकडे पुणे, मुंबई अशा शहरांमधून अशा चमचमीत गोष्टींचे बरेच  स्टॉल दिसतात. अनेक हॉटेलांमधूनही हे पदार्थ मिळतात. दिल्लीसुद्धा अशा चमचमीत पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. इथे ३-४ महिने थंडी असल्यामुळे चमचमीत गोष्टी खायची मजा काही औरच आहे. इथे रस्त्यावर मिळणारे पदार्थ म्हणजे गोलगप्पे (आपली पाणीपुरी), आलू टिक्की, दही भल्ले, छोले कुल्चे, छोले भटुरे, ब्रेड पकोडा, पनीर पकोडा, समोसा, समोसा चाट, कचोरी, फ्रूट चाट असे विविध पदार्थ मिळतात . दिल्लीतलं हवामान कोरडं असल्यामुळे साहाजिकच तेल तूप यांचं प्रमाण इथल्या सगळ्याच गोष्टींमध्ये थोडं जास्तच असतं. तुम्ही एखाद्या ठेल्यावर गेलात काही खायला तर मोठ्या तव्यावर तेलात खरपूस तळल्या जाणाऱ्या टिक्की पाहून त्या खायचा मोह होणारच. टिक्की ही बटाट्याच्या पॅटिससारखी असते, पण चव वेगळी असते. इथे चाट आयटेम्सबरोबर मिळणाऱ्या चटण्या तिखट, आंबट, गोड अशा असतात. तीव्र चवीच्या. खाल्ल्या थोड्या जास्त प्रमाणात तर येणारच झिणझिण्या जिभेला आणि डोक्याला. एकदम दिमाग की बत्ती जलालो.  इथे पाणीपुरीला म्हणतात गोल गप्पे. त्यातही दोन प्रकार- आटावाले आणि सुजीवाले. एक थोडे कडक पुरीवाले एक खुसखुशीत पुरीवाले. आपल्याकडे पाणीपुरी खाल्ल्यावर हमखास सुकी पुरी मिळते. इथे सुक्या पुरीची पद्धत नाही. दही भल्ले हा प्रकार आपल्या दहीपुरीच्या जवळ जाणारा. पण आपल्याकडे यात जशी शेव असते तशी शेव नसते. चपट्या पुऱ्या, कुस्करलेला दहीवड्याचा वडा, कुस्करलेला उकडलेला बटाटा, भरपूर दही, हिरवी चटणी आणि चिंचेची आंबट-गोड चटणी म्हणजे दही भल्ले. आलू टिक्कीमध्येही टिक्कीवर छोले, कच्चा कांदा, हिरवी चटणी आणि आंबट गोड चटणी यातही सहसा शेव नसते. थंडीच्या दिवसात गरमगरम गोड पदार्थही खूप मिळतात. गाजर हलवा, गुलाबजाम, जलेबी आणि रबडी हे हिवाळ्यातले खास पदार्थ. इथल्या काही मार्केट्समध्ये राम लाडू म्हणून पदार्थ मिळतो. नावावरून तुम्हाला अर्थातच वाटेल की हा गोड  पदार्थ असणार पण ही असतात मुगाच्या डाळीची छोटी भजी. या भज्यांबरोबर बारीक चिरलेला मुळा आणि हिरवी चटणी मिळते. थंडीत हवाहवासा वाटणारा आणखी एक पदार्थ म्हणजे शकरकंद चाट. शकरकंद म्हणजे आपलं रताळं. ते उकडून किंवा भाजून त्यावर चाट मसाला भुरभुरवला जातो आणि लिंबू पिळलं जातं. या सगळ्या खाण्याच्या गोष्टींबरोबर थंडीत चहा, कॉफी, आटीव दूध याही गोष्टी पिण्यासाठी असतात. जगभर एस्प्रेसो कॉफी ही काळी कॉफी असते. ही कॉफी खूप स्ट्रॉंग असते, यात साखरही नसते आणि दूधही. पण दिल्लीत एस्प्रेसो नावाने मिळणारी कॉफी ही मस्त दूध, साखर असणारी असते. या कॉफीवर मस्त फेसही असतो. कडाक्याच्या थंडीत ही कॉफी पिण्याची खरी मजा असते. दिल्लीतला चाँदनी चौक हा खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्धच आहे. इथली परांठेंवाली गल्ली खाबूगिरीसाठी पर्वणी आहे. दिल्लीत जशी कडाक्याची थंडी पडते तसाच कडक भाजून काढणारा उन्हाळा पण असतो त्यामुळे थंड पेय, कुल्फी अशा पदार्थांची पण इथे रेलचेल असते. आपण जे कैरीचं पन्हं करतो तसंच इथेही आम पन्ना मिळतो. पण हा आम पन्ना आपल्या पन्ह्यासारखा गोड नसतो . ह्यात थोडं काळं मीठ किंवा जलजीरा घातलेला असतो त्यामुळे याची चव थोडी वेगळी लागते. इथे लिंबू सरबताला शिकंजी म्हणतात. उन्हाळ्याच्या दिवसात रुह अफझा इथे आवर्जून पितात. कडक उन्हाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी रुह अफझाचं मोफत वाटपही होतं. बाकी गोड आणि खारट (मीठी आणि नमकीन) लस्सी लोकप्रिय आहे. आपलं ताक किंवा छासही अनेक ठिकाणी मिळतं. एकूण काय तर हवामानानुसार खाण्यापिण्याचे मजेदार प्रकार दिल्लीत मिळतात. जेव्हा केव्हा तुम्हाला इथे यायची संधी मिळेल तेव्हा या खाऊ प्रकारांचा जरूर आनंद घ्या. 

 
-सुप्रिया देवस्थळी 

भारताच्या राष्ट्रपती भवनाविषयी माहिती खालील लिंकवर 
शोधू नवे रस्ते - भाग ६