छोटा डॉन फुरफुरी नगरीमध्ये चोरी करून जंगलात जाऊन लपून बसला होता. त्याला पकडण्यासाठी इन्स्पेक्टर चिंगमने मोटू आणि पतलूला जंगलात पाठवलं. दोघंही खूप उत्साहाने जंगलात जायला निघाले. जाताना त्यांनी खूप खायला वगैरे घेतले. जंगलात गेल्यावर छोटा डॉनला शोधता शोधता मोटू आणि पतलूच जंगलात हरवून गेले. त्यांना तिथून बाहेर पडायचा रस्ता सापडेना. त्यांनी सोबत आणलेल्या नकाशावरूनही त्यांना बाहेर कसे पडावे हे समजेना. आता त्यांनी तिथेच तंबू ठोकून राहायचे ठरवले. ते तिथेच जंगलात नदीकाठी तंबू ठोकून राहू लागले. त्यांनी आणलेला खाऊसुद्धा दोन दिवसात संपून गेला. आता त्यांना जंगलातील फळे खाऊन राहावे लागत होते. एके दिवशी मोटूला फळे खाऊन कंटाळा आला. त्याला सामोसे खायची इच्छा झाली, पण जंगलात सामोसे कोठून येणार? त्याने पतलूला सांगितले.

‘‘पतलू, मला सामोसे खायचे आहेत.’’ ‘‘मोटू, अरे, या जंगलात मी सामोसे कोठून आणून देऊ?’’

‘‘ते काही नाही पतलू, जर तू माझा बेस्टफ्रेंड असशील तर तू माझ्यासाठी नक्की सामोसे घेऊन येशील?’’ मोटू रागाने म्हणाला. पतलूला काय करावे कळेना. ‘‘पतलू, तू मला सामोसे आणून दिलेस तर ते खाऊन माझ्यात ताकद येईल आणि मी त्या ताकदीच्या जोरावर या जंगलातून बाहेर पडू. त्याचबरोबर छोटा डॉनलाही शोधून काढू.’’

‘‘अरे मोटू, पण या जंगलात मी सामोसे कोठून आणू? ही फुरफुरीनगरी नाही. हे जंगल आहे.’’ पतलू मोटूला समजावत होता.

‘‘पतलू, मला सामोसे पाहिजे म्हणजे पाहिजेच. जर तू सामोसे आणलेस तरच मी तुझ्याशी बोलेन. तोवर कट्टी.’’ असं म्हणत मोटूने पाठ फिरवून घेतली आणि तो पतलूशी बोलायचा बंद झाला.

पतलूला या गोष्टीचे खूप वाईट वाटले. तो एकटाच नदीकाठी येऊन गप्प बसून राहिला. डॉ. झटकाला फोन लावून सामोसे मागवावे तर मोबाईलला रेंज नव्हती. तो नदीकाठी उदास बसून राहिला. त्याला असं उदास बघून नदीतली मगर बाहेर आली. तिने पतलूला विचारले.

‘‘आज तुझा मित्र नाही का तुझ्यासोबत?’’

‘‘तो माझ्याशी बोलत नाहीये. त्याला सामोसे खायचे आहेत. पण या जंगलात मी सामोसे कोठून आणणार? मोटू म्हणतो की, मी त्याचा बेस्टफ्रेंड नाही.’’ असं म्हणत पतलू रडू लागला तस मगर म्हणाली, ‘‘अरे, यात रडायचं कशाला? या नदीकाठच्या दुसर्‍या बाजूला कुरकुरीनगरी आहे. आपण तिथून सामोसे आणू.’’ हे ऐकून पतलू खूश झाला. पण तिथे जायचे कसे? पतलूला प्रश्न पडला.

‘‘तू माझ्या पाठीवर बस. आपण जाऊन सामोसे घेऊन येऊ.’’ पतलू तयार झाला. तो मगरीच्या पाठीवर बसला. दोघंही कुरकुरीनगरीमध्ये पोहोचले. पतलूने तिथून सामोसे घेतले आणि पुन्हा मगरीच्या पाठीवर बसून तो नदीपल्याड आला. पतलू पळतच तंबूमध्ये आला आणि त्याने मोटूसमोर सामोसे ठेवले.

‘‘सामोसे!!’’ असं मोठ्याने ओरडत मोटूने सामोस्यावर ताव मारला. त्याला खाताना बघून पतलू खूश झाला. शेवटचा एक समोसा राहिला, तेव्हा मोटूला पतलूची आठवण झाली. त्याने तो शेवटचा समोसा पतलूला दिला आणि म्हटला. पतलू, तूच माझा बेस्टफ्रेंड असे म्हणून मोटूने पतलूला मिठी मारली. दोघांनी शेवटचा सामोसा अर्धा अर्धा मिळून खाल्ला.  

सामोसे खाल्यावर मोटूला ताकद आली. त्याने डोळे बंद करून जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढला आणि छोटा डॉन कोठे आहे हे पाहिले. छोटा डॉन नदीकाठच्या एका गुहेत लपुन बसला होता. छोटा डॉनला तिथून पकडून दोघंही त्याच्याच गाडीवर जंगलातून वाट काढत फुरफुरीनगरीमध्ये पोहोचले. छोटा डॉनला पकडून आणल्याबद्दल गावातील सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले.

-उत्कर्षा सुमित

[email protected]